विग्नर, यूजीन पॉल : (१७ नोव्हेंबर १९०२− ). हंगेरियन-अमेरिकन भौतिकीविज्ञ. त्यांना ⇨मारीआ गोपर्ट मायर व ⇨योहानेस हान्स डानियल येन्झेन यांच्या समवेत १९६२ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. अणुकेंद्र व मूलकण यांच्या सिद्धांतात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल, विशेषतः ⇨सममिती नियमांचा त्यांनी लावलेला शोध व त्यांचा केलेला उपयोग याबद्दल, त्यांना हे पारितोषिक देण्यात आले. विसाव्या शतकातील थोर भौतिकीवज्ञांत त्यांची गणना होते.

विग्नर यांचा जन्म बुडापेस्ट येथे झाला. हंगेरीत शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९२५ मध्ये बर्लिन येथील तांत्रिक विद्यालयातून रासायनिक अभियांत्रिकीची डॉक्टरेट पदवी मिळविली. काही काळ चर्मोद्योगात रासायनिक अभियंता म्हणून काम केल्यावर ते १९२६ मध्ये बर्लिनच्या तांत्रिक विद्यालयाच्या भौतिकी विभागात व पुढे गर्टिंगेन येथे साहाय्यक होते. १९२८ मध्ये ते बर्लिनच्या तांत्रिक विद्यालयात विनावेतन अध्यापक झाले. पुढे १९३० मध्ये ते अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात गणितीय भौतिकीचे अध्यापक म्हणून गेले आणि मग १९३१−३७ या काळात ते तेथे अर्धवेळ प्राध्यापक होते. त्यानंतर विस्कॉन्सिन विद्यापीठात ते प्राध्यापक झाले पण १९३८ मध्ये ते प्रