वुर्टसबर्ग प्रणाली : जर्मनीतील वुर्ट्सबर्ग येथे बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी–विशेषतः जर्मन मानसशास्त्रज्ञ ⇨ओस्वाल्ट क्यूल्पे (१८६२–१९१५ ) ह्याने–विचारप्रक्रियेच्या संदर्भात केलेल्या प्रयोगांतून विकसित झालेली एक प्रणाली. ‘प्रतिमाविरहित विचार’ हा त्यांच्या संशोधनाचा बीजविषय होता. १९०० ते १९१४ ह्या कालखंडात त्यांचे हे संशोधन चालू होते.    

वुर्ट्सबर्ग विद्यापीठात विचारप्रक्रियेवर प्रायोगिक संशोधन सुरू होण्यापूर्वी विचार हा वेदनेच्या (सेन्सेशन) साहचर्यांचा एक परिपाक मानला जात असे. वेदन, त्याची साहचर्ये, तसेच प्रतिमा हे विचारप्रक्रियेतील काही घटक असेल, तरी ह्या घटकांखेरीज आणखी काही घटक विचारप्रक्रियेत अनेकदा महत्त्वाचे ठरतात. उदा., ७ व ४ ह्या दोन अंकांचे साहचर्यसंबंध ७ × ४ = २८, ७ + ४ = ११, ७ – ४ = ३ असे निरनिराळे आहेत. तथापि सात चोक किती ? असा प्रश्न विचारताच २८ असे उत्तर ताबडतोब दिले जाते. ७ व ४ ह्या आकड्यांची इतर साहचर्ये मागे पडतात. ह्याचा अर्थ, विविध साहचर्यांपैकी विचारलेल्या प्रश्नाशी अप्रस्तुत अशी साहचर्ये मागे पडून प्रश्नाशी सुसंगत अशीच साहचर्ये विचारात घेतली जातात. असा युक्तायुक्त विचार कसा होतो, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी साहचर्यसंबंधांची उपपत्ती अपुरी पडते. ही त्रुटी भरून काढण्यासाठी वुर्ट्सबर्ग प्रणालीतील संशोधन मार्गदर्शक ठरले.

विविध साहचर्ये विचारांमध्ये जशीच्या तशी न उतरता त्यांमध्ये संबध्दतेचे काही तारतम्य ठरविले जाते, असे वुर्ट्सबर्ग येथील संशोधनात दिसून येत होते. असे तारतम्य कशामुळे ठरते, ह्यासंबंधी वुर्ट्सबर्ग मानसशास्त्रज्ञांनी केलेली मीमांसा थोडक्यात अशीः व्यक्तीपुढे जेव्हा एखादा प्रश्न उभा राहतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या विचारांची दिशा व गती केवळ अनुभवातील साहचर्यानेच ठरते, असे नाही. व्यक्तीने आपल्या समोर जे उद्दिष्ट किंवा नियुक्त काम (टास्क) ठेवलेले असते, त्यामधून उद्‌भवणारी नियंत्रणे अनेकदा तिच्या विचारांची दिशा व गती ठरवीत असतात. ही नियंत्रणे विचारश्रेणींतील पदांचे निर्धारण करीत असतात. ह्या नियंत्रणांमुळे विचारांना एक अनुक्रम मिळतो त्यांना संगतवार, सुव्यवस्थित असे स्वरूप प्राप्त होते विचारांना वळण लागते. तथापि ही नियंत्रणे किंवा नियंत्रणाची क्रिया प्रायःबोधपूर्वक वा जाणीवपूर्वक झालेली नसते. आपल्या उद्दिष्टातून अथवा नियुक्त कामातून उद्‌भवणाऱ्या नियंत्रक अभिवृत्तीमुळे (कंट्रोलिंग ॲटिट्यूड) सुसंबध्द कल्पनांचा स्वीकार आणि असंबध्द कल्पनांचा त्याग असे विचारांचे नियंत्रण आपोआप घडते. विचारांचे व्यवस्थापन करणाऱ्या ह्या नियंत्रणाला वुर्ट्सबर्ग प्रयोगशाळेतील आख ह्या मानसशास्त्रज्ञाने ‘नियंत्रक अभिवृत्ती’ असे नाव दिले.

नियंत्रित साहचर्यावर केला गेलेला एक प्रयोग असा : काही व्यक्तींना ‘विरूध्दार्थी शब्द द्या’ असे सांगून उत्तरे घेण्यात आली. उत्तरे ताबडतोब येत होती. ‘नफा’ असे म्हटले, की ‘तोटा’ हे उत्तर त्वरित येई. इतक्या त्वरित उत्तर कसे येते व विचारप्रक्रिया कशी घडते, हे जाणून घेण्यासाठी संबंधित व्यक्तींना प्रश्न विचारले असता, त्यांच्या उत्तरांतून असे दिसून आले, की त्यांच्या विचारप्रक्रियेत सबोध (कॉन्‌शस) असे तपशील नव्हते. व्यक्तीचे लक्ष पहिल्या तत्परतेच्या अवस्थेवर केंद्रित झालेले असते. ह्या अवस्थेलाच ‘न्यास’ (सेट) म्हटले गेले आहे.

सारंश, नियुक्त कामापासून निर्माण झालेली नियंत्रक अभिवृत्ती विचारांची दिशा व योजना ह्यांचे नियमन करते, ही अभिवृत्ती बोधमनातूनच निर्माण होते असे नाही, तर अबोध मनातूनही निर्माण होते.    

वुर्ट्सबर्ग प्रणालीमुळे विचारप्रक्रियेत न्यासाचे महत्त्व काय, हे स्पष्ट झाले. विचारप्रक्रियेचे संघटन आणि नियंत्रण करणाऱ्या घटकांपैकी न्यास हा एक महत्त्वाचा घटक आहे, हे वुर्ट्सबर्ग प्रणालीतील संशोधनाने स्पष्ट झाले.

संदर्भ : 1. Boring, E. G. A History of Experimental Psychology, New York, 1929.

            2. Thomson, R. The     Psychology of Thinking, New Orleans, 1963.

देशपांडे, सु. वा.