विटा-१ : बांधकामासाठी वापरण्यात येणारे आणि माती, शेल (मृत्तिका) किंवा इतर खनिज द्रव्यांपासून तयार केलेले ठराविक मापांचे आयतकार ठोकळे. भाजल्यावर विटा मजबूत, टिकाऊ आणि आकर्षक बनतात. भाजलेल्या विटांवर अग्नी व वातावरण याचा विशेष हानिकारक परिणाम होत नाही तसेच त्यांची रचाई सोपी व जलद होते. यांमुळे मुख्यतः भिंतीसाठी तसेच भारवाही व आडभिंतीसाठी विटा वापरतात [⟶गवंडीकाम]. शिवाय जमिनी, पाऊलवाट, पदपथ, छपरे, कॉंक्रीट इत्यादींसाठीही विटा वापरतात. युफ्रेटीस, टायग्रिस, नाईल, गंगा, यमुना, सिंधू इ. नद्यांच्या खोऱ्यांत दगडाचा अभाव असून नदीकाठी विटा करण्यायोग्य माती मिळते. यामुळे त्या भागात विटांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. चिकणमातीचे किंवा काँ क्रीटचे भरीव अथवा पोकळ ठोकळे तसेच चुना व वाळू यांच्यापासून बनविलेल्या सुधारित विटा यांचा मातीच्या विटांऐवजी वापर करतात [⟶बांधकामाची सामग्री].

विटांचा इतिहास पाहिला असता त्यांच्या आकारमानामध्ये फार बदल झालेले दिसतात. बांधकाम करताना विटा हाताने बसविल्या जात असल्यामुळे त्या एका हाताने सहज उचलता येतील असे आकारमान आणि आकार त्यांना दिलेला असतो. सर्वसामान्यपणे सु. ८-९ इंच (२०-२२ सेंमी. कधीकधी १२ इंच किंवा ३० सेंमी.)लांब, ३ /–४ / इंच (९- ११ सेंमी. कधीकधी ६ इंच वा १५ सेंमी.) रूंद आणि २- ३ इंच (५-७.५ सेंमी.) जाड अशा मापाच्या असतात. भारतीय मानक संस्थेने २०×१०×१० (किंवा ५) सेंमी. असे विटेचे आकारमान निर्बंधित केलेले आहे. विटेची रूंदी तिच्या लांबीच्या निम्म्यापेक्षा सु. १/४ इंचाने कमी असते. त्यामुळे दोन विटा लांबीच्या दिशेने आणि त्यांच्यावर दोन विटा आडव्या ठेवून त्यांमध्ये संयोजक संयोजक (उदा., चुना, सिमेंट) भरला असता, खालील विटा बरोबर झाकल्या जातात. कमानीच्या, पडखांबाच्या, फरसबंदीच्या तसेच तिरप्या विटा खास आकारमानांच्या व आकारांच्या बनवितात.

इतिहास:विटांचा वापर हजारो वर्षापासून बांधकामाचे साहित्य म्हणून होत आहे. मध्य-पूर्व प्रदेशात इ. स. पू. ६००० पासून उन्हात वाळविलेल्या कच्चा विटा बनविण्यात येत होत्या. इ. स. पू. ३५०० पासून त्याच भागात भाजलेल्या विटा तयार होऊ लागल्या. जेरिको शहराखालील प्राचीन वसाहतीच्या जागी ८,००० ते १०,००० वर्षापूर्वीची वीट सापडली आहे. विटा तयार करण्याच्या पद्धतीचा प्रसार मध्य-पूर्व प्रदेशातून पूर्वेकडे भारत व चीन या देशांत आणि पश्चिमेकडे ईजिप्त व भूमध्य समुद्र प्रदेशात झाला. हे तंत्रज्ञान यूरोप खंडातील लोकांना रोमन लोकांकडून माहीत झाले.

