स्क्रू : गोल दांड्याच्या किंवा जाड तारेच्या पृष्ठभागावर त्रिकोणी किंवा चौकोनी आकाराचे सर्पिलाकार किंवा मळसूत्री खाचे पाडले, तर दांड्यावर मळसूत्री ( बाहेरचे ) आटे उत्पन्न होतात, अशा आटे पाडलेल्या दांड्याला स्क्रू म्हणतात. असा स्क्रू त्याच प्रकारचे आतले आटे असलेल्या भोकावर बसवून फिरविला म्हणजे स्क्रूवरचे आटे भोकातील खाचांमध्ये तिरप्या दिशेने पुढे पुढे घुसतात व त्यामुळे पाचर बसविल्याप्रमाणे अडकून बसतात.

उद्योगधंद्यात वापरण्यात येणारे बोल्ट व नट यांमध्ये स्क्रूच्या तत्त्वाचा उपयोग केलेला असतो. बोल्ट व नट यांचा उपयोग करून दोन वस्तू एकत्र जोडून ठेवता येतात व वाटेल तेव्हा त्या वेगळ्या करता येतात. स्क्रूचा उपयोग यूरोपमधील औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपासून होऊ लागला, तरी स्क्रूला प्रमाणबद्ध करण्याचे ( मानकीकरणाचे ) काम विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाले आहे. स्क्रू प्रमाणबद्ध केल्यामुळे एका  स्क्रूच्या जागी अगदी त्याच तर्‍हेचा स्क्रू घालता येतो व त्यामुळे जोडकाम करताना अडचण पडत नाही.

आ. १. यंत्रभाग जोडण्याकरिता स्क्रूचा उपयोग

दोन भाग जोडावयाचे असताना काही ठिकाणी नट वापरता येत नाही. तेथे एका वस्तूमध्ये भोक पाडून त्याच्या आतील पृष्ठभागावर स्क्रूला जुळतील असे आतले आटे पाडतात व स्क्रूचे आटे अशा भोकातील आट्यांंमध्ये घुसवून वस्तू आवळून धरण्याचे काम करता येते.

आ. १ मध्ये आ आणि इ या दोन वस्त एकत्र जोडण्याकरिता अ हा स्क्रू कसा वापरतात हे दाखविले आहे. इ या भागामध्ये योग्य आकाराचे भोक पाडून त्यामध्ये आटे पाडलेले आहेत. हे आटे अ स्क्रूवरील आट्यांप्रमाणेच आहेत. आ भागावर अ हा स्क्रू सहज आत जाईल असे साधे भोक पाडतात. आ हा भाग इ या भागावर ठेवून अ हा स्क्रू आ वरील भोकातून आत सरकवून इ वरच्या आटे पाडलेल्या भोकामध्ये फिरवून घुसवितात. स्क्रूचे डोके आ भागावर येऊन टेकेपर्यंत स्क्रू फिरविता येतो. स्क्रूचे डोके आवळले म्हणजे डोक्याखाली आ व इ दोन्ही भाग एकत्र दाबून ठेवले जातात.

सव्य व अपसव्य आटे : स्क्रूचे आटे उजवीकडे वळून अक्षीय दिशेने पुढे जात असतील, तर त्यांना सव्य आटे म्हणतात व डावीकडे वळून पुढे जात असतील, तर त्यास अपसव्य आटे म्हणतात.

आ. २. सव्य आणि अपसव्य आटे

आ. २ मध्ये अ हा स्क्रू सव्य आट्याचा व आ हा स्क्रू अपसव्य आट्याचा आहे. सव्य आट्याचा स्क्रू डोक्याकडून उ ज वी क डे फिरविला म्हणजे भोकामध्ये घुसत घुसत पुढे जातो परंतु अपसव्य आट्याचा स्क्रू त्याचप्रमाणे उजवीकडे फिरविला, तर भोकातून परत मागे मागे येतो. अपसव्य आट्याचा स्क्रू भोकामध्ये घुसवावयाचा असला म्हणजे त्याला डावीकडे फिरवावे लागते. सव्य आट्याच्या स्क्रूकरिता सव्य  आटे पाडलेले भोकच उपयोगी पडते व अपसव्य आट्याच्या स्क्रूकरिता अपसव्य आटे पाडलेले भोक लागते. सर्वसाधारणपणे उपयोगात येणारे स्क्रू सव्य आट्याचे असतात. फिरणार्‍या चाकावर बसवावयाचे स्क्रू फिरून फिरून सैल होण्याची शक्यता असते. म्हणून तेथे अपसव्य आट्याचे स्क्रू बसवितात. म्हणजे फिरत असताना असे स्क्रू आपोआप जास्त घट्ट होत जातात.

