विदिशा : भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक प्राचीन नगरी आणि त्याच नावाच्या विद्यमान जिल्ह्याचे मुख्यालय. भोपाळच्या ईशान्येस रस्त्याने सु. ८१ किमी. तर लोहमार्गांने सु. ५६ किमी. असलेली ही नगरी बेटवा (वेत्रवती) नदीकाठी पूर्व तीरावर वसली आहे. मुंबई-दिल्ली या मध्य रेल्वे मार्गावरील हे एक स्थानक आहे. लोकसंख्या सु. ९२,९१७ (१९९१). अव्वल इंग्रजी काळातील ग्वाल्हेर संस्थानातील भिलसा जिल्हा म्हणजेच सांप्रत विदिशा जिल्हा होय. प्राचीन काळच्या सोळा महाजनपदांतील दशार्ण जनपदाची राजधानी येथे होती. विद्यमान भिलसा किंवा भेलसा म्हणजेच प्राचीन विदिशा होय. १९५६ पूर्वी ते प्रामुख्याने भिलसा नावाने तर त्यानंतर विदिशा नावाने ओळखले जाऊ लागले. बौद्ध, जैन व वैदिक वाङ्मयांत या नगरीचा उल्लेख भद्रावती, भादलपूर, भद्रपूर, वैदिशा, वेस्सनगर, वैश्यनगर, विश्वनगर, दिदिशा इ. भिन्न नावांनी आढळतो. कालपरत्वे मध्ययुगत भैलिशा, भैलस्वामिन, अलमगिरपूर या नावांनी विदिशेचा उल्लेख होई. कौटिल्य, वराहमिहीर, कालिदास, बाण यांनी या नगराचे वैभव वर्णिले असून, स्कंदपुराण आणि अंगुत्तरनिकाय यांत त्याचे उल्लेख अनुक्रमे तीर्थक्षेत्र व जनपद अवंतीचा एक भाग असे केले आहेत. मेघदूतात विदिशा ही दशार्ण देशाची राजधानी असल्याचे म्हटले आहे. सांप्रतचे भिलसा हे नगरनाम मध्ययुगीन भैलिशा या नावाशी जुळते. अल् बीरूनीच्या मते (अकरावे शतक) विदिशेच्या एका बाजूला दशान (किंवा धसान) नदीच्या तीरावर भैलस्वामी मंदिर नावाचे एक सूर्यमंदिर असल्यामुळे भैलस्वामिन किंवा भैलिशा असे नाव विदिशेला मिळाले असावे. हे सूर्यमंदिर चेदी राजाचा पराभव करणारा राष्ट्रकूट श्रीकृष्णाचा प्रधान वाचस्पती याने बांधले व ते वेत्रवतीच्या पुरात केव्हातरी नष्ट झाले असावे.
प्रागैतिहासिक काळात येथे मानवी वस्ती होती, असा एक तर्क आहे. ही वस्ती सांस्कृतिक प्रगती दर्शविते. येथील काही अहत नाणीही मिळाली आहेत. ती इ. स. पू. पाचव्या शतकातील असावीत. विदिशेचा प्राचीन इतिहास अस्पष्ट आहे. पौराणिक कथा व परंपरा यांनुसार रामायण-महाभारतातील सत्पुरुषांचा या नगरीशी संबंध संपर्क आला. वनवासात जाताना रामाचे येथे काही दिवस वास्तव्य होते. युधिष्ठिराने आरंभलेल्या राजसुय यज्ञाचे वेळी युवनाश्व या विदिशेच्या राजाने त्याला अश्व बहाल केल्याचे उल्लेख आहेत. यदुकुलातील हैहय वंशाच्या आधिपत्याखाली विदिशा नगरी काही वर्षे होती. मौर्यकाळापासून विदिशेचा इतिहास मिळतो. सम्राट अशोक (कार. इ. स. पू.२७३-२३२) उज्जयिनीला राज्यपाल असताना विदिशेला वाटेत थांबत असे. अशा एका वास्तव्यात तेथील वेदिसमहादेवी या एका श्रेष्ठीकन्येशी त्याने विवाह केला. तिच्यापासून त्याला महेंद्र व संघमित्रा ही दोन अपत्ये झाली. मौर्यकाळाच्या अस्तानंतर पुष्यमित्र शुंगाच्या वेळी (इ. स. पू. १८७-१५१) विदिशेची भरभराट झाली. त्याने या ठिकाणी अनेक यज्ञयाग केले. शुंगकाळात विदिशेत अनेक विष्णुमंदिरे बांधली गेली. ती पाहून ग्रीकांचा राजदूत हिलिओडरस प्रभावित झाला व त्याने विदिशेतच विष्णुमंदिरासमोर भागवत धर्माचा स्वीकार केला अशी तेथील स्तंभलेखात माहिती मिळते. पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र विदिशेत राज्यपाल होता. चेदी वंशातील सम्राट खारवेलानेही हीच भूमी यज्ञासाठी निवडली होती. शुंगांनंतर भारशिव नाग त्रिदिशेचे