विधी, धार्मिक : धर्माचे वा धर्मशास्त्राचे ज्याला प्रामाण्य प्राप्त झालेले आहे आणि ज्याला एक निश्चित उद्दिष्ट आहे, असे कृत्य.जेथे जेथे कोणत्या तरी स्वरूपाचा धर्म आहे, तेथे तेथे धार्मिक विधी हे कमीजास्त प्रमाणात असतातच. अगदी आदिम समाजांतही त्यांच्या आदिम धर्मानुसार काही विधी वेळोवेळी केले जातात. एक सजीव प्राणी म्हणून प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत जे विविध टप्पे क्रमाने येत असतात, ते सर्व त्याच्या विशिष्ट धार्मिक श्रद्वेनुसार विशिष्ट धार्मिक विधींशी संबद्व करणे ही माणसांचे जीववैज्ञानिक वास्तव आणि त्याची विशिष्ट धर्म-संस्कृती ह्यांच्यातील एक परस्परक्रिया आहे. उदा., जन्म, प्रजोत्पादन, मृत्यू हे आपल्या जीववैज्ञानिक वास्तवाचे अविभाज्य भाग असले, तरी त्यांच्याशी संबंधित असे धार्मिक विधी असतात आणि ते केले पाहिजेत असे धर्म सांगत असतो. धर्माच्या दृष्टीने ह्या घटना केवळ जीववैज्ञानिक नसून त्यांचा धर्माशी अतूट असा संबंध आहे. मनुष्य जसा निसर्गाचा एकभाग असतो, तसाच तो कोणत्या-ना-कोणत्या धार्मिक-सांस्कृतिक लोकसमूहाचाही घटक असतो व वेगवेगळ्या कारणांसाठी करावयाचे धार्मिक विधी हा प्रत्येक समाजाच्या धार्मिक-सांस्कतिक जीवनाचा भाग असतो. एक स्वतंत्र देहधारी जीव म्हणून माणूस जन्माला आल्यानंतर त्याला एक नाव द्यावे लागते परंतु ते देण्यासाठी ⇨बारसे वा नामकरणविधी आवश्यक असतो. हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी बारसे हा एक होय आणि संस्कार म्हणजे विशिष्ट धार्मिक विधीच असतात. जन्मलेल्या अपत्याच्या पापांचा नाश होऊन त्याला दीर्घायुष्य व परमेश्वरकृपा ह्यांचा लाभ व्हावा, ही बारशाची उद्दिष्टे तो विधी करताना उच्चारली जातात. गणपतिपूजन, पुण्याहूवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्व ह्या वेळी केले जाते. स्त्री-पुरुषांच्या समागमातून प्रजोत्पत्ती होत असली, तरी समागम करण्यासाठी कोणत्या-ना-कोणत्या स्वरूपातील धार्मिक विधीयुक्त विवाहाचे प्रामाण्य असले पाहिजे ही धर्माची अपेक्षा असते. [⟶विवाहविधी]. मृत्यूनंतर माणसाच्या पार्थिवाची व्यवस्था काय आणि कशी करावयाची, ह्याचेही विधी प्रत्येक धर्मात सांगितलेले असतात. [⟶अंत्यविधी व अंत्यसंस्कार]. माणसाने त्याच्या आयुष्यात वेळोवेळी आवश्यक ते धर्मिक विधी केले, तर आपण धर्माने घालून दिलेल्या मार्गाने चाललो, अशी कृतर्थतेची भावना त्याच्या मनात निर्माण होते आणि माणसाच्या मृत्यूनंतर धर्माने त्या संदर्भात सांगितलेले सर्व विधी योग्य प्रकारे करता आले, तर मृताच्या आप्तस्वकीयांनाही समाधान वाटते.

समाजाकडून काही विशिष्ट धार्मिक अधिकार प्रदान केला जावा, म्हणूनही काही धार्मिक विधी केले जातात. उदा., त्रैवर्णिकांच्या मुलांना वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी ⇨उपनयन (मुंज किंवा मुंजी) हा संस्कार प्राचीन काळी केला जात असे. आर्याचा हा एक अत्यंत प्राचीन असा संस्कार आहे. हा संस्कार आजही केला जातो. ⇨बाप्तिस्मा हा ख्रिस्ती धर्मातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. तो झाल्याखेरीज व्यक्ती खऱ्याअर्थाने ख्रिस्ती झाली असे मानले जात नाही.

