वुलन गाँग : ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या इलवारा जिल्ह्यातील एक शहर. लोकसंख्या २,५५,७०० (१९९६). पॅसिफिक महासागर किनारा व इलवारा पर्वतश्रेणी यांदरम्यान, अरुंद व सुपीक किनारपट्टीच्या प्रदेशात हे शहर वसलेले असून शहराचा मध्यवर्ती भाग सिडनीच्या दक्षिणेस ८० किमी.वर आहे. वुलनगॉंगचे हवामान समशीतोष्ण असून येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११४ सेंमी तर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांचे सरासरी तापमान २२० से. व जुलै महिन्याचे १२० से. असते.

इ. स. १७९६ मध्ये ब्रिटिश दर्यावर्दी व समन्वेषक जॉर्ज बॅस व मॅथ्यू फ्लिंडर्स हे या भागातील इलवारा सरोवराजवळ पोहोचले होते. वर्षभरानंतर एका फुटलेल्या जहाजातील बचावलेल्या पाच व्यक्ती ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय किनाऱ्यावर येऊन पोहोचल्या. या भागातील कोलल्किफ येथे त्यांना दगडी कोळसा आढळला परंतु ह्या प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे तेथे कोळसा उत्पादन घेणे अशक्य असल्याचे सिडनीच्या अधिकाऱ्यांचे मत होते. सिडनीजवळील लिव्हरपूल येथील चार्ल्‌स थ्रोस्‌बी या शेतकऱ्याला इलवारा जिल्ह्यात गवताची चांगली कुरणे असल्याची बातमी लागली होती त्यामुळे तो या भागात आपली गुरे घेऊन आला (इ.स.१८१५). त्यानंतर इतर गुराखीही  थ्रोस्‌बीच्या पाठोपाठ या भागात आले. तेव्हापासूनच वुलनगाँगच्या परिसरात वसाहतींना प्रारंभ झाला. या लोकांना इलवारा पर्वतश्रेणीच्या खालच्या भागातील वर्षारण्यांत उपयुक्त असे रेड सीडार वृक्ष आढळले. इ. स. १८३४ मध्ये हेन्री व्हाइट या सर्वेक्षकाने गाव वसविण्याच्या दृष्टीने या जागेचे सर्वेक्षण केले. सुरुवातीला हे पशुपालन, दुग्धोत्पादन, शेती, लाकूडतोड व जहाजांमध्ये लाकूड भरण्याचे प्रमुख केंद्र बनले. १८४९ मध्ये मौंट केईरा परिसरात, तर १८५७ मध्ये बेलांबी येथे दगडी कोळसा उत्पादनास सुरुवात झाली. १८४३ मध्ये नगरात रूपांतर झालेल्या वुलनगाँगमध्ये १८५९ साली राज्यातील पहिल्या नगरपालिकेची स्थापना झाली. १९४२ मध्ये याचे शहरात रूपांतर झाले. १९४७ मध्ये वुलनगाँग व नॉर्थ इलवारा या नगरपालिका तसेच बुली व सेंट्रल इलवारा परगणे यांच्या एकत्रीकरणाने ग्रेटर वुलनगाँगची निर्मिती करण्यात आली. ग्रेटर वुलनगाँगचा विस्तार सु. ७१५ चौ. किमी. आहे. पोर्ट केंब्ला हे येथील महत्त्वाचे कृत्रिम बंदर असून त्याचाही वुलनगाँगमध्ये समावेश आहे. १९७० पासून या संपूर्ण प्रदेशाला ‘सिटी ऑफ वुलनगाँग’ असे संबोधण्यात येऊ लागले.

वुलनगाँगचे पोर्ट केंब्ला हे देशातील लोखंड व पोलाद निर्मितीचे प्रमुख केंद्र असून येथील या उद्योगात वीस हजारांवर लोक गुंतले आहेत. इलवारा श्रेणीत कोळसा खाणकाम केले जाते. बुली येथील समृध्द कोळसा क्षेत्रामुळे येथे अवजड उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर निर्माण केले गेले आहेत. येथील बराचसा कोळसा निर्यात केला जातो. वुलनगाँगमध्ये अभियांत्रिकी उद्योग, तांबे शुध्दीकरण, अन्नप्रक्रिया, खते, वस्त्रोद्योग, धातुउत्पादने (पोलाद, शुध्दीकृत तांबे, पितळे इ.), रसायने, कोक व विटा निर्मिती इ. उद्योगधंदे चालतात. येथून कोकची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. मोठ्या व्यवसायांच्या वाढीमुळे ग्राम्य उद्योगांचे प्रमाण कमी झाले असले, तरी अजूनही स्थानिक गरजा भागविण्याइतपत ते चालू आहेत. वुलनगाँगच्या दक्षिण भागात दूधदुभत्याचा व्यवसाय महत्त्वाचा आहे. पोर्ट केंब्ला येथे मासेमारी चालते. ऑस्ट्रेलियातील अत्यंत आधुनिक अशा व्यापार व व्यवसाय केंद्रांपैकी हे एक आहे.

वाढत्या लोकसंख्येनुसार वुलनगाँगमध्ये शिक्षण विभागाकडून पुरेशा शैक्षणिक सुविधा वाढविल्या जात आहेत. वुलनगाँग विद्यापीठ (१९७५ पर्यंत न्यू साउथ वेल्स विद्यापीठाचे वुलनगाँग महाविद्यालय), तंत्रमहाविद्यालय, शिक्षक प्रशिक्षण व इतर अनेक शैक्षणिक संस्था येथे आहेत. सिटी कौन्सिलच्या अधिकारातील अनेक सार्वजनिक ग्रंथालये येथे आहेत. वुलनगाँग हॉस्पिटल व पोर्ट केंब्ला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ही दोन मोठी व आधुनिक रुग्णालये येथे आहेत.

प्रतिवर्षी हजारो पर्यटक वुलनगाँगला भेट देतात. निसर्गसुंदर किनारा, इलवारा सरोवर, इलवारा श्रेणीतील सब्‌लाइम पॉइंट, मौंट केंब्ला, मौंट केईरा ही परदेशी तसेच स्थानिक पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. शहरात पर्यटकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असून, ते रस्ते व लोहमार्गाने सिडनीशी जोडलेले आहे. सिटी कौन्सिल या स्थानिक प्रशासकीय मंडळाकडून ग्रेटर वुलनगाँगचा कारभार पाहिला जातो.                                            

चौधरी, वसंत