वूचांग : चीनच्या पूर्वमध्य भागातील हूबे (हूपे) प्रांताची प्रशासकीय राजधानी व वूहान महानगरसमूहातील एक शहर. हे यांगत्सी नदीच्या दक्षिण काठावर, हान नदीच्या मुखावर वसले आहे. हान्‌को, हानयांग व वूचांग या जवळजवळच्या शहरांचा मिळून वूहान हा महानगरसमूह तयार होतो. वूहान महानगरसमूहातील वूचांग ही एक प्राचीन नगरी असून सुरूवातीपासून एक प्रशासकीय, सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र म्हणून तिची ख्याती आहे. सर्पंट टेकडीने या शहराचे दोन भाग केले आहेत. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासूनचा तिचा इतिहास ज्ञात आहे. हान वंशाच्या काळात (इ. स. पू. २०६ ते इ. स. २२०) येथे राजधानी होती. चीनमधील वै, शू आणि वू या तीन स्वतंत्र राज्यांपैकी (इ. स. २२२ ते २८०) वू राज्याची राजधानी येथे होती. पुढे मध्ययुगात युआन (मंगोल) वंशाच्या काळात (१२०६–१३६८) हूग्वांग प्रांताची राजधानी येथे करण्यात आली. या प्रांतातून हूपे प्रांत स्वतंत्र रीत्या अस्तित्वात आल्यानंतर त्याची राजधानी वूचांग येथेच ठवण्यात आली (१६६० चे दशक). मांचू राजवटीविरूध्द १० ऑक्टोबर १९११ रोजी येथूनच क्रांतीचा पहिला उद्रेक झाला आणि चिनी प्रजासत्ताकाची स्थापना झाली. त्यानंतर १९२७ मध्ये चीनच्या राष्ट्रीय सेनेने या शहराचा पूर्ण ताबा मिळविला. काही काळ स्वातंत्र्य चळवळीचे हे केंद्रस्थान होते. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी (१९३९-४५) जपानने त्यावर वर्चस्व प्रस्थापिले. पुढे १९४९ मध्ये चीनमधील राजेशाहीच्या अस्तानंतर ते कम्युनिस्टांच्या अखत्यारीखाली आले. १९५० पासून हे शहर वूहानचा एक भाग आहे.

शहराला पूर्वी सु. ११ किमी. लांबीची तटबंदी होती. ती अवशिष्ट स्वरूपात आहे. शहरात कातडी कमाविण्याचा व्यवसाय मोठा असून त्याशिवाय कागद निर्मिती, रेशीम विणकाम आणि वस्त्रोद्योग हे व्यवसाय चालतात. शासनाने औद्योगिकीकरणासाठी १९५० च्या दशकात शहराच्या ईशान्य भागात, देशातील मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक लोखंड व पोलाद उद्योगसमूह सुरू केला आहे. शहरात वूहान विद्यापीठ तसेच जलसंरक्षण संस्था व शासकीय टांकसाळ आहे. शहराच्या जुन्या तटबंदीच्या उत्तरेस यांगत्सी नदीकिनाऱ्याने व्यापारी उपनगरे आहेत. वूचांग व हान्‌को यांदरम्यानचा यांगत्सी नदीवरील पूल १९५७ पासून सुरू करण्यात आला. त्यावरूनच बीजिंग-कँटन लोहमार्ग जातो. सर्पंट टेकडीवर यलो क्रेन टॉवर असून शहरात पाओ पिंग तांग या व्हाइसरॉयच्या स्मरणार्थ बांधलेले एक भव्य सभागृह आहे. याशिवाय त्सेंग कुंग त्से मंदिर असून ते ताइपिंग बंड शमविणारा द्‌झंग ग्वोफानच्या स्मरणार्थ बांधले आहे. वूचांगमध्ये १० ऑक्टोबर रोजी ‘डबल टेन्थ’ (दहाव्या महिन्याचा दहावा दिवस) हा क्रांतिदिन धुमधडाक्याने साजरा केला जातो.        

         

देशपांडे, सु. र.