एकेरी व बहुमार्गी आटे : स्क्रूवर पडलेले आटे एकच मळसूत्री खाच पाडून किंवा अनेक वेगवेगळ्या मळसूत्री खाचा पाडून उत्पन्न करता येतात. या अनेक खाचा एकमेकींस अगदी समांतर असतात.

आ. ३. चौकोनी आटे ( दुहेरी )

स्क्रू भोकामध्ये बसवीत असताना स्क्रूचा एक फेरा झाला म्हणजे तो स्क्रू आपल्या दोन आट्यांमधील अंतराइतका पुढे जातो. या अंतरास स्क्रूचा गाळा असे म्हणतात. एकेरी आटे असलेला स्क्रू साधारणपणे हळूहळू पुढे जाणारा असतो. स्क्रू लवकर पुढे जावा व लवकर मागे आणता यावा अशी योजना करावयाची असली, तर त्या स्क्रूवर बहुमार्गी आटे पाडतात. अशा आट्यांमधील गाळ्याचे अंतर जास्त असते, त्यामुळे स्क्रू एका फेर्‍यात लवकर पुढे जातो. आ. ३ मध्ये चौकोनी आकार असलेले दोन वेगळे वेगळे खाचे पाडून उत्पन्न केलेले सव्य प्रकारचे अ आणि ब हे आटे कसे दिसतात ते दाखविले आहे. अशा दुहेरी आट्यांंमुळे स्क्रूच्या एका फेर्‍यात अक्षीय दिशेने पुढे जाण्याचे अंतर एकेरी आट्याच्या अंतरापेक्षा दुप्पट आहे, हे दिसून येईल.

काचेच्या अथवा मातीच्या बरण्यांच्या झाकणामध्ये तसेच फाऊंटन पेनमध्ये उत्पन्न केलेले आटे बहुमार्गी असतात. त्यामुळे ही झाकणे चटकन उघडता, अगर बंद करता येतात. बहुमार्गी आटे धातूवर पाडावयाचे असतील तेव्हा साधारणतः चौकोनी आकाराचे पाडतात; परंतु मातीच्या किंवा काचेच्या भांड्यावर बहुमार्गी आटे पाडताना त्यांचा आकार गोल ठेवतात. त्यामुळे असे आटे लवकर खराब होत नाहीत.

आट्यांची प्रमाणबद्धता : निरनिराळ्या देशांमध्ये प्रमाणबद्धता ठरविण्यासाठी निरनिराळी मापे उपयोगात आणली गेली. त्यामुळे प्रचारात असलेल्या स्क्रूमध्ये पुष्कळ प्रकार पहावयास मिळतात.

आ. ४. (१) आट्यांमधील गाळा, (२) आट्यांमधील सूत्रकोन.

आ. ४ मध्ये आट्यांमधील गाळ्याचे अंतर व आट्यांमधील सूत्र-कोन आणि आ. ५ मध्ये निरनिराळ्या आट्यांचे छेद दाखविले आहेत.

( आ. ४ व ५ मध्ये क व ख ही अंतरे ).

 

 

प्रचारात असलेल्या मुख्य प्रकारच्या स्क्रूंची मापे

मानक-नाम आट्यांमधील

सूत्रकोन

अंतर ‘ ख ’
१. आय्. एस्. इंडियन स्टँडर्ड ( मेट्रिक ) } ६० क X १/८
२. युनिफाइड ( यू. एस्. ए. यू. के. कॅनडा )
३. एस्. आय्. ( सिस्टिम इंटरनॅशनल )
४. बी. एस्. डब्ल्यू. ( ब्रिटिश ) } ५५ क X १/६
५. बी. एस्. पी. ( ब्रिटिश )
६. बी. एस्. एफ्. ( ब्रिटिश )
७. बी. ए. ( ब्रिटिश ॲसोसिएशन ) ४७ १/२ क X र ०.४३३
८. लोवेनहर्झ ( जर्मन ) ५३– ८’ क X १/८

