टास्मान, आबेल यानसन : (१६०३–५९). टास्मानियाचा डच संशोधक. जन्म ग्रोनिंगेनजवळील ल्यूत्येगास्त येथे. हा डच ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीस लागला व इंडोनेशियातील सेराम बेटाच्या समन्वेषण जहाजाचा १६३४ मध्ये कप्तान झाला. कंपनीकरिता समृद्ध प्रदेशांच्या शोधार्थ त्याने पॅसिफिक व हिंदी महासागरांत अनेक सफरी केल्या. १६३९ ते ४२ दरम्यान केलेल्या सफरींत त्याने जपान, फॉर्मोसा, कंबोडिया व सुमात्रा यांस भेट दिली. जपानच्या किनाऱ्याजवळून जाताना त्याने अनेक छोट्या बेटांचा शोध लावला. १६४२ मध्ये कंपनीप्रमुख व्हॅन डीमेन याने दक्षिण गोलार्धातील संशोधन मोहिमेचा प्रमुख म्हणून नेमल्यामुळे तो बटेव्हिया (जाकार्ता) हून मॉरिशस बेटावर आला व नंतर आग्नेयीकडे ४९° द. व ९४° पू.पर्यंत गेला. नोव्हेंबर १६४२ मध्ये तो टास्मानिया बेटावर आला. या बेटाला त्याने व्हॅन डीमेन्स लँड असे नाव दिले होते परंतु पुढे टास्मानिया हेच नाव रूढ झाले. कंपनीच्या आदेशामुळे त्याला बॅस सामुद्रधुनीकडे जाता आले नाही. न्यूझीलंड, टाँगा, फिजी व न्यू गिनी येथे जाऊन जून १६४३ मध्ये तो बटेव्हियाला परतला. या त्याच्या सफरीने ऑस्ट्रेलिया हे खंडात्मक बेट असल्याचे त्याने सिद्ध केले. १६४४ मध्ये कंपनीने बरोबर काही तज्ञ माणसे देऊन त्याला पुन्हा सफरीवर पाठविले. या सफरीत त्याने  न्यू गिनी, टास्मानिया व ऑस्ट्रेलियाचा बराच भाग यांची माहिती मिळविली व नकाशे तयार केले. तथापि नवीन समृद्ध प्रदेश आणि चिलीला जाण्याचा मार्ग न शोधल्यामुळे कंपनीचे अधिकारी त्याच्यावर असंतुष्ट होते. १६४७ मध्ये सयामला जाणाऱ्या व्यापारी जहाजावर व १६४८ मध्ये स्पेनविरुद्ध लष्करी जहाजाचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक झाली. १६४८ मध्ये त्याने कंपनीकरिता फिलिपीन्सला भेट दिली. १६५३ मध्ये कंपनीच्या नोकरीतून मुक्त होऊन टास्मान बटेव्हियात स्थाईक झाला व तेथेच मरण पावला.

शाह, र. रू.