धर्मपालनाच्या एक अविभाज्य भाग म्हणून धर्मिक विधी करीत असताना आपण एक वा अनेक अतिमानवी शक्तींशी आपणासअनुकूल असा एक संबंध प्रस्थापित करीत आहोत ह्याची प्रत्यक्षाप्रत्यक्ष जाणीव, तो करणाऱ्या व्यक्तीच्या मनात असते. निरनिराळ्या कारणांसाठी मानवाच्या पराधीनपणाचा प्रत्यय जेथे सतत येत असतो, त्या ह्या जगात आपणाहून सर्वार्थांनी बलिष्ठ आणि आपले हित करू शकतील अशा एक वा अनेक शक्तींची कल्पना आणि उपासना करणे, त्यांना शरण जाणे मनुष्य उचित समजतो. त्यासाठी तो त्या शक्तींची ⇨पूजा करतो. पूजा हाही एक धार्मिक विधी असून, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. इष्टफलप्राप्ती व अनिष्ट निवारण ह्यांसाठी देवदेवतांची तसेच नवग्रहांचीही पूजा/शांती केली जाते. देव, पितर व पूजनीय व्यक्ती ह्यांस दूर्वा, मोहऱ्या, फुले ह्यांसह ओंजळीतून उदक देणे हा षोडशोपचार पूजेतला चौथा उपचार असून त्याला अर्ध्य म्हणतात. पशूंची व वृक्षांचीही पूजा करतात. [⟶पशुपूजा वृक्षपूजा]. एखाद्या पशूच्या उपयुक्ततेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची पूजा केली जाते. उदा., ⇨पोळ्याच्या दिवशी शेतकरी करीत असलेली बैलाची पूजा.पशूमध्ये देवत्व मानून त्याची पूजा करतात. उदा., हिंदू करीत असलेली गायीची पूजा. ⇨नागपंचमीच्या दिवशी केली जाणारी ⇨नागपूजा नागापासून भय राहू नये, ह्या हेतूने केली जात असावी. द्रविड लोक नागाला दैवत मानत होते. द्रविड-आर्य एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर नागपूजा सर्वत्र सुरू झाली. वृक्षांमध्ये देवता वा विविध प्रकारच्या चांगल्या-वाईट शक्ती असतात, अशी समजूत आहे. त्यामुळे अशुभ निवारणासाठी वा शुभफलप्राप्तीसाठी वृक्षपूजाही करतात. वृक्षांच्या उपयुक्ततेबद्दलची कृतज्ञता हेही एक कारण असते. भारतात वृक्षपूजा मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. पिंपळाला प्रदक्षिणा घालणे, त्याला पाळणे बांधणे हा एक वृक्षपूजेचाच विधी होय.

