वुलर : भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. हे जम्मू व काश्मीर राज्याच्या बारमूल जिल्ह्यात, श्रीनगर शहराच्या वायव्येस ३४ किमी.वर असून सस.पासून १,५७९ मी. उंचीवर आहे. ३४0 १६’ ते ३४0 २६’ उ.व ७४0 ३३’ ते ७४0 ४२’ पू. यांदरम्यान विस्तारलेल्या या सरोवराची लांबी १६ किमी. व रुंदी १० किमी. असून त्याचा विस्तार ऋतुनुसार ३० ते २६० चौ. किमी. असतो. सर्वसाधारण परिस्थितीत त्याचा विस्तार सु. ३२ चौ. किमी., सरासरी खोली ३.६ मी. व परिघ सु. ४८ किमी. असतो. पूरपरिस्थितीत हा विस्तार २६० चौ. किमी. पर्यंत वाढतो व त्यामुळे आजूबाजूचा सखल भाग जलमग्न होतो. झेलम, हरबुजी, आराह, पोहरू, बंदीपूर (प्राचीन मदुमती), बोहनर व एरिन हे प्रवाह वुलरला येऊन मिळतात. झेलम नदी दलदलीच्या प्रदेशातून वाहत येऊन आग्नेयीकडून वुलरला मिळते तर सरोवराच्या नैर्ऋत्य बाजूस असलेल्या सोपूर गावाजवळ ती सरोवरातून बाहेर पडते. वुलर सरोवरामुळे झेलम नदीतील पाण्याच्या पातळीचे नियमन होते.
नौकानयनाच्या दृष्टीने सरोवर महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांतील रहिवाशांना या सरोवरामुळे व्यवसाय उपलब्ध झाले आहेत. सरोवरात मासेमारीही चालते. श्रीनगर व इतर नागरी केंद्रांना याच सरोवरातून माशांचा पुरवठा होतो. सरोवरातील पाण्याची पातळी थोडीजरी वाढाली, तरी लगतच्या काही गावांतील रहिवाशांच्या जमिनी पाण्याखाली जातात. तेव्हा त्यांचा सरोवरातील मासेमारी व शिंगाडा फळे गोळा करणे हाच मुख्य व्यवसाय असतो.
चौधरी, वसंत
“