वीरशैव पंथ : एक शैव संप्रदाय. ह्यालाच ‘लिंगायत पंथ’ असेही म्हणतात. शिवोपासना हा मूलाधार असलेले, अनेक शैव पंथ काळाच्या ओघात निर्माण झाले. वीरशैव पंथ हा त्यांपैकीच एक होय.
‘वीरशैव’ ह्या नावाच्या अनेक व्युत्पत्त्या देण्यात येतात. कोणत्याही खडतर परिस्थितीत रणांगणावरील वीराप्रमाणे शैव धर्माचे जो पालन करतो तो ‘वीरशैव’, अशा आशयाची एक व्युत्पत्ती वीरशैवांच्या पारमेश्वरतंत्रात देण्यात आलेली आहे. वीरशैव पंथाची उभारणी कामिका ते वातुलपर्यंतच्या २८ आगमांवर व तंत्रांवर करण्यात आलेली असून उपर्युक्त पारमेश्वरतंत्र हा त्या आगमांपैकीच एक होय. निर्धाराने परमार्थप्रवण राहून ईश्वरभक्ती करणाऱ्याला ‘वीर’ म्हणण्याची प्रथा आहे.
वीरशैव पंथाची स्थापना बाराव्या शतकात ⇨ बसवेश्वरांनी (११३१-६७) केली असे मानणारे काही विद्वान आहेत. तथापि बसवेश्वरांचा जीवनवृत्तांत देणाऱ्या बसवपुराणावरून (प्रकाशित १९०५) तसे दिसत नाही.
वीरशैव हे आपली परंपरा बसवाचार्यांच्या पूर्वीची असल्याचे मानतात. शिवाच्या सद्योजातादी पंचमुखांपासून रेणुक, दारूक आदी ⇨ पंचाचार्य अवतरले त्यांची नावे युगपरत्वे भिन्न आहेत, असे ते मानतात. ह्या पाच आचार्यांची कलियुगातील नावे रेवणाराध्य, मरुळाराध्य, एकोरामाराध्य, पंडिताराध्य आणि विश्वाराध्य अशी आहेत. त्यांचे अवतारस्थान, ज्या शिवलिंगापासून त्यांची उत्पत्ती झाली ते शिवलिंग, त्यांच्या सिंहासनाचे स्थान आणि नाव ह्यांसंबंधीचा तपशील पुढील पानावर तक्त्यात दिला आहे.
ह्या पंचाचार्यांना ‘जगद्गुरू’ असे म्हटले जाते. ह्यांचे गोत्रपुरूष वर दिलेल्या अनुक्रमाने वीरभद्र, नंदी, वृषभ, भृंगी आणि स्कंद असे आहेत. त्यांची सूत्रे, प्रवर, शाखा इत्यादींना अनुसरून शिष्यसंततीला ‘पंचम’ असे म्हणतात. पंचाचार्यांची पीठे ही गुरुपीठे म्हणविली जातात. त्यांचे शाखामठ, गुरूस्थलमठ शेकडोंच्या संख्येने देशात सर्वत्र, आणि विशेषतः कर्नाटकात आहेत. पाशुपत, कालामुख अशा शैव पंथांनी वीरशैव पंथाला पाठबळ मिळाले. मात्र हे पंथ म्हणजे वीरशैव पंथाची पूर्वरूपे नव्हेत. बसवेश्वरांनी ह्या पंथांना एकत्र आणले, त्यांना संघटित केले. बसवेश्वरांप्रमाणेच ⇨ अल्लमप्रभू (बारावे शतक), ⇨ अक्कमहादेवी (बारावे शतक), ⇨ चेन्नबसव ( सु. बारावे शतक ), सिध्दरामेश्वर, नीलांबिका यांनाही वीरशैव पंथाला भक्कम पायावर उभे करण्याचे श्रेय दिले जाते.