आ. ५. निरनिराळ्या आट्यांचे छेद : ( अ ) चौकोनी आटे, ( आ ) ॲक्मी आटे, ( इ ) बट्रेस आटे, (ई) गोल आटे.स्क्रू भोकामध्ये बसवीत असताना त्याचा एक फेरा झाला म्हणजे तो स्क्रू त्याचे आटे पाडल्यानंतर मूळ दांड्याच्या व्यासावर कसा फेरफार होतो ते आ. ६ मध्ये दाखविले आहे. मूळ दांड्याच्या व्यासाला सामान्य व्यास म्हटले तर स्क्रूच्या आट्याच्या टोकावरील व्यासाला आट्याचा बाह्य व्यास म्हणतात व त्याच्या आट्याच्या खाचेतील  व्यासाला आट्याचा आतील व्यास म्हणतात.

आ. ६. स्क्रू : (१) सामान्य व्यास, (२) आतील व्यास, (३) बाह्य व्यास, (४) सूत्रकोन.स्क्रूचे माप सांगण्याकरिता स्क्रूच्या सामान्य व्यासाचा निर्देश करतात. स्क्रू पाडलेला भाग, त्यातील आट्यावर थोडी गोलाई दिल्यामुळे मूळ व्यासापेक्षा किंचित कमी व्यासाचा होतो. आट्यावर थोडी गोलाई दिली म्हणजे स्क्रू वापरताना घर्षणामुळे होणारी झीज कमी होते व स्क्रू सरकविण्याचे काम सोपे होते. आट्यांची संख्या साधारणत: मूळ दांड्याच्या व्यासावर अवलंबून असते व व्यासाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे तीन सेंमी. व्यासाच्या दांड्यावर अक्षीय दिशेने दर सेंमी. अंतरामध्ये जर तीन आटे पाडलेले असतील, तर दोन सेंमी. व्यासाच्या दांड्यावर दर सेंमी. अंतरामध्ये चार आटे पाडलेले असतील व एक सेंमी. व्यासाच्या दांड्यावर दर सेंमी. अंतरामध्ये सहा आटे पाडलेले असतील. मूळ दांड्याचा व्यास व त्यावर पाडावयाचे आटे यांचेही मानक प्रत्येक देशाने ठरविले आहे.


विशेष आकारांचे स्क्रू : सर्वसाधारण स्क्रू त्रिकोणी आकाराचे असतात; परंतु विशेष कामांसाठी विशेष आकार दिलेले स्क्रू वापरणे सोईचे होते.

चौकोनी आकाराचे आटे : यांची रचना आ. ३ आणि ५ ( अ ) मध्ये दाखविली आहे. अशा आट्यांची संख्या त्रिकोणी आट्यांच्या संख्येच्या अर्धी असते. म्हणजे दर सेंमी. अंतरामध्ये सहा त्रिकोणी आटे असतील, तेथे तीनच चौकोनी आटे पडतील. चौकोनी आटे त्रिकोणी आट्यांपेक्षा मजबूत असतात. म्हणून दाब देण्याच्या यंत्रावर किंवा वजन उचलण्याच्या यंत्रावर असे आटे वापरतात. चौकोनी आट्यांची पकड त्रिकोणी आट्यांइतकी घट्ट ठेवीत नाहीत. चौकोनी आट्याचा स्क्रू वारंवार पुढे-मागे फिरवावा लागला, तरी घर्षणामुळे त्याची फारशी झीज होत नाही व स्क्रू फिरवावयाला फारसा जोरही लागत नाही.

ॲक्मी आटे : यांचा आकार आ. ५ ( आ ) मध्ये दाखविला आहे. हा आकार काहीसा चौकोनी व त्रिकोणी प्रकारांचे मिश्रण केल्यासारखा आहे. या आट्यांचा उपयोग चौकोनी आट्यांच्या जागी करता येतो. या आट्यांची संख्या चौकोनी आट्यांप्रमाणेच असते. यांचा विशेष उपयोग लेथ यंत्रावरील हत्यारधारकांना सरकविण्यासाठी करतात. हत्यारधारकाला जोडलेला नटाचा कापलेला भाग अशा आट्यांमध्ये सहज घुसविता वा बाहेर काढता येतो. त्यामुळे हत्यारधारक स्क्रूच्या अक्षीय दिशेने एकदम चालू करता येतो किंवा एकदम थांबविता येतो.

आ. ७. भार ( बोजा ) उचलणारे स्क्रू यंत्र : (१) भार, (२) नट,(३) दांडे, (४) स्क्रू, (५) बैठक, (६) टोपी.