अधिपती झाले. त्यांच्या नंतर गुप्त घराण्याची विदिशेवर अधिसत्ता होती. चंद्रगुप्ताची उज्जयिनी ही राजधानी होती. त्याने विदिशेजवळील उदयगिरीच्या डोंगरात गुहा खोदल्या आणि त्यांतून शिल्पे खोदवून घेतली. या गुहांतील दोन कोरीव लेखांवरून दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या कार्याविषयी माहिती मिळते. या गुहांतील शेषशायी विष्णू व वराह अवतार यांच्या मूर्ती भव्य व सुरेख आहेत. गुप्त काळानंतरचा या नगरीचा इतिहास आक्रमणे व स्वाऱ्या यांनी व्यापला असून, कलचुरी घराण्याच्या अंमलासाठी काही वर्षे ही नगरी होती. चंदेल्ल वंशातील राजांचे वर्चस्व काही काळ तीवर होते. चंदेल्लांच्या नोंदीत याचा उल्लेख ‘भासवत’ असा आढळतो. चंदेल्लांना मुसलमानांच्या आक्रमणांना वारंवार तोंड द्यावे लागले. इ. स. १२३४ मध्ये गुलाम वंशातील अल्तमशने विदिशा उद्ध्वस्त केली. त्यानंतर अल्लाउद्दीन खल्जी, त्याचा सेनापती मलिक काफूर यांनीही उर्वरित वास्तूंची, विशेषतः प्रसिद्ध विजयमंदिराची मोडतोड केली. पुढे चितोडचा राणासंग याने इ. स. १५३० मध्ये विदिशेवर वर्चस्व मिळवले. राणासंगाचा बाबराशी संघर्ष उद्भवला तेव्हा विदिशेचा राजा सिल्हदी राणासंगाच्या बाजूने लढला. पुढे गुजरातचा सुलतान बहादुरशाह याच्या नेतृत्वखाली लहान-मोठे राजे एकत्र आले व त्यांनी इ. स. १५३३ मध्ये विदिशेवर अयशस्वी चढाई केली. त्यानंतर बहादुरशाहने पुन्हा १५४४ मध्ये हल्ला करून विदिशा जिंकून माळव्याच्या राज्यात समाविष्ट केला. यानंतर विदिशेचे नाव भेलसा (भिलसा) करण्यात आले. पुढे औरंगजेबाने विदिशेचे नाव अलमगिरपूर ठेवले. औरंगजेबाने येथाल हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली ( १६८२) आणि एका मंदिराच्या जागी मशीद बांधली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुहम्मूदखान या अफगाण सेनापतीने महम्मूद फरूक या विदिशेच्या मोगल राज्यापालाला विश्वासघाताने ठार मारून विदिशा काबीज केली. पुढे जयपूरचा सवाई जयसिंग माळव्याचा राज्यपाल झाला. त्याने भिलसा (विदिशा) भोपाळच्या नवाबाकडे दिले परंतु मराठ्यांनी पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्वाखाली १७३६-४० दरम्यान सर्व माळवा पादाक्रांत करून विदिशेवर वर्चस्व प्रस्थापिले (१४ जानेवारी १७३७) आणि राणोजी शिंदे यास विदिशेवर सुभेदार नेमले. अमीरखान चितू व करीमखान या दोन बंडखोर पाळेगारांनी विदिशेत धुडघूस घातला. त्यांनी राणोजीस पकडले आणि त्याच्या काही नातेवाईकांची तसेच विदिशेतल्या लोकांची कत्तल केली. मराठ्यांनी १७४५ मध्ये विदिशेचा किल्ला घेतला. त्यानंतर १७६१ पर्यंत तो त्याच्या अखत्यारीत होता. तिसऱ्या पानिपतच्या लढाईच्या वेळी नानासाहेब पेशवे यांचा मुक्काम विदिशेतच होता. तेथे युद्ध हरल्याचे समजताच ते पुण्यास परतले. मराठ्यांच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन भोपाळच्या नबाबाने विदिशेवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापिले परंतु पहिल्या माधवरावाने माळव्यातील मराठी सरदारांना मदत देऊन विदिशा व पूर्व माळवा पूर्ववत मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आणला( १७६५). पुढे विदिशेची व्यवस्था शिद्यांकडे आली (१७७५). त्यानंतर महादजीने ग्वाल्हेर संस्थानच्या अखत्यारीत विदिशा आणली व संस्थान विलीन होईपर्यंत ते ग्वाल्हेरच्या आधिपत्याखाली राहिले.