आठवे ते दहावे शतक ह्या कालखंडात केव्हातरी होऊन गेलेले शिवयोगी शिवाचार्य ह्यांनी संस्कृतात रचलेला सिध्दान्तशिखामणि हा वीरशैवांचा पंथग्रंथ होय. वीरशैवांच्या आगमानंतरचा हा पहिला संस्कृत पंथग्रंथ. वीरशैवांच्या तत्त्वज्ञानाची सुसूत्र मांडणी श्रीपती पंडितांनी (अकरावे शतक) ⇨ ब्रह्मसूत्रांवर श्रीकरभाष्य लिहून केली. ह्या भाष्याच्या मंगलाचरणात रेवण, मरुळ आणि एकोराम ह्या वीरशैव आचार्यांना वंदन केले आहे.
बसवेश्वर आणि त्यांच्या काळातील अन्य वीरशैव संतांनी कर्नाटकातील कल्याणी म्हणजेच ⇨ बसवकल्याण (जि. बीदर) येथे अल्लमप्रभूंच्या अध्यक्षतेखाली शून्यसिंहासनाची स्थापना केली. शून्यसिंहासनाला ‘निराभारी’ किंवा ‘विरक्त पीठ’ असेही म्हणतात. शून्यसिंहासनाचे पाच समय किंवा पोटभेद आहेत, ते असे : (१) मुरघा, (२) चीलाळ, (३) कुमार, (४) केम्पिन, (५) संपादनेय. ह्यांचे विरक्त मठ कर्नाटकात सर्वत्र आहेत. त्यांपैकी चित्रदुर्ग मठ, मूरसाविर मठ, मुरघा मठ, तोंटद सिद्धेश्वर मठ आदी विशेष प्रसिद्ध आहेत.
वीरशैवांचे मूळ साहित्य संस्कृतात असल्याने सामान्यांना ते दुर्गम झाले. बसवेश्वरांनी आणि त्यांच्या काळातील अन्य वीरशैव संतांनी आपल्या आध्यात्मिक चर्चेतून जे ‘वचन साहित्य’ निर्माण केले, ते सर्वसामान्यांना सहज समजणाऱ्या कन्नड भाषेत. ‘वचन’ म्हणजे गद्यसदृश, लयबध्द काव्य. ह्या वचनांतून शिवभक्तीप्रमाणेच अनेक सामाजिक विषयही हाताळलेले आहेत. [→ कन्नड साहित्य ].
कर्मकांडाचे स्तोम, अनेक देवांची उपासना, अनाचार, वर्णव्यवस्था व जातिभेद, उच्च-नीच भाव, हिंसाचार ह्यांना वीरशैवांनी प्रखर विरोध केला. आध्यात्मिकता, शिवभक्ती, सामाजिक समानता ह्यांचा त्यांनी पुरस्कार केला. स्त्री-शूद्रांना सर्व क्षेत्रांत समान अधिकार, श्रमप्रतिष्ठा, सत्य, अहिंसा आदी सद्गुणांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. समाजातील सर्व जातिजमातींना वीरशैव पंथात प्रवेश मिळू लागला.
वीरशैवांचे ‘सामान्य’, ‘विशेष’ आणि ‘निराभारी’ असे तीन भेद आहेत. सर्वसामान्य भक्तांना ‘सामान्य’ म्हणतात. पुरोहित, ⇨ जंगम, गुरू, मठाधिकारी हे ‘विशेष’ आणि विरक्त मठांचे स्वामी हे ‘निराभारी’ होत. निराभारी म्हणजे संसारत्याग करून सर्व बंधनांच्या भारातून मुक्त झालेले.
