वुल्फ, आर्थर : ( ? – २६ ऑक्टोबर १८३७). ब्रिटिश खाणकाम अभियंते. वाफेचा वापर करणाऱ्या अनेक सिलिंडरांच्या विस्थापन प्रकारच्या एंजिनाला वाफेचे संयुक्त एंजिन म्हणतात व यात प्रसरण अनुक्रमाने (लागोपाठ) होते. या प्रकारच्या एंजिनाच्या विकासाचे काम करणारे वुल्फ हे एक अग्रणी अभियंते होत.

प्रारंभी काही काळ सुतारकाम केल्यानंतर वुल्फ यांनी इंग्रज संशोधक व अभियंते जोझेफ ब्रामा (१७४८–१८१४) यांच्यासाठी कार्य केले. लंडन येथील एका मद्यनिर्मिती केंद्रात अभियंते म्हणून काम करीत असतानाच वुल्फ यांनी वाफेच्या शक्तीचा उपयोग करून घेण्याविषयीचे प्रयोग करण्यासही सुरूवात केली. १८०४-०५ साली त्यांनी ज्याच्या सिलिंडरात वाफ प्रथम प्रसरण पावू दिली जाते अशा ‘वुल्फ उच्च दाब संयुक्त एंजिना’चे एकस्व (पेटंट) घेतले. त्या एंजिनाची ऊष्मीय कार्यक्षमता ७.५ टक्के म्हणजे जेम्स वॉट (१७३६-१८१९) यांच्या प्रसरण एंजिनाच्या (दट्ट्या व सिलिंडर प्रकारच्या अशा एंजिनात संपीडित म्हणजे दाब दिलेली वाफ किंवा हवा प्रसरण पावू दिली जाऊन थंड केली जाते) कार्यक्षमतेच्या जवळजवळ दुप्पट आहे. १८१० मध्ये वॉट यांचे एकस्व संपुष्टात आल्यावर वुल्फ यांनी जोनाथन हॉर्नब्लोअर (१७१७-८०) आणि त्यांचे पुत्र जोनथान कार्टर (१७५३-१८१५) यांच्या १७८१ साली एकस्व मिळालेल्या पश्चाग्र गतीच्या संयुक्त एंजिनाचे पुनरुज्जीवन करून त्यात सुधारणा केल्या. खाणीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी आपल्या एंजिनाचा उपयोग करण्याच्या हेतूने १८१२ साली वुल्फ कॉर्नवॉलला परत आले. त्यांच्या एंजिनांचा मोठ्या प्रमाणावर असा वापर होऊ लागला. मात्र त्यापुढील दशकात रिचर्ड ट्रेव्हिथिक (१७७१-१८६३) यांच्या अधिक कार्यक्षम उच्च दाब एंजिनांमुळे वुल्फ एंजिने मागे पडली.

गर्न्सी या इंग्लिश खाडीतील बेटावर वुल्फ यांचे निधन झाले.

कुलकर्णी, सतीश वि.