विटांवर ग्रंथ लिहिले जात. त्यांना इष्टिका ग्रंथ म्हणतात. सु. ५ इंच लांबीच्या अर्धवट ओल्या विटांवर दाभणासारख्या कोरणीने कोरून मजकूर विहीत. मग विटा उन्हात वा भट्टीत वाळवून कठीण करीत. [उदा., इ. स. पू. सातव्या शतकातील ऑसिरियन राजे असुरबनिपाल यांच्या काळातील इष्टिका ग्रंथ ⟶ ग्रंथ].

बायबलमध्ये विटानिर्मितीचा अगदी सुरुवातीचा लिखित उल्लेख आढळतो. त्या विटा ईजिप्शियन लोकांनी इझ्रायली लोकांकडून तयार करून घेतल्यासंबंधीचा इतिहास या ग्रंथामध्ये मिळतो. तसेच यास बॅबेलचा भव्य व उंच मनोरा बांधण्याकरिता भाजलेल्या विटा वापरण्यात आल्या अशी माहिती मिळते. युफ्रेटीस नदीकाठच्या ⇨झिगुरात अवशेषांवरून विटांचे बांधकाम ४,५०० वर्षापूर्वी केलेले आढळते. बॅबिलन शहराभोवती असलेली तटबंदी बांधण्याकरिता भाजलेल्या विटा वापरण्यात आल्या, असे ग्रीक इतिहासतज्ञ हीरॉडोटस (इ. स. पू. पाचवे शतक) यांनी सांगितले. मेसोपोटेमियातील कीश येथील राजवाडा भाजलेल्या विटांचाच बांधलेला असल्याचे आढळून आले. चीनमध्ये इ. स. पू. तिसऱ्या शतकात प्रचंड भिंतीचे अनेक भाग बांधण्याकरिता विटाच वापरण्यात आल्या.

रोमन लोक ऑगस्टस यांच्या काळापर्यंत (इ. स. पू. ६३ ते इ. स. १४) उन्हात वाळविलेल्या कच्चा विटा वापरीत असत परंतु नंतर ते भाजलेल्या विटा वापरू लागले. त्यांनी भिंती, किल्ले, सांस्कृतिक केंद्रे, घुमट, कमानी, जलसेतूचे पृष्ठभाग इत्यादींकरिता विटांचा वापर केला (उदा., पाँपेई शहराचे प्रवेशद्वार, रोममधील स्नानगृहे).

मध्य अमेरिकेत (विशेषतः मेक्सिकोमध्ये) शेकडो वर्षे माती व काड वा पेंढा यांपासून कच्चा विटा तयार करीत व त्या उन्हात वाळवीत.

सिंध व पंजाबमध्ये उत्खननांत २,५०० ते ३,००० वर्षापूर्वीच्या विटांच्या इमारती, गटारे, विहीरी, धान्यकोठारे वगैरे सापडली आहेत. बुद्धगयेत महाबोधी मंदिरात विटांच्या कमानी व मेघडंबऱ्या आढळतात. मराठवाड्यात सु. १,२०० वर्षापूर्वी पाण्यावर तरंगणाऱ्या हलक्या विटा तयार करीत. तेर (जि. उस्मानाबाद) येथे अशा विटांचे बांधकाम सुस्थितीत राहिले आहे. बांगला देशातील पहाडपूर येथे आठव्या शतकातील मंदिराचे विटांच्या अनेक चौथऱ्यांवर बांधलेले अवशेष आढळले आहेत. दिल्ली, आग्रा, कानपूर, विजापूर रामेश्वर इ. ठिकाणी ४००-५०० वर्षापूर्वी बांधलेल्या प्रसिद्ध इमारती विटांच्या आहेत.

कच्च्या विटा:काड मिसळलेल्या मातीपासून आणि उन्हात वाळवून या विटा तयार करतात. कोरडे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) असलेल्या प्रदेशांत या मोठ्या प्रमाणात वापरतात.