तत्त्वज्ञान व आचारधर्म : वीरशैवांचे तत्त्वज्ञान हे ‘शक्तिविशिष्टाद्वैत’ ह्या नावाने ओळखले जाते. ह्या नावाचे स्पष्टीकरण असे : शिव हा सर्वज्ञ, सर्वकर्तृत्ववान आहे सर्व प्रकारच्या सूक्ष्म चिद्चित् शक्ती त्याच्या ठायी आहेत. जीव हा अल्पज्ञ, अल्पकर्तृत्ववान असून त्याच्या ठायी स्थूल स्वरूपाच्या चिद्चित् शक्ती आहेत. असे असले, तरी वरील ‘सर्वज्ञत्व’ इ. गुणांनी विशिष्ट असलेला शिव आणि ‘अल्पज्ञत्व’ इ. गुणांनी विशिष्ट असा जीव ह्यांच्यात अभेद वा अद्वैत आहे, असे सांगणारे तत्त्वज्ञाना व विद्या म्हणजे ‘शक्तिविशिष्टाद्वैतवाद’ होय. आणि ह्या तत्वज्ञानात वा विद्येत (वी) जो रमतो (र) तो वीरशैव ही व्युत्पत्ती दिलेली आहे.
वीरशैवांच्या दृष्टीने विश्व हे शिवाचे दृश्य रूप असून ते सत्य आहे मिथ्या नाही. शिव हा आपल्या शक्तीने हे विश्व निर्माण करतो आणि पुन्हा त्याचा लय आपल्या ठायी यथाकाल घडवून आणतो. विश्वाची उत्पत्ती म्हणजे ‘शक्तिविकास’ व विश्वाचा लय म्हणजे ‘शक्तिसंकोच’ होय. लिंग म्हणजे वीरशैवांची परमतत्त्वाची संकल्पना आहे. ‘हे चराचर जग जेथे लय पावते आणि पुन्हा पुन्हा उत्पन्न होते, ते लिंग शाश्वत ब्रह्म आहे’. लिंग हे शिश्नाचे वा स्तूपाचे प्रतीक नव्हे. ज्याचा आदि-अंत गवसत नाही, अशा अग्निस्तंभाचे ते प्रतीक आहे. चंद्र इ. ग्रहतारका त्याच्याच तेजाने प्रकाशमान होतात, असे सूक्ष्मागमात म्हटले आहे (क्रियापाद, पटल ६.९). लिंगाच्या वरील भागास ‘शिव’ अशी संज्ञा असून पीठाला–म्हणजे खालील भागास–‘शक्ती’ असे म्हणतात. अगदी आरंभी निष्कललिंग वा मूललिंग अस्तित्वात असते. ते शिव असते. त्याला जग निर्माण करण्याची इच्छा झाली, की जगाची उत्पत्ती महालिंगापासून होते. ते ‘भावलिंग’, ‘प्राणलिंग’ आणि ‘इष्टलिंग’ अशा तीन प्रकारचे आहे. भावलिंगाचा संबंध आत्म्याशी असतो. त्याची भक्तीने कल्पना करावी लागते. प्राणलिंगाचा संबंध जीवाशी असतो. त्याची मनाने कल्पना करावी लागते. इष्टलिंगाचा संबंध शरीराशी असून ते दिसू शकते. दीक्षा देणारे गुरू हे इष्टलिंग दीक्षा घेणाऱ्याला देतात. ते शरीरावर धारण करतात व त्याची नित्यनेमाने पूजा करतात.
वीरशैवांच्या परिभाषेत शिव म्हणजे लिंग, तर जीव म्हणजे ‘अंग’ होय. ‘जीव’ हा वस्तुतः शिवाचेच एक अंग होय. तथापि ‘आणवमल’, ‘मायाजाल’ आणि ‘कर्ममल’ ह्या मलत्रयाच्या (अविद्येच्या) आवरणामुळे (मायापाशामुळे) जीव ह्या सत्याबद्दल अज्ञानी राहतो आणि त्यामुळेच स्वतःला शिवापेक्षा भिन्न समजतो. त्याचे अज्ञान गुरुकृपेमुळे दूर झाल्यानंतर त्याला स्वतःच्या ‘शिवत्वा’ची प्रचीती येते. त्यानंतर तो षट्स्थलसाधनेच्या मार्गाने शिवाशी ऐक्य पावतो.