बट्रेस आटे : आ. ५ ( इ ) मध्ये असे आटे दाखविले आहेत. हा आकार साधारण करवतीच्या दातासारखा दिसतो. या आट्यांची उभी बाजू चौकोनी आट्यांप्रमाणे शक्तिप्रेषक म्हणून उपयोगी पडते आणि दुसरी उतरती बाजू स्क्रू परत मागे घेण्यासाठी उपयोगी पडते. वस्तू पकडण्याच्या शेगड्यामध्ये असे आटे असलेला स्क्रू वापरतात.  गोल आटे : आ. ५ ( ई ) मध्ये असे आटे दाखविले आहेत. या आट्यांमध्ये कोपरे नसल्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. काचेच्या व मातीच्या वस्तूंवर असे आटे पाडणे विशेष सोयीचे होते.

स्क्रूचा विशेष उपयोग करणारी यंत्रे : स्क्रू जॅक : या यंत्राच्या  साहाय्याने साधारण माणसास देखील मोठे वजन उचलणे शक्य होते.

आ. ७ मध्ये असे यंत्र दाखविले आहे. यामध्ये ५ हा भाग यंत्राची बैठक असून ती जमिनीवर स्थिर राहते. या भागातच २ या ठिकाणी आंतर आटे पाडलेले असतात व त्यांमधून ४ हा स्क्रू फिरवून वर-खाली सरकविता येतो. या स्क्रूवर सव्य प्रकारचे चौकोनी आकाराचे आटे पाडलेले असतात. हा स्कू्र हाताने फिरविण्याकरिता त्याच्या डोक्याकडील भागावर दोन्हीकडे दोन दांडे बसविलेले आहेत. हे दांडे बाणाच्या दिशेने फिरविले म्हणजे स्क्रू वर सरकतो व स्क्रूच्या डोक्यावर ठेवलेले वजन वर उचलले जाते. स्क्रूच्या डोक्यावर ६ ही टोपी सैलसर बसविलेली असते. त्यामुळे स्क्रूचे डोके फिरविले तरी टोपीमुळे वजन फिरण्याची शक्यता राहत नाही व त्यामुळे कसल्याही प्रकारचे वजन उचलणे शक्य होते.

स्क्रू यंत्राचा लाभ आणि कार्यक्षमता : स्कू्र जॅकमधील स्कू्रचा सूत्रकोन 0° आहे. वजन उचलण्यास जर इतकी प्रेरणा लावावी लागत असेल, तर घर्षणाचा विचार न करता द = व . स्प 0 इतका असेल [ येथे स्प म्हणजे त्रिकोणमितीतील स्पर्शक (tangent tan)].

आ. ८. स्क्रू यंत्राचा लाभ आणि कार्यक्षमता :० = सूत्रकोन, व = वजन, द = प्रेरणा.

ही प्रेरणा साधारणतः स्क्रूच्या अक्षाभोवती इतक्या त्रिज्येवरून लावली, तर स्क्रू फिरवणारे  परिपीडन X इतके. होईल म्हणजे व . स्प 0. र इतके होईल. नेहमी उपयोगात येणार्‍या स्क्रू यंत्रामध्ये घर्षण हे एक महत्त्वाचे अंग असते. घर्षणाचा विचार केला म्हणजे स्क्रूचे परिपीडन या समीकरणाने दाखवितात. यामध्ये µ हे घर्षण गुणक.

व . र X स्प 0 + µ
१-µस्प 0 

अशा यंत्रांची कार्यक्षमता (η ) पुढील समीकरणाने काढता येते.

η = स्प 0 १-µस्प 0
स्प 0 + µ

अशा यंत्रांचा यांत्रिक लाभ ५० पटीपर्यंत असतो. म्हणजे माणसाने २० किग्रॅ. प्रेरणा लावली, तर त्याला २० X ५० = १,००० किग्रॅ. वजन उचलता येईल.

आ. ९. स्क्रूचे दाबयंत्र : (१) दांडे, (२) नट, (३) स्क्रू, (४) पाट,(५) बैठक.