भाजलेल्या विटा:मातीच्या विटा भाजल्यावर त्यातील खनिजांपासून नवी संयुगे बनतात व सुटे कण सांधले जाऊन घट्ट बसतात. यांमुळे भाजलेल्या विटा अधिक भार पेलू शकतात व जलाभेद्य बनतात. विटा बनविण्यासाठीच्या मातीत साधारणपणे ॲल्युमिना (२५-३० %), सिलिका (५०-७५ %) आणि चुना (२-५ %) हे घटक असतात. त्यांशिवाय थोडे आयर्न ऑक्साइड किंवा मॅग्नेशिया अशी काही संयुगे असतात. ॲल्युमिन्यामुळे मातीला चिवटपणा येतो व ती आकार्य (आकार देता येण्यासारखी) होते. सिलिकेमुळे वीट आकसत व आकुंचन पावत नाही, तिला भेगा पडत नाहीत, ती वेडीवाकडी होत नाही आणि तिचे सर्व काठ (कडा) चांगले धारदार राहतात. भाजली जात असताना चुन्यामुळे वीट आकसत नाही आणि मातीमधील सर्व घटक एकमेकांबरोबर चांगले सांधले जातात. आयर्न ऑक्साइडामुळे भाजलेल्या विटेला आकर्षक गुलाबी (विटकरी) रंग येतो. मॅग्नेशियामुळे वीट पिवळसर होते.

लवणे मिसळलेली वा अल्प प्रमाणात मीठ असलेली माती विटांसाठी वापरीत नाहीत. लवणांमुळे वीट भिंतीसाठी वापरल्या, तर त्या हवेतील ओलावा शोषून घेतात व तो ओलावा सुकला म्हणजे विटेवर पांढरट पुटाचे डाग दिसतात. मातीची खरी परीक्षा करण्यासाठी प्रत्यक्ष विटाच करून भाजतात व त्यांची दाब सहन करण्याची क्षमता मोजून पाहतात.

जमिनीतून उकरून काढलेली माती उघड्या जागेत रापवितात आणि रापलेली माती भिजवून तिंबतात किंवा मळतात. या प्रमुख प्रक्रियांद्वारे विटांसाठी चिखल तयार करून घेतात.

उकरून बाहेर काढल्यावर माती चाळून तिचे ६० ते १२० सेंमी. उंचीचे ढीग करून ते जरूरीप्रमाणे दोन आठवड्यांपासून चार महिन्यांपर्यंतही रापवितात. माती रापली म्हणडे तिचा बारीक चूर करतात व त्यामध्ये जरूरीप्रमाणे दुसरी एखादी माती, कोकचा चुरा, राख इ. इतर पदार्थ चांगले मिसळतात व मुख्य मिश्रण तयार करतात. या मिश्रणामध्ये थोडे पाणी घालून ते मिश्रण चांगले तुडवतात किंवा यंत्राच्या साह्याने तिंबून चांगले एकजीव करतात म्हणजे चिकट मातीचा ओलसर लगदा तयार होतो.


आ. १. विटाळे : विटाळे (१) लाकडी, (२) पोलादी.विटा तयार करण्याची पद्धत:ठराविक आकारमानाची वीट बनविण्यासाठी लाकडी किंवा पोलादी पट्टीचे विटाळे (साचा) वापरतात (आ. १).

भारतामध्ये बहुतेक लहान गावांत अजूनही विटा हातांनीच तयार करतात व साच्यात प्रत्येक वेळी एकच वीट तयार होते. काही ठिकाणी २२×११×७ सेंमी व काही ठिकाणी १९×९×९ सेंमी. अशा मापाच्या विटा बनवितात. हाती पद्धतीने विटा तयार करताना प्रथम विटेपेक्षा थोडा मोठा चौकोनी सपाट पत्रा टेबलावर किंवा सपाट जमिनीवर ठेवतात व त्यावर विटोळे ठेवतात. नंतर विटाळ्याच्या आतल्या बाजूला पाणी किंवा ओलसर बारीक वाळू लावतात. त्यामुळे विटाळ्याला माती चिकटून राहत नाही. मग त्यात ओलसर मातीचा लगदा दाबून भरतात आणि वर आलेली माती पोलादी पट्टीने खरडून काढतात. नंतर विटोळे उचलून विटा सुकविण्याच्या जागी नेतात. तेथे विटाळ्यातील कच्ची वीट एका पत्र्यावर काढून लांबट बाजूवर उभी करून वाळत ठेवतात.