षट्स्थलसाधना : शिवाशी ऐक्य पावण्यासाठी आध्यात्मिक प्रगतीच्या ज्या सहा पायऱ्या पार कराव्या लागतात, त्यासाठी करावयाची साधना म्हणजेच षट्स्थलसाधना. वीरशैवांच्या परिभाषेत ‘स्थल’ ह्या संज्ञेला विशिष्ट अर्थ आहे. हे चराचरजगत जेथे उत्पन्न होऊन जेथे लय पावते अशा ब्रह्माला ‘स्थल’ असे म्हणतात. हे स्थल लीलेने, शक्तीच्या साहाय्याने, भक्तीच्या ओढीने ‘लिंगस्थल’ आणि ‘अंगस्थल’ असे द्विविध बनते. ‘लिंगस्थल’ म्हणजे शिव व ‘अंगस्थल’ म्हणजे जीव.
भक्तस्थल : ह्या पायरीवर जीवाला शिव हा नित्य परमानंदमय आहे, अशी जाणीव होते. म्हणजेच महेश्वरतत्त्वाचा आविर्भाव त्याच्या ठायी होतो. जीव शिवाची भक्ती करू लागतो. ही इष्टलिंगोपासना असते.
महेशस्थल : ह्या पायरीवर शिवाचा सर्वश्रेष्ठत्वाचा प्रत्यय जीवाला वा भक्ताला येतो. हा सदाशिवत्वाचा साक्षात्कार होय. तो झाल्यावर भक्त अत्यंत निग्रहाने शिवोपासना करू लागतो. वीरव्रती होतो. येथे माहेश्वरलिंगाची उपासना तो करतो.
प्रसादीस्थल : ह्या पायरीवर सुषुम्णामार्गाने कुंडलिनीने षट्चक्र भेदले जाते आणि शिवयोगाभ्यासाच्या सामर्थ्याने ब्रह्मरंध्राच्या ठायी शिवशक्तिसंयोग होतो. जीव सर्व सुखोपभोग शिवाच्या प्रसादासाठी सोडून देतो. ही जीवाची प्रसादी अवस्था होय. ह्या अवस्थेत प्रसादीलिंगाची उपासना तो करतो.
प्राणलिंगीस्थल : ह्या पायरीवर जीवनाबद्दलची आसक्ती राहत नाही. बाह्य स्वरूपाची उपासना संपून ती आंतरिक होते. अहंता नष्ट होते. मन पूर्णतः शिवावर केंद्रित होते. जीव प्राणलिंगाची उपासना करतो.
शरणस्थल : ही पूर्णपणे शिवशरणतेची अवस्था असते. ह्या अवस्थेत जीव भावलिंगाची उपासना करतो. ह्या अवस्थेत त्याला अणिमादी ऐश्वर्यसंपन्नता, म्हणजे अणिमा, लघिमा इ. आठ सिध्दी प्राप्त होतात.
ऐक्यस्थल : ही अखेरची–शिवाशी ऐक्य पावण्याची–पायरी. ह्या अवस्थेत त्याचे महालिंगाशी ऐक्य होते. ही जीवन्मुक्तीची अवस्था असते.
षट्स्थलांची सांगड योगमार्गातील षट्चक्रांशी घातली गेल्यामुळे षट्स्थलसाधनेला ‘शिवयोग’ असेही म्हटले जाते.
अष्टावरण : भक्ताला मार्गदर्शन आणि संरक्षण देण्यासाठी अष्टावरणांची योजना आहे. गुरू, लिंग, जंगम हे पूजनीय भस्म, रूद्राक्ष, मंत्र ही पूजेची साधने आणि पादोदक व प्रसाद ही त्या पूजेची फळे. अशी ही आठ आवरणे म्हणजे आध्यात्मिक कवचकुंडले.
