वेक बेट : पूर्वीचे हेल्‌सिऑन. मध्य पॅसिफिक महासागरातील संयुक्त संस्थानांच्या ताब्यातील एक बेट. १९ १७’  उ. अक्षांश व १६६ ३५’ पू. रेखांशावरील हे कंकणद्वीप असून त्यामध्ये वेक बेटाशिवाय पील व विल्क्स या प्रवाळ द्वीपकांचा समावेश होतो. हवाई व ग्वॉम या बेटांच्या दरम्यान असलेले हे बेट होनोलूलूच्या पश्चिमेस ३,७०० किमी., तर टोकिओच्या आग्नेयीस ३,१९५ किमी. अंतरावर आहे. या मुख्य बेटाच्या पूर्वेस पील व पश्चिमेस विल्क्स ही द्वीपके आहेत. या बेटाच्या भूभागाचे क्षेत्रफळ आठ चौ. किमी. असून लोकसंख्या १,६७४ (१९७०) होती. वक्राकार शैलभित्तीच्या आतील खाजणाचे क्षेत्रफळ सु. दहा चौ. किमी. आहे. ६ मी उंचीच्या या द्वीपकांवर पाऊस अत्यल्प पडतो. येथे गोडे पाणी आढळत नाही. सागरी पाण्याचे ऊर्ध्वपातन करण्याचे दोन प्रकल्प उभारुन गोडया पाण्याची गरज भागविण्यात आली आहे. ‘फेडरल एव्हिएशन एजन्सी ’ च्या न्यायाधिकाराखाली येथे संयुक्त संस्थानांचा व्यापारी व लष्करी तळ आहे. 

   इ.स. १५६८ मध्ये स्पॅनिशांनी या बेटाचा शोध लावला. त्यावेळी येथे मानवी वस्ती नव्हती. १७९६ मध्ये ब्रिटिश खलाशी विल्यम वेक या बेटावर आला. त्यावरुन याला वेक असे नाव देण्यात आले. संयुक्त संस्थानांचा नौसेना अधिकारी कमांडर चार्ल्स विल्क्स  याच्या दक्षिण समुद्राच्या समन्वेषण मोहिमेने १८४१ मध्ये या बेटाची पाहणी केली. त्याच्याबरोबर निसर्गवैज्ञानिक टायटन पील हा होता. त्यांची नावे येथील प्रवाळ द्वीपकांना देण्यात आली.

सॅन फ्रॅन्सिस्को (अ. सं. सं) ते मानिला (फिलिपीन्स) या केबलमार्गावर हे बेट व ही द्वीपके असल्याने १८९८ मध्ये संयुक्त संस्थानांनी त्यांवर आपला हक्क सांगितला.

पॅसिफिक महासागरातून पूर्वेकडे जाणार्यास हवाई मार्गांवरील हे १९३५ पासून व्यापारी ठाणे बनले. त्यानंतर १९३९ मध्ये येथे संयुक्त संस्थानांच्या लष्करी तळाची उभारणी सुरु झाली. ते काम अर्धवट असतानाच डिसेंबर १९४१ मध्ये वेक बेटावर हल्ला करुन ते जपानने बळकावले. जपानने या बेटाचा अधिकार सोडेपर्यंत संयुक्त संस्थानांच्या फौजांनी १९४२ पासून १९४५ पर्यंत त्यावर बाँब हल्ले चालू ठेवले. दुसऱ्या महायुध्दानंतर संयुक्त संस्थानांच्या नौसेना विभागाने या बेटावर हवाई वाहतूक सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून येथे व्यापारी हवाई जहाजेही इंधन घेण्यासाठी थांबतात. १९७५ मध्ये व्हिएटनामच्या निर्वासितांना येथे ठेवण्यात आले होते. संयुक्त संस्थानांच्या ‘नॅशनल वेदर सर्व्हिस’ व ‘नॅशनल ओशनॉग्रॅफिक अँड ॲट्मॉस्फेरिक ॲड्‌मिनिस्ट्रेशन’ चे संशोधक केंद्र येथे आहे. मुख्य बेट व द्वीपके पुलांद्वारे एकमेकांशी तर सागरी केबलद्वारे होनोलूलू व ग्वॉम बेटांशी जोडलेली आहेत.                                   

चौधरी, वसंत