स्क्रूचे दाबयंत्र : अशा प्रकारचे एक यंत्र आ. ९ मध्ये दाखविले आहे. यामध्ये ५ ही यंत्राची बैठक आहे व ती स्थिर राहते. या भागामध्येच २ या जागी आतील आटे पाडलेले असतात  व त्यामधून ३ हा स्क्रू फिरवून वर-खाली सरकविता येतो. स्क्रूच्या डोक्यावर दोन्हीकडे दोन दांडे १ याप्रमाणे बसविलेले असतात. हे दांडे स्क्रूच्या माथ्याच्या बाजूने उजवीकडे फिरविले म्हणजे स्क्रू वर-खाली सरकतो व ४ या पाटावर दाब देतो. पाटाखाली पुस्तकासारखी वस्तू ठेवली, तर तिच्यावर स्क्रू फिरवून पाहिजे तसा दाब देता येतो. स्क्रू फिरत असला, तरी पाट फिरण्याची शक्यता नसते. अशा स्क्रूवर बहुधा चौकोनी आकाराचे आटे पाडलेले असतात.

आ. १०. ( अ ) सव्य व अपसव्य आट्यांची ताणकडी लावलेला विजेचा खांब, ( आ ) सव्य व अपसव्य ताणकडीचा मोठा करून दाखविलेला भाग : (१) वरील तार, (२) खालील तार, (३) नट.

स्क्रू वाहक : स्क्रूच्या तत्त्वाचा उपयोग करून कारखान्यातील वस्तू सरकविण्याकरिता स्क्रू वाहक यंत्र वापरतात. या यंत्रामध्ये मधोमध एक दांडा बसविलेला असतो व या दांड्याभोवती मजबूत जाड पत्र्याचा आटा स्क्रूच्या आट्याप्रमाणे मळसूत्रामध्ये बसविलेला असतो. अशा रीतीने बनविलेल्या स्क्रूभोवती पत्र्याचेच कवच बसविलेले असते.यंत्रातील मधला स्क्रू फिरविला म्हणजे स्क्रूच्या एका टोकाकडून वस्तूआत ओढली जाते व दुसर्‍या टोकाकडून ती वस्तू बाहेर ढकलली जाते. आत आलेली वस्तू गोल जिन्यावरून गेल्याप्रमाणे हळुहळू पुढे सरकत जाते.

सव्य-अपसव्य आट्यांचा स्क्रू दांडा : आ. १० मध्ये अशा दांड्याचा उपयोग दाखविला आहे. विजेच्या तारा किंवा दूरध्वनी नेणार्‍या तारा खांबांवरून नेतात. असे खांब काही ठिकाणी ताणून धरावे लागतात. खांबाच्या वरच्या भागाला बांधलेली साधी तार जमिनीकडे ओढून धरण्याकरिता अशा स्क्रू दांड्याचा उपयोग होतो. आ. १० मध्ये दाखविल्याप्रमाणे १ ही वरील तार त्या बाजूकडील ३ या कांबीसारख्या नटाला बांधलेली असते व २ ही खालील तार जमिनीमध्ये पुरलेल्या दांड्याला बांधलेली असते. मधील दांडा पान्याने बाणाच्या दिशेने फिरविला म्हणजे दोन्हीकडील ३ या कांबीचे नट दांड्याच्या मध्याकडे ओढले जातात व त्यामुळे खांबाचे वरचे टोक जमिनीकडे ताणले जाते. असे काम एका माणसास सहज करता येते.


आ. ११. स्क्रूचे प्रकारस्क्रूचे प्रकार : आ. ११ ( अ ) मध्ये स्क्रूचे तीन प्रकार दाखविले आहेत. या सर्वांचे खालचे भाग एकसारखेच असतात; परंतु डोक्याकडील भागांमध्ये फरक असतो.  स्क्रू आवळण्यासाठी पेचकस बसावा अशी खाच सर्व स्क्रूच्या माथ्यांवर ठेवतात. आ. ११ ( अ ) मधील १ व २ या स्क्रूची माथी पकडलेल्या भागांच्या वरच्या बाजूस राहतात परंतु ३ या स्क्रूचा माथा पकडलेल्या भागाच्या आत जातो. स्क्रूची खालची टोके काही वेळा निमुळती केलेली असतात किंवा त्यांवर किंचित गोलाई दिलेली असते [आ. ११ ( आ )]. असे केल्याने स्क्रू भोकामध्ये बसविताना सोयीचे होते. मशीन स्क्रू म्हणून स्क्रूचा एक प्रकार आहे. त्यामध्ये दांड्याच्या सर्व भागावर आटे पाडलेले असतात व स्क्रूचे सर्व काम उत्तम दर्जाचे केलेले असते.