गुरू : प्रत्येक वीरशैवाला, त्याच्या कुटुंबासह, पंचपीठांपैकी एका शाखेचा एकच गुरू असतो. तो शिष्याच्या घरी सर्व धार्मिक कार्यात उपस्थित राहून त्याचे मार्गदर्शन करतो. गुरूकडून इष्टलिंग दीक्षा व मंत्रोपदेश घेऊन आचारधर्मानुसार वागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य.
लिंग : गुरूकडून प्राप्त झालेले इष्टलिंगच शिष्याने आपल्या शरीरावर नित्य धारण करून, शुचिर्भूत होऊन त्याची पूजा करावी. त्याचा कधीही वियोग होऊ नये.
जंगम : गुरूप्रमाणे जंगम हाही भक्तांच्या घरी जाऊन सर्व धार्मिक विधी करतो. समाजात सर्वत्र संचार करून धर्मप्रचार करणे हे त्याचे कर्तव्य. गुरूच्या अनुपस्थितीत गुरूची सर्व कामे हा करू शकतो. शास्त्राने गुरू, लिंग, आणि जंगम ही एका शिवाचीच तीन समान रूपे मानली आहेत.
पूजा करताना भस्म, रूद्राक्ष व गुरूकडून प्राप्त झालेले शिवपंचाक्षरी अथवा षडाक्षरी मंत्र यांचा उपयोग केला जातो. गुरूलिंग जंगमांच्या चरणतीर्थाला पादोदक म्हणतात आणि त्यांना अर्पण केल्यानंतर आशीर्वादरूपाने मिळणाऱ्या सर्व वस्तूंना प्रसाद म्हणतात.
पंचाचार : अष्टावरण आणि पंचाचारांत आचारधर्मांचे विशेष वर्णन आहे. शिवाचार, लिंगाचार, सदाचार, भृत्याचार आणि गणाचार हे प्रमुख पंचाचार होत.
जन्मापासून मृत्यूपर्यंत वीरशैव व्यक्ती शुध्दच असल्याने पंचसुतकांचे प्रयोजन नाही. सोळा संस्कारांऐवजी वीरशैवांत ‘दशकर्मपध्दती’ आहे. गर्भावस्थेतच बालकास मातेमार्फत लिंगधारणा केली जाते. जन्मानंतर सामान्यतः आठव्या वर्षी मुलाप्रमाणे मुलीलाही गुरूकडून दीक्षासंस्कार, इष्टलिंगधारणा आणि मंत्रोपदेश करविला जातो. विवाहादी मंगलकार्यात पंचाचार्यांचे प्रतीक म्हणून पंचकलशांची स्थापना करून गुरूच्या साक्षीने विधी पार पाडले जातात. त्यासाठी जंगम–पुरोहिताची आवश्यकता असते. अंत्यसंस्कारात वाजतगाजत प्रेतयात्रा काढून शेवटी बसलेल्या अवस्थेत मृताला भूमीच्या गर्भात समाधी दिली जाते. वीरशैवशास्त्रानुसार वीरशैव व्यक्तीस षट्स्थलसाधनेने एकाच जन्मात मुक्ती मिळते.
पहा : काश्मीर शैव संप्रदाय; पाशुपत पंथ; लिंगपूजा शैव संप्रदाय.
संदर्भ : 1. Malledevaru, H. P. Essentials of Virasaivism, Bombay, 1973.
2. Nandinath, S. C. A Handbook of Virasaivism, Dharwad, 1942.
3. Sakhare, M. R. History and Philosophy of Lingayat Religion, Dharwad, 1978.
४. तगारे, ग. वा. शैवदर्शन, पुणे, १९८७.
५. मंचरकर, र. बा. संपा. वीरशैव संप्रदाय, श्रीरामपूर, १९८९.
६. शिवाचार्य, चंद्रशेखर, संपा. सिध्दान्तशिखामणी, अनु. कपाळे, चंद्रशेखर, वाराणसी, १९९१.
७. स्वामी, श्रीचेन्नबसव, संपा. वीरशैव धर्म, धारवाड, १९५४.
कपाळे, चंद्रशेखर