वेबर, आल्ब्रेख्त फ्रीड्रिख : (१७ फेब्रुवारी १८२५–३० नोव्हेंबर १९०१). थोर जर्मन प्राच्यविद्यापंडित. जन्म ब्रेस्लौ येथे. शिक्षण ब्रेस्लौ विद्यापीठात. यजुर्वेदावरील त्यांचा प्रबंध त्यांनी ह्याच विद्यापीठात सादर केला (१८४५). प्रशियन अकादमीच्या आर्थिक साहाय्याने फ्रान्स व इंग्लंड येथे जाऊन त्यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या हस्तलिखितांचा अभ्यास केला. पुढे बर्लिन विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली (१८५६). १८५७ मध्ये त्यांना `बर्लिन अकॅडमी ऑफ सायन्सिस’ ह्या संस्थेचे सदस्यत्व देण्यात आले. १८६७ मध्ये बर्लिन विद्यापीठात ते प्रमुख प्राध्यापक झाले. अध्यापन आणि लेखन करीत ते बर्लिनमध्येच राहिले.
वेबर ह्यांनी इंडिश ऽ स्टुडिअन हे प्राच्यविद्याविषयक नियतकालिक चालविले होते (१८४९–८५). त्यातील बहुतेक लेखन त्यांचे स्वत:चे असे. ह्याच नियतकालिकात त्यांनी कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेची टीकाटिपणीसह संपादिलेली आवृत्ती प्रसिद्ध केली. यजुर्वेदावर त्यांनी बरेच काम केले. १८५२ साली त्यांनी यजुर्वेदाची आवृत्ती महीधरटीकेसह प्रसिद्ध केली. सामवेदाबद्दलही त्यांनी विपुल लेखन केले आहे. बर्लिनच्या रॉयल लायब्ररीतील संस्कृत हस्तलिखितांचा त्यांनी सखोल अभ्यास केला त्या हस्तलिखितांची पद्धतशीर यादी तयार केली (१८५३) त्या अभ्यासावर आधारित अशी अनेक व्याख्याने दिली आणि लेखही लिहिले. रामायण-महाभारत, पुराणवाङ्मय, व्याकरण, औषधिविज्ञान, कला, संगीत, ज्योतिषशास्त्र, युद्धशास्त्र अशा अनेक विषयांवरील हे लेख १८५३ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. बौद्ध साहित्यावरील त्यांनी अनेक लेख लिहिले. सायण, हरिस्वामी आणि गंगाचार्य ह्यांच्या टीकांसह शतपथ ब्राह्मण त्यांनी १८५५ मध्ये प्रसिद्ध केले. प्राचीन संस्कृत गद्याचा नमुना, यज्ञाची सांगोपांग माहिती, प्राचीन लोककथा ह्या दृष्टींनी हे काम महत्त्वपूर्ण ठरले. पाणिनीचा काळ आणि पतंजलीचे महाभाष्य ह्यांवरील त्यांचे प्रदीर्घ लेख अनुक्रमे १८६१ व १८६३ मधले. हालाच्या ⇨गाहा सत्तसईवरील (गाथा सप्तशती) त्यांचा ग्रंथ (१८८१) प्राकृत भाषाभ्यासाकरिता बराच उपयुक्त ठरला. द हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर (१८८५) ह्या त्यांच्या ग्रंथात वैदिक, अभिजात संस्कृत, बौद्ध तसेच जैन साहित्याचा इतिहास आला आहे. जैन साहित्यावरही त्यांनी बरेच संशोधन व लेखन केले. उदा., ऑन द होली स्क्रिप्चर्स ऑफ द जैन्स, ऑन ए फ्रॅगमेंट ऑफ द भगवती, ए कॉंट्रिब्यूशन टू द नॉलेज ऑफ द होली लॅंग्वेज अँड लिटरेचर ऑफ द जैन्स. प्राकृत भाषेची शास्त्रीय चर्चा करणारे लेखनही त्यांनी पुष्कळ केले. पश्चिम देशांबरोबरचे भारताचे संबंध, नक्षत्रांची वेदांतील वर्णने, ग्रीक आणि भारतीय बोधकथांतील नाते ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी व्यासंगपूर्ण लेखन केले. ‘डद ग्रीक्स इन इंडिया’ हा त्यांचा निबंध १८९० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांना अंधत्व आले व त्यांचे काम थांबले.
बर्लिन येथे त्यांचे निधन झाले.
इनामदार,वि. बा.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..