विलेमाइट : जस्ताचे खनिज. स्फटिक षट्‌कोणी-समांतरषट्फेलकीय प्रचिनाकार व विरळा आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. हे बहुधा संपुंजित वा कणमय आणि क्वचित तंतुमय रूपांत आढळते. ⇨पाटन : तलीय (0001 ) अस्पष्ट शुद्ध खनिज पांढरे, मँगनीज व लोखंड यामुळे हिरवा, पिवळा, मांसाप्रमाणे लाल वा तपकिरी रंग येतो. चमक काचेसारखी ते राळेसारखी पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. कठिनता ५·५ वि. गु. ३·९-४·२ [⟶ खनिजविज्ञान]. कधीकधी याच्यावर जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरण पडल्यास त्याच्यातून भडक पिवळसर हिरवे अनुस्फुरण (विद्युत्‌ चुंबकीय प्रारणाचे-तरंगरूपी ऊर्जेचे-उत्सर्जन) होते. यामुळे आधीच्या दूरचित्रवाणी नलिकांत हे वापरीत. रा. सं. Zn2SiO4. पुष्कळदा जस्ताच्या जागी मँगॅनीज व क्वचित लोह येते. अंशतः मँगॅनीज असलेल्या प्रकाराला ट्रुस्टाइट म्हणतात.

विलेमाइट हे विरळा आढळणारे खनिज असून जस्ताच्या पुष्कळ धातुक निक्षेपांत (साठ्यांत) जस्ताच्या अन्य खनिजांबरोबर हे आढळते. फ्रँक्लिन (न्यू जर्सी, अमेरिका) येथील तीव्र रूपांतरित चुनखडकांत हे फ्रँक्लिनाइट, झिंकाइट, कॅल्साइट इ. खनिजांबरोबर आढळते. बेल्जियम, अल्जीरिया, नामिबिया इ. प्रदेशांत हे आढळते. हे जस्ताचे गौण धातुक आहे. नट्‌ली (ससेक्स काउंटी, न्यू जर्सी) येथे जस्ताचे धातुक म्हणून १९५४ पर्यत (सु. १,००० वर्षे) हे काढण्यात येत होते. नेदर्लड्‌सचे राजे विलेम (विल्यम) पहिले यांच्यावरून या खनिजाचे विलेमाइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.