विदिशा हे प्राचीन काळापासून सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय दृष्ट्या प्रसिद्ध होते. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे आणि पाटलीपुत्र, श्रावस्ती इ. महत्त्वाची तत्कालीन नगरे यांच्या मार्गावर ते असल्यामुळे विदिशेला मध्यवर्ती व्यापारी केंद्राचे महत्त्व प्राप्त झाले होते. येथील हस्तिदंती वस्तू, तीक्ष्ण धारेच्या तलवारी यांना विदेशी बाजारपेठेत मागणी असे. बौद्ध, जैन, हिंदू व मुसलमान लोकांच्या उदार आश्रयाने तसेच शासकांच्या कलाभिज्ञ वृत्तीतून येथे अनेक वास्तू बांधण्यात आल्या. ‘वेदिस गिरिमहाविहार’ ही वास्तू सम्राट अशोकाची पत्नी वेदिसमहादेवी हिने स्वतःच्या पैशातून बांधून घेतली. विदिशा गावाच्या वायव्येस सु.चार किमी.वर बेस आणि बेटवा नद्यांच्या मध्ये वायव्येकडून आग्नेयीकडे सु. एक किमी. लांबीची उदयगिरी नावाची टेकडी असून तीत गुप्तकाळात सु. वीस गुहा खोदण्यात आल्या. त्यांत जैन आणि हिंदू शिल्पे खोदलेली असून काही कोरीव लेख आहेत [⟶ उदयगिरी]. विदिशेची महत्त्वाची हिंदू वास्तू म्हणजे विजयमंदिर होय. मुसलमानांनी तिची मोडतोड केली. औरंगजेबाने ती पाडून मशीद बांधण्याचा अयशस्वी घाट घातला, तथापि या जीर्ण मंदिराच्या अवशेषांवरून मूळ वास्तूची भव्यता. डौल, बांधणी व शिल्पसौंदर्य यांची कल्पना येते. याशिवाय येथे माळव्याच्या पहिल्या महम्मूद खल्जीने इ. स. १४६० मध्ये बांधलेला लुहांगी पीराचा मकबरा आणि अकबराने इ. स. १५८३ मध्ये बांधलेली मशीद ही इस्लामी वास्तुकलेची दोन स्मारके होती. विदिशेला भरभक्कम दगडी तटबंदी होती, मात्र आज ती जमीनदोस्त झाली असून तिचे जीर्णशीर्ष अवशेष गतवैभवाची साक्ष देतात.
विदिशेच्या परिसरात सांची, जमदग्नीचा आश्रम, उदयपूरचे नीलकंठेश्वराचे मंदिर, ग्यारसपूरचे हिंडोला तोरण व माळवादेवीचे देवालय, रायसेनचा किल्ला, भोजपूरचे प्रसिद्ध मंदिर, रावणग्राम येथील प्रचंड यक्षमूर्ती इ. पुरातत्त्वीय अवशेष आढळतात. मुसलमानांच्या स्वाऱ्यांत या प्राचीन स्थळांतील अनेक मूर्तीची मोडतोड झाली, तद्वतच कालौघात काही मूर्ती खराब झाल्या. तथापि आज अवशिष्ट असलेल्या कलावशेषांतूनही येथील कलेचा उच्च दर्जा जाणवतो. त्यांतील शिल्पे व चित्रे अनेक दृष्टींनी अप्रतिम आहेत. ‘विदिशा कला’ या नावाने ती कलेतिहासात प्रसिद्ध आहेत. या संभारातील अनेक मूर्ती लंडनच्या ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात तसेच दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
विदिशा ही या परिसरातील धान्याची मोठी बाजारपेठ आहे. शहरात अनेक बँका. जिल्ह्याची सर्व शासकीय कार्यालये. अभियांत्रिकी, तंत्र व विज्ञान, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालये, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालये, संगीत विद्यालय, संस्कृत, सिंधी व उर्दू विद्यालये, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय इ. शिक्षणसंस्था आहेत. शहरातील नगरपालिका (स्थापना १९०४) पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता इ. सुविधा पुरवते. व शासकीय रुग्णालये व दवाखाने शहरात आहेत. व्यापारी दृष्ट्या शहराची फारशी प्रगती झालेली नाही. तथापि येथील शासकीय कारखान्यात धातूची भांडी व नळ तयार करतात. दरवर्षी नागपंचमीला व कार्तिक एकादशीला बिजमंडलजवळ मोठी यात्रा भरते.
संदर्भ : 1. Patil, D. R. The Cultural Heritage of Madhya Bharat, Gwalior, 1952.
2. Puri, B. N. Cities of Ancient India, Meerut, 1966.
3. Sinh, Raghubir, Malwa in Transition 1698-1765, Bombay, 1936.
४ कवचाळे, कृ. गं. माळव्याच्या प्राचीन राजधान्या, इंदोर, १९२८.
५. विद्यालंकार, सत्यदेव, मध्य भारत जनपदीय अभिनंदन ग्रंथ,ग्वाल्हेर, १९५४
देशपांडे, सु. र.
“