कानसकाम :  कानशीचा उपयोग मुख्यत: धातूच्या वस्तू घासण्याकरिता होतो. धातूचे चपटे भाग मापापेक्षा किंचित जाड असतील, तर ते कानशीने घासून त्यांची जाडी कमी करता येते. गोल दांडे त्यांच्या भोकात शिरत नसतील, तर त्यांचा व्यास कानशीने घासून कमी करता येतो किंवा भोक आतून घासून त्याचा व्यास वाढवता येतो. धातूचा खडबडीत भाग घासून गुळगुळीत करता येतो. कानशीचे घासकाम हाताने करावे लागते. हे घासकाम करण्यात कौशल्य व अनुभव लागतो.

कानशी उच्च कार्बनी पोलादाच्या बनवलेल्या असतात. त्यांच्या पृष्ठभागावर करवतीच्या दातांसारखे असंख्य बारीक दात पाडलेले असतात व ते मुद्दाम कडक केलेले असतात. कानस दुसऱ्या धातूच्या पृष्ठभागावर दाबून पुढे रेटीत नेली म्हणजे कानशीचे दात दुसऱ्या धातूच्या आत शिरून तिच्यावर नांगरल्याप्रमाणे चरे पाडीत जातात. आ. 1 घासण्याची सामान्य पद्धतीआ. 1

आ. 1 घासण्याची सामान्य पद्धती

घासण्याची सामान्य पद्धतीपुढील दातांनी पाडलेले चरे मागून येणारे दात छेदून जातात व नवे चरे पाडतात. अशा रीतीने घासलेल्या पृष्ठभागावर असंख्य चरे पडून पृष्ठभागावरच्या एका थराचे सर्व कण उकरले जातात व मूळ धातूपासून सुटे पडतात. हे सुटे कण तारेच्या ब्रशाने झाडून दूर सारता येतात. घासण्याची वस्तू लहान असेल, तर ती शेगड्यामध्ये घट्ट ठेवावी लागते. घासकाम करताना एका हाताने कानशीचे पुढचे टोक वस्तूवर दाबून धरतात व दुसऱ्या हाताने कानशीचे मागील टोक किंवा टोकावर बसवलेली मूठ पकडतात. नंतर दोन्ही हातांनी सारखा दाब देऊन कानस शक्य तितकी आडव्या पातळीतच पुढे रेटीत नेतात (आ. १). कधी उजवीकडे तिरपे व कधी डावीकडे तिरपे असेही आलटून पालटून घासण्याचे काम चालू ठेवतात. शेवटच्या गुळगुळीत पृष्ठभागाकरिता कानस दोन्ही हातांत आडवी धरून वस्तूच्या पृष्ठभागावर घासतात (आ. २). या क्रियेस आडवे कानसकाम म्हणतात.

प्रती सेंमी लांबीत असणाऱ्या दातांच्या संख्येनुसार कानशींचे खरबरीत, मध्यम, बॅस्टर्ड आणि सूक्ष्म असे प्रकार असतात. कानशीच्या छेदाच्या आकारावरून चपटी, चौकोनी, त्रिकोणी, गोल, अर्धगोल, चाकूच्या पात्यासारखी वगैरे प्रकार होतात. सामान्यत: कानशीची लांबी १० ते ५० सेंमी पर्यंत असते. [→ हत्यारे (कर्मशालेतील)].

कानशीचा उपयोग समांतर चपटे भाग, चौकोनी गाळे, गोल भोके, लहान कोन व कोपरे अशा ठिकाणी पृष्ठ साफ व गुळगुळीत करण्यासाठी होतो. लोहेतर धातू घासण्याकरिता विशिष्ट प्रकारचे दात व सरी असलेल्या कानशी बनवलेल्या असतात. त्यांमध्ये धातुचे कण अडकून बसत नाहीत. कानशीचे काम संपल्यावर त्या तारेच्या ब्रशाने साफ करून अलग अलग ठेवतात. म्हणजे त्यांचे दात एकमेकांवर घासून खराब होत नाहीत. कानशी पाण्याने भिजून गंजू नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते.

धातूच्या पृष्ठभागावरील कानशीचे घासकाम संपल्यानंतर जर काही भाग किंचित वर राहिलेला असेल तर किंवा यंत्राने अचूक सपाट पृष्ठभाग तयार करता येत नसेल, तर तेथे तीक्ष्ण धारेच्या तासणीचा उपयोग करतात. एखाद्या भोकात अखंड धारवा (फिरते दंड योग्य स्थितीत ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे आधार बेअरिंग) किंवा नळी (बुशींग) बसवावयाची असेल, तर भोकाचे माप अगदी अचूक असावे लागते.अशा ठिकाणी तीक्ष्ण तासणीचा उपयोग करतात.

आ. २. आडवे कानसकाम

तीक्ष्ण धारेची तासणी : हे हत्यार कानशीप्रमाणेच उच्च कार्बनी पोलादाचे असते, परंतु त्याला पृष्ठभागावर दात नसून त्याच्या कडा चाकूच्या पात्यासारख्या तीक्ष्ण धारेच्या केलेल्या असतात. धातू खरवडण्याचे काम तीक्ष्ण धारेनेचे केले जाते. बहुतेक तासण्या जुन्या झिजलेल्या कानशीपासूनच तयार करतात.

संदर्भ : Judge, A.W. Engineering Workshop Practice, Calcutta 1961.

ओक, वा. रा.