उत्तम प्रकारच्या विटा तयार करताना प्रत्येक विटेच्या एका रुंद बाजूवर खोलगट भाग तयार करून त्यामध्ये दोन किंवा तीन सांकेतिक अक्षरे उमटवितात. त्यासाठी विटोळे ठेवण्याच्या पत्र्यावर ही अक्षरे उलटी कोरलेली एक मुद्रा बसविलेली असते. त्यामुळे प्रत्येक वीट तयार करताना त्या विटेवर ही अक्षरे चांगली उमटतात. अशा विटांना नंबरी विटा म्हणतात.

यंत्राने विटा तयार करताना पगामिलमध्ये माती चांगली मळून घेतात. विटांच्या आकामानाप्रमाणे पगमिलला तोंड (मुद्रा) जोडतात. या तोंडातून मातीची लाट (वा स्तंभ) बाहेर येते. सारख्या अंतरावर उभ्या तारा जोडलेली चौकट वापरून मातीची लाट कापतात. अशा प्रकारे सारख्या आकारमानाच्या विटा तयार होतात. या पद्धतीत एका वेळेला ७ ते १४ व दिवसाला ५,००० ते ५०,००० विटा तयार होतात. या विटांचा आकार चांगला सुबक असून त्या घट्ट व चांगल्या गुणवत्तेच्या असतात. चेन्नई, दिल्ली व कलकत्ता येथे असे कारखाने आहेत.

आ. २. विटा भाजण्याची ढीग भट्टी : (१) विटा, (२) जळण, (३) मातीचे लिंपण.विटा भाजण्याची पद्धत:कच्च्या विटा उघड्या जागेत ठेवून चांगल्या सुकवितात. मग त्या भट्टीमध्ये रचून अगदी सावकाश भाजतात. भट्टीमध्ये कच्च्या विटा रचताना एका थरातील सर्व विटा एकमेकीपासून अलग राहतील अशा मांडतात. त्यामुळे भट्टीमधील उष्णता सर्व बाजूंना सारखी वाटली जाते. विटा भाजण्यासाठी अनेक प्रकारच्या भट्ट्या वापरतात.

विटा भाजण्याकरिता खेडोपाडी ढीग भट्ट्या वापरतात (आ.२) तळाला जळणाचा सु. अर्धा मी. जाडीचा थर पसरून त्यावर विटा रचतात. तळाजवळील आ. ३ काम सतत चालू ठेवता येणारी, १२ गाळे असलेली विटा भाजण्याची अखंड भट्टी: १ ते १२ गाळे (कक्ष), ध-धुराडे, द-हवा नियंत्रित करण्याची झडप लावलेला दरवाजा, ख-धुराड्यात उघडणारी खिडकी जळणाचा थर अशा क्रमाने सु. एक लाख विटा रचतात. जळणाच्या थराची जाडी वरच्या थरांत  कमी ठेवतात. भटटी मातीने चौफेर लिंपून घेतात. यामुळे उष्णता वाया जात नाही. तळातील मोऱ्यांत लाकडे पेटवून भट्टी पेटवितात. भट्टी पेटल्यावर तिचा माथा लिंपतात. महिना-दीड महिना ढीग भट्टी जळत राहते व त्यानंतर तिच्या बाजू उलगडून भट्टी सावकाश निवू देतात. या भट्टीत जळणालगतच्या थरांत खंगर विटा आणि बाहेरच्या थरांत भाजलेल्या विटा बऱ्याच निघतात. अशा भट्टीमध्ये उष्णता उत्पन्न करण्यासाठी कोणतेही स्वस्त इंधन वापरता येते परंतु आता शक्य असेल तेथे दगडी कोळशाची राख चाळून तीमध्ये निघालेले अर्धवट जळालेले कोकचे तुकडे इंधन म्हणून वापरतात. या पद्धतीने मिळालेली राख विटा बनविण्यासाठी वापरता येते. विटांच्या मातीच्या मिश्रणात अर्धवट जळालेली राख वापरतात. यामुळे वीट आतूनही चांगली भाजली जाते मातीचा चिकटपणा कमी होतो सुकताना विटांना भेगा पडत नाहीत आणि तापमान जास्त ठेवता येत असल्याने विटा मजबूतही होतात [⟶मृत्तिका उद्योग].