पकड स्क्रू : ( सेट स्क्रू ). आ. १२ ( अ ) मध्ये दाखविल्याप्रमाणे लहान चाक (१) दांड्यावर (२) घट्ट बसविण्याकरिता अशा स्क्रूचा उपयोग करतात. अशा स्क्रूचे बरेच प्रकार आहेत. त्यांतील मुख्य प्रकार आ. १२ ( आ ) मध्ये दाखविले आहेत आणि आ. १२ ( इ ) मध्ये अशा स्क्रूचा उपयोग चाकाला किंवा कप्पीला आधार देण्यासाठी धारवा ( बेअरिंग ) म्हणून देखील करता येतो, हे दाखविले आहे.

तीक्ष्ण दाताचे स्क्रू : साधारण स्क्रू बसविण्याकरिता आंतर आटे पाडलेला भाग वस्तूमध्ये तयार करावा लागतो परंतु काही ठिकाणी भोकामध्ये आटे पाडणे सोयीचे नसते. पत्र्यांचे जोडकाम करण्याकरिता फक्त साधी भोके पाडतात व त्यांमध्ये तीक्ष्ण दातांचे स्क्रू फिरवून बसवितात. स्क्रू फिरत असताना त्यांवरील आट्यांच्या तीक्ष्ण धारेने पत्र्यांच्या भोका-मध्ये आटे पाडले जातात व स्क्रू त्या आट्यांमध्ये अडकून घट्ट बसतो.

लाकडी कामात वापरण्याचे स्क्रू हे थोडे वेगळ्या तर्‍हेने तयार करतात. यात वरचा दांडा थोडासा निमुळता केलेला असतो व आट्यांचा गाळा साध्या स्क्रूच्या गाळ्यापेक्षा मोठा असतो. असे स्क्रू लाकडात बसविताना लाकडामध्ये योग्य आकाराचे भोक पाडतात व त्यामध्ये स्क्रू दाबून फिरविला  म्हणजे स्क्रूवरील आटे लाकडाच्या भोकात पाहिजे तसे आटे पाडीत जातात व त्या आट्यां-मध्येच अडकून बसतात.

लाकडी कामाकरिता लागणार्‍या स्क्रूचेही सर्व प्रमाण ठरलेले असते. असे  स्क्रू १० मिमी. पासून ८० मिमी. पर्यंत लांबीचे मिळतात व त्यांचा व्यास २ मिमी. पासून १० मिमी.पर्यंत असतो.

आ. १२. ( अ ) दंड व लहान चाक जोडणारा स्क्रू : (१) लहान चाक, (२) दांडा. ( आ ) स्क्रूचे मुख्य प्रकार, ( इ ) कप्पीला आधार देणारे स्क्रू : (१) कप्पी.

सर्व प्रकारचे स्क्रू तयार करण्यासाठी विशेष प्रयोजी स्क्रूनिर्मिती यंत्रे वापरतात परंतु काही ठिकाणी हाताने बन-विण्याची सोय करावी लागते. स़्क्रूवरील आटे पाडण्याकरिता नटासारखे बहिःसूत्रक ( डाय ) हे हत्यार वापरतात. नटामधील आटे पाडण्याकरिता अंतःसूत्रक ( टॅप ) हे स्क्रूसारखेच हत्यार वापरावे लागते.

स्क्रूचे बरेच प्रकार असतात. भारतीय मानकांप्रमाणे (१३३०—१९५८) स्क्रूची मूळ बाह्य रूपरेखा आ. १४ मध्ये दिली आहे.  स्क्रूचा व्यास व त्यावरील गाळ्याचे अंतर दाखविणारी कोष्टके असतात.

