विष्णूप्रयाग : भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे उत्तरप्रदेश राज्याच्या चमोली जिल्ह्यात अलकनंदा व विष्णुगंगा (धौली अथवा दूधगंगा) या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. जोशीमठ- पांडुकेश्वर –बद्रीनाथ या मार्गावरील हे ठिकाण जोशीमठाच्या उत्तर पायथ्याशी सु. ३ कि.मी. असून सस. पासून सु. १,५०३ मी उंचीवर आहे.
देवर्षी नारदाने या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली होती, अशी याच्या स्थानमाहात्म्याविषयी कथा सांगितली जाते, विष्णूमंदिर हे येथील प्रमुख मंदिर आहे. या ठिकाणी अलकनंदा व विष्णुगंगा या दोन्ही नद्या एकमेकींस काटकोनात मिळतात. दोन्ही नद्यांचे प्रवाह अवखळ असून पाणी अत्यंत थंड असते संगमस्थानाजवळ अरूंद जागा असून मुख्य वाटेपासून येथे जाण्यास अरूंद व लहान-लहान पायऱ्या आहेत. वाटेवरच एक लहानसे अन्नपूर्णेचे मंदिर आहे. संगमावर पाच-सात माणसे उभी राहू शकतील असा एक खडक असून विष्णुगंगेवर एक लोखंडी झुलता पूल आहे. उत्तर भारतातील पंचप्रयागापैकी हे एक पवित्र प्रयाग मानले जात असल्याने बद्रीनाथाचे यात्रेकरू या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
अवचट, प्र श्री.