वुल्फ्रॅमाइट : (वुल्फ्रॅम, वुल्फ्रॅमाइन, टोबॅको जॅक). टंगस्टनाचे खनिज. स्फटिक एकनताक्ष, आखूड प्रचिन, प्रचिनावर उभ्या रेघा [→ स्फटिकविज्ञान ]. स्तंभाकार, पात्यासारख्या पटलित किंवा संपुंजित कणमय रूपातही हे आढळते. ⇨ पाटन : (010) उत्कृष्ट. रंग तपकिरी, तांबूस तपकिरी वा करडसर काळा. कस तपकिरी काळा. चमक काहीशी  धातूसारखी ते राळेसारखी मंद पाटनपृष्ठाची चमकदार. दुधी काचेप्रमाणे काहीसे पारभासी ते अपारदर्शक. भंजन खडबडीत [→ खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ५–५.५. वि. गु . ७–७.५८ (लोखंडाच्या प्रमाणानुसार वाढते). रा. सं. (Fe, Mn) WO4. काळे फेरबेराइट (FeWO4) व तपकिरी ह्युब्नेराइट (MnWO4) या टंगस्टेटांच्या मालेतील सर्व खनिजे यात येतात. हे अम्लात विरघळत नाही व याचा उकळबिंदू उच्च (३,४१०० से.) आहे.

सापेक्षतः विरळ असलेले हे खनिज पेग्मटाइट भित्तींत व ग्रॅनाइटाशी निगडित असलेल्या जलतापीय (उच्च तापमानाच्या पाण्याच्या क्रियेने बनलेल्या) क्वॉर्ट्‌झ शिरांत तसेच सल्फाइड शिरांत व प्लेसर निक्षेपांत थोड्या प्रमाणात आढळते. कॅसिटेराइट, शीलाइट, क्वॉर्ट्‌झ, पायराइट, गॅलेना, स्फॅलेराइट व आर्सेनोपायराइट या खनिजांबरोबर हे आढळते. बोहीमिया, सॅक्सनी, कॉर्नवॉल इ. ठिकाणी याचे चांगले स्फटिक आढळतात. चीन, म्यानमार (ब्रह्मदेश), बोलिव्हिया, चिली, न्यू साउथ वेल्स, मले द्वीपकल्प, ऑस्ट्रेलिया, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी इ. प्रदेशांत याचे साठे असून याचा जवळजवळ निम्मा पुरवठा चीनकडून होतो. भारतात राजस्थान (जोधपूर व नागौर जिल्हे) व बंगाल (बांकुरा जिल्हा) येथे हे थोड्या प्रमाणात आढळते.

टंगस्टन या धातूचे हे सर्वांत महत्त्वाचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) आहे. यापासून टंगस्टन धातू, टंगस्टन कार्बाइड व अन्य रसायने बनवितात व त्यांचे पुढील उपयोग होतात : धातू कठीण करण्यासाठी (उदा., उच्च वेगी हत्यारे, झडपा, स्प्रिंगा, छिन्न्या, कानसी इइ. बनविण्यासाठी) टंगस्टन कार्बाइड हे हिऱ्याखालोखाल कठीण असून त्याचा उपयोग कर्तन हत्यारे, दगड वा काँक्रीटला भोक पाडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वेधन यंत्रांचे फाळ, कठीण पृष्ठभाग इत्यादींमध्ये होतो. तोफेसारखी युध्दसामग्री, विजेचे दिवे, रंगलेप, मृत्तिका व कागद उद्योग, इलेक्ट्रॉनीय उपकरणे वगैरेंमध्येही टंगस्टन व त्याची संयुगे वापरतात. वुल्फ्रॅमाइट हा शब्द मूळ जर्मन शब्दावरून आला असावा, असे काहींचे मत आहे. टंगस्टन या मूलद्रव्याचे W हे रासायनिक चिन्ह या खनिजावरून आलेले आहे.

पहा : टंगस्टन                                    

ठाकूर, अ. ना.