अलाहाबाद भट्ट्यांच्या चारी बाजू पक्क्या बांधलेल्या असतात. प्रत्येक विटेसभोवर थोडीफार मोकळी जागा राहील अशा विटांच्या थप्पा रचतात. तळातील मोऱ्यांत लाकडे, कोळसा वगैरे जळण पेटते ठेवून त्यापासून निघालेली उष्णता थप्पीत सर्वत्र खेळते आणि विटा चार-पाच दिवसांत एकसारख्या भाजल्या जातात. ही भट्टी सु. दहा-बारा दिवसांत निवते.


ज्या ठिकाणी महोत्पादन पद्धतीने विटा तयार करतात तेथे सतत चालणारी सुधारलेली अखंड भट्टी वापरतात (आ. ३). या प्रकारात विटांकरिता दहा ते वीसपर्यंत भट्ट्या निघतील असे गाळे (कक्ष) असतात. ते एकमेकांस व प्रत्येक गाळा मध्यवर्ती धुराड्यास जोडलेला असतो. गाळे एकमेकांशी किंवा धुराड्याशी झडपांनी जोडलेले असतात. प्रत्येक गाळ्याच्या बाहेरच्या बाजूस विटा आणि इंधन आत भरण्याचा दरवाजा असतो व तो हवा तेवढा उघडून गाळ्यामध्ये जाणाऱ्या हवेचे नियंत्रण करता येत. एक गाळा रिकामा करण्याचे काम चालते व त्याच्या एका बाजूच्या गाळ्यात विटा भरण्याचे काम चालते तर दुसऱ्या बाजूच्या लागोपाठच्या चार गाळ्यांत निवणाऱ्या विटा आणि त्यांपुढील दोन गाळ्यांत विटा भाजल्य जात असतात. विटा भरण्याचे व काढण्याचे काम चालू असलेल्या गाळ्यांतून आत शिरणारी हवा निवणाऱ्या विटांवरून जाताना तापते व त्यापुढील दोन गाळ्यांतील ज्वलनास मदत करते. ज्वलन होत असलेल्या गाळ्यांतील अधिक उष्ण झालेली हवा त्याच्यापुढील चार गाळ्यांत ओलसर विटांना सुकवीत धुराड्याकडे जाते. धुराड्यामुळे हवेचा हा प्रवाह चालू राहतो. अशा पद्धतीने इंधनाचा खर्च वाचविला म्हणजे उत्पादन खर्चातही बचत होते आणि मालही चांगल्या प्रतीचा निघतो.

चांगल्या विटेची वैशिष्ट्ये : चांगल्या विटेच्या कडा धागदार, कोपरे गुण्यात व समोरासमोरील पृष्ठे समांतर असून ती चांगली सुबक आयताकार असते. ती सर्व बाजूंनी चांगली भाजलेली असून मजबूत असते. तिच्यावर तशीच दुसरी वीट आपटल्यास धातुसारखा खणखणीत आवाज येतो. ती सु. १ मी. उंचीवरून पडल्यास फुटत नाही. पाण्यात बुडविल्यास पाणी शोषले जाऊन तिच्या वजनात १०% पेक्षा अधिक वाढ होत नाही. सामान्य प्रकारची चांगली वीट सपाट बाजूवर ठेवली असता दर चौ. सेंमी.ला २०० किग्रॅ. तर उत्तम प्रकारची वीट ४४० किग्रॅ. एवढा दाब सहन करू शकते.