चार वेद आणि ब्राह्मणग्रंथ ह्यांत ‘पूजा’हा शब्द आढळत नाही पूजाकर्मही सांगितलेले नाही कारण ⇨यज्ञसंस्था हीच वैदिकांची धर्मसंस्था होती. यज्ञ हाच परमेश्वर होय, अशी कल्पना ऋग्वेदात आढळते, त्यामुळे यज्ञाशी संबंधित असे जे जे विधी, ते सर्व वैदिकांचे धार्मिक विधी होते तोच त्यांचा पूजाप्रकार होता, असे म्हणता येईल. पापनाश, शत्रुनाश, संकटांचे निवारण, दीर्घायुष्य, निकोपदेह, समृद्धी आणि अमरत्व अशी विविध प्रकारची फळे मिळविण्यासाठी यज्ञ केले जात होते. यज्ञात गाई आणि घोडे बळी दिले जात असत तथापि जेथे यज्ञसंस्था नाही अशा समाजांतही ⇨बळीची कल्पना आढळते. ज्यू धर्मीयांच्या ⇨पापक्षालन दिनी राष्ट्र,मंदिर आणि लोक ह्यांच्या हितार्थ एका वासराचा बळी दिला जातो. ह्या वेळी बळी जाणारे वासरू हे सर्व राष्ट्राच्या पापाचे प्रतीक मानले जाते. प्रतीकात्मकता हे धर्मविधींचे एक महत्त्वाचे आणि लक्षणीय वैशिष्ट्य होय. उदा., ⇨युखॅरिस्टहा ख्रिस्ती धार्मिक संस्कार. ह्या संस्कारास ख्रिस्ताने मानवजातीसाठी केलेल्या बलिदानाचा संदर्भ आहे. ख्रिस्तीने आपल्या शिष्यांसह अखेरचे भोजन केले, त्या प्रसंगी त्याने हातात भाकर घेऊन म्हटले, की हे माझे शरीर आहे तुमच्यासाठी मी ते मोडत आहे. त्याने द्राक्षरसाचा प्यालाही घेतला आणि म्हटले, की हे माझे रक्त आहे. हे रक्त म्हणजे तुमच्या-माझ्यामधील ईश्वरकृपेचा ‘नवा करार’आहे. युखॅरिस्ट ह्या विधीत सर्व भक्तांना भाकर आणि द्राक्षरस दिला जातो. वरील प्रसंगाचे हा विधी म्हणजे एक प्रतीकात्मक रूप आहे. अनेकदा काही मिथ्यकथा त्यांचा एखादा पैलू वा त्या मिथ्यकथांमधील मूलभूत ज्ञापके ही विशिष्ट धार्मिक विधीमधून व्यक्त होताना दिसतात. उदा., ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणाऱ्या  विधींत अनेकदा सृष्ट्युत्पत्तीची (क्रीएशन) मिथ्थकथा गुंफलेली दिसते. अर्थात हे सर्वच धार्मिक विधींच्या बाबतींत लागू आहे, असे नाही. काही धर्मिक विधी सकारात्मक (पॉझिटिव्ह), तर काही नकारात्मक (निगेटिव्ह) असतात, असेही काही अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट अधिकार वा प्रतिष्ठा देण्यासाठी उपनयन, राज्याभिषेक ह्यांसारखे जे धार्मिक विधी केले जातात, ते सकारात्मक धार्मिक विधी होत. ह्याउलट अमुक करू नये तमुक करू नये असे सांगणाऱ्या धर्माज्ञा म्हणजे ‘ताबू’वा ⇨निषिद्धे म्हणजे नकारात्मक धार्मिक विधींचाच एक प्रकार होय, असाही विचार कधी कधी मांडला जातो. अमुक एक निषिद्ध कृत्य केल्यास करण्यावर काही अरिष्ट ओढवेल कारण निषिद्धे म्हणजे देवांच्या आज्ञा असतात, अशी भूमिका निषिद्धांच्या मागे असते. अनेक धार्मिक आचारांचा, विधींचा उगम निषिद्धांमध्ये असतो, असेही मानले जाते. व्रतांचे पालन करीत असताना अनेक प्रकारचे निषेध पाळावे लागतात. वास्तुशांत किंवा गृहप्रवेशविधी केल्याशिवाय बांधलेल्या नवीन घरात राहावयास जाऊ नये, ह्या नकारात्मक धार्मिक आदेशांमुळे हे धार्मिक विधी हिंदू धर्मीयांकडून केले जातात.

इष्ट फलाची प्राप्ती व अनिष्टाचे निवारण करण्यासाठी विविध अलौकिक व गूढ शक्तींची केली जाणारी आराधना आणि त्या आराधनेचे तंत्र वा कर्मकांड यातुविद्येतही सांगितलेले असते. धार्मिक विधींचेही एक कर्मकांड असतेच. यातुविधी आणि धार्मिक विधी ह्यांच्या कर्मकांडातील एखादा तपशीलही चुकून चालत नाही ती अत्यंत काटेकोर असावीत असे मानले जाते. यातुविद्या आणि धर्म ह्यांच्यातील भेद दर्शविणारी रेषा दाखवणे अवघड असते परंतु अनेक धार्मिक विधींचा हेतू ऐहिकापलीकडे जाणारा असतो आणि पारलौकिक, दिव्य शक्तींशी संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न त्यांत असतो.

कुलकर्णी, अ. र.


षोडशोपचार-पूजेतील अर्ध्यदानाचा विधीवसुबारस: गायीच्या पूजेचा विधी

ख्रिस्ती विवाह: वधूवरांच्या मस्तकी फुलांच्या माळा घालण्याचा विधी                                 हिंदू विवाहविधीतील सप्तपदी

पारंपारिक हिंदू विवाहविधीतील एक दृश्य        बौद्ध विवाहातील साक्षागंधा-विधी       कुंभकोणम मंदिरातील (तामिळनाडू) नवग्रह पूजाविधी