आ. १३. ( अ ) तीक्ष्ण दाताचे स्क्रू, ( आ ) लाकडी कामातील स्क्रू.इतिहास : काही इतिहासकारांच्या मते ग्रीक तत्त्वज्ञ, वैज्ञानिक व गणिती आर्किटास (  इ. स. पू. सु. ४००—३५० ) या प्लेटो यांच्या मित्राने स्क्रूचा शोध लावला. आर्किटास यांनी कप्पीचाही शोध लावल्याचे मानतात. प्राचीन ग्रीक लोक विविध कामांसाठी स्क्रू वापरीत असत. ग्रीक गणिती आणि संशोधक ⇨ आर्किमिडीज ( इ. स. पू. सु. २८७—२१२) यांनी पाणी वर चढविण्याचे एक यंत्र तयार केले व त्यात स्क्रूचे तत्त्व वापरले होते. या आर्किमिडीज स्क्रूमध्ये एक मोठा स्क्रू पत्र्याच्या नळकांड्यात तयार केला होता. या प्रयुक्तीचे खालील टोक पाण्यात बुडवितात व त्यातील स्क्रू हस्तकाने योग्य दिशेने फिरवितात. यामुळे नळकांड्याच्या खालच्या तोंडातून पाणी आत शिरते व मधल्या दांड्याभोवती मळसूत्राप्रमाणे ( स्क्रूप्रमाणे ) बसविलेल्या पत्र्याच्या पडद्यांवरून हळूहळू वर चढत जाते व शेवटी नळकांड्याच्या वरच्या  तोंडातून बाहेर पडते [⟶ आर्किमिडीज स्क्रू ]. प्राचीन ग्रीक लोकांनी स्क्रूचे दाबयंत्रही बनविले होते. या यंत्रात दोन सपाट पृष्ठभाग स्क्रूंनी जोडलेले होते. स्क्रू जसजसे घट्ट केले जातात, तसतसे हे पृष्ठभाग अधिकाधिक एकमेकांजवळ येतात आणि या दोन पृष्ठभागांमध्ये ठेवलेल्या वस्तूवरील दाब वाढत जातो. मद्य तयार करण्यासाठी द्राक्षे या दाबयंत्रात ठेवून ग्रीक लोक त्यांचा रस काढीत असत. तसेच ऑलिव्ह फळे त्यात ठेवून ऑलिव्ह तेल मिळवीत असत.

 

 

 

 

आ. १४. मेट्रिक स्क्रूच्या ( भारतीय मानक १३३०—१९५८ ) त्रिकोणी आट्यांची मूळ बाह्य रूपरेखा : (१) मोठा व्यास, (२) गाळ्याचा व्यास, (३) लहान व्यास, (४) स्क्रूच्या आट्याचा अक्ष पी-गाळा, एच्-व्यास, ( एच् = ०.८६६०३ पी एच्/४ = ०.२१६५१ पी एच्/८ = ०.१०८२५ पी ५/८ एच् = ०.५४१२७ पी ).

अनेक शतके हाताने वापरावयाच्या साध्या हत्यारांच्या मदतीने स्क्रू तयार करीत असत. १५००—१६०० या काळात अभियंत्यांनी स्क्रू-कर्तन लेथ हे यंत्र तयार केले. या यंत्रामुळे लाकडी वा धातूचे स्क्रू अधिक कार्यक्षम रीतीने व अचूकपणे बनविता येऊ लागले. नंतर खुंट्या व खिळे यांच्याऐवजी स्क्रू वापरण्यात येऊ लागले. त्यांच्यामुळे बिजागिर्‍यांसारखे धातूचे भाग लाकडाला जोडण्यात येऊ लागले. तसेच कुलपे, घड्याळे इ. वस्तूंमधील सुटे भाग एकत्र धरून ठेवण्यासाठी स्क्रूचा उपयोग सुरू झाला. अधिक सूक्ष्म व अचूक आटे पाडण्याच्या तंत्रांमध्ये प्रगती झाल्याने १७५० च्या सुमारास प्रथम स्क्रूचे प्रमाणभूत आटे प्रचलित होण्यास सुरुवात झाली. अठराव्या शतकातच लाकडात सहजपणे घुसवून पिळता येण्यासारखे तीक्ष्ण टोकदार स्क्रू पुढे आले. पूर्वीच्या काळी सर्व स्क्रूंची टोके ( माथे ) सपाट होती आणि खास प्रकारे पाडलेल्या भोकांत स्क्रू पिळून घुसवीत असत.

पहा : आटे पाडणे; धातु व अधातूंचे जोडकाम; पंप; बांधकाम, लाकडाचे; बोल्ट व नट.

संदर्भ : 1. Parmley, R. D. Standard Handbook of Fastening and Joining, 1997.

2. Phillips ,J . Freedom in Machinery, Vol.1 : Introducing Screw Theory, 1984 Vol. 2 : Screw Theory Exemplified, 1990.

3. Shingley, J. E. Mischke, C. R. Fastening, Joining and Connecting : A Mechanical Designers Handbook, 1989.

आर्विकर, जे. एस्.