वेदकालीन विटा:वैदिक संस्कृतीच्या उत्तरार्धात विटांचा उपयोग यज्ञातील वेदी, होमकुंडे इत्यादींसाठी होत असे. यजुर्वेदात विटा कशा कराव्यात हे सांगितले आहे. विटांना उपयोगी असलेल्या मातीत दगडाची पूड, लोखंडाचा कीस, जुन्या खापऱ्या, बकरीचे आणि हरणाचे केस घालीत. गारा करण्यासाठी पळसाचा डिंक घातलेले उकळते पाणी वापरीत. पूर्ण वाळल्यांनंतर खड्ड्यांत रचून लाकडांनी भाजीत. भाजल्यानंतर थंड होताना बकरीचे दूध त्यांवर शिंपडीत.

उच्चतापसह विटा: (आगविटा). साध्या मातीऐवजी पांढरट रंगाची आगमाती वापरली, तर त्या विटा १,५००°से.पर्यंत किंवा अदिक तापमानालाही सुस्थितीत राहतात. अशा विटा भट्टीच्या आतील भिंतींच्या अस्तरासाठी वापरतात. सिलिका ९५-९७% आणि चुना १-२% असे मिश्रण करून दाब पद्धतीने ज्या विटा तयार करतात त्या भट्टीमधील अम्लीय जातींच्या अस्तरासाठी वापरतात. मॅग्नेसाइट आणि डोलोमाइट यांच्या मिश्रणापासून ज्या विटा तयार करतात, त्या भट्टीमधील क्षारीय (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणाऱ्या पदार्थाच्या) जातीचे अस्तर लावण्यासाठी वापरतात. बॉक्साइट आणि क्रोमाइट यांच्या मिश्रणापासून बनविलेल्या विटा उदासीन (अम्लीय वा क्षारीय गुणधर्म नसलेल्या पदर्थाच्या) जातीचे अस्तर लावण्यासाठी वापरतात. अभ्रकाचा भुगा व थोंडी चिनी माती वापरून बनविलेल्या विटा विद्युत् भट्टीमधील निरोधक अस्तरासाठी वापरतात. [⟶उच्चतापसह पदार्थ].

उच्च तापमानाच्या सान्निध्यात येणारे भट्टीचे भाग अशा विटांचे बनवितात, तर ज्योतीच्या वा आगीच्या संपर्कात न येणाऱ्या विटा खास सच्छिद्र असून त्या उष्णता निरोधक व कुसंवाहक असतात. [⟶भट्टी].

विशेष प्रकारच्या विटा:साध्या मातीच्या विटेपेक्षा चुना आणि वाळू यांचाय मिश्रणापासून तयार केलेली वीट पुष्कळ मजबूत होते व दिसण्यास सुबक असते. अशा विटा इमारतीच्या दर्शनी भागासाठी वापरतात. अशा विटा तयार करताना स्वच्छ धुतलेल्या दाणेदार वाळूमध्ये ४-१०% फकीचा चुना मिसळतात व ते मिश्रण दगडी घाणीत चांगले मळतात. या चिकट मिश्रणाचे लहान गोळे करून त्याने विटाळे चांगले दाबून भरतात व त्यांवर ३५०-५६० किग्रॅ./सेंमी. इतका दाब देतात. अशा प्रकारे दाबून तायर केलेल्या कच्च्या विटा एका बंदिस्त दाबपात्रामध्ये भरतात आणि त्या पात्रात ८-१० किग्रॅ./सेंमी. एवढ्या दाबाची वाफ सोडून दहा तास तापवितात. त्यामुळे त्या विटा चांगल्या बाजल्या जाऊन विशेष मजबूतही होतात.

पहा:गवंडीकाम बांधकामाची सामग्री भट्टी मृत्तिका उद्योग.

संदर्भ : 1. Chaudhari, N., Ed., Building Materials, Calcutta, 1966.

           2. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part I, Delhi, 1948.

           3. Deshpande, R. S. Engineering Materials for Diploma Students, Poona, 1964.

विद्वांस, अ. वा. सूर्यवंशी, वि. ल.