वुली, चार्ल्स लेनर्ड : (१७ एप्रिल १८८०–२० फेब्रुवारी १९६०). ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ आणि इराकमधील ⇨ अर या सुप्रसिध्द स्थळाचा उत्खनक. जन्म लंडन येथे मध्यमवर्गीय कुटुंबात. शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात. त्याने वयाच्या पंचविसाव्या वर्षी ॲश्मोलिअन संग्रहालयाचे (ऑक्सफर्ड) उपरक्षक हे पद स्वीकारले आणि आपल्या संशोधनकार्यास प्रारंभ केला. एल्की कॉक्सबरोबर त्याने न्यूबियात पहिली संशोधन-मोहिम आखली (१९०७-११).
वुलीने आपले संशोधन ग्रंथांद्वारे प्रसिध्द केले. त्यांपैकी द सुमेरियन्स (१९२८), अर ऑफ द खाल्डिज (१९२९), डिगिंग अप द पास्ट (१९३०), एक्स्कॅव्हेशन्स ॲट अर : ए रेकॉर्ड ऑफ ट्वेल्व्ह यिअर्स वर्क (१९५४) आणि हिस्टरी अनर्थ्ड (१९५८) हे काही ग्रंथ प्रसिध्द आहेत. वुलीने वरील ग्रंथांतून मेसोपोटेमियातील संस्कृत्या आणि इजीअन व ग्रीक संस्कृत्या यांतीला संबंध दाखविण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या पुरातत्त्वीय क्षेत्रातील कार्याबद्दल राजा पाचवा जॉर्ज याने त्यास सरदारकी बहाल केली (१९३५). अखेरच्या दिवसांत वुलीने अल्-मिना (सिरिया) व टेल अटकाना (अलालाख) या स्थळी अनुक्रमे १९३६-३७ व १९३७-३९ या काळात उत्खनने केली. तत्संबंधीचे निष्कर्ष त्याने अ फर्गॉटन किंग्डम (१९५३) या ग्रंथात मांडले. विसाव्या शतकाच्या मध्यास त्याने संशोधनाद्वारे अनुमानिलेल्या काळाविषयी – विशेषतः सुमेरियन काळाविषयी – अन्य स्थळी उत्खनन केलेल्या विद्वानांनी फरक दाखविला, तरीसुध्दा त्याचे या क्षेत्रातील उत्खनन-संशोधन हे अद्यापही महत्त्वाचे मानले जाते. त्याचे लंडन येथे निधन झाले.
संदर्भ : 1. Mallowan, M. E. L. Wiseman, D. J. Ed. Ur in Retrospect : In Memory of Sir C. Leonard Woolley, London, 1960.
2. Woolley, Sir Leonard, Spadework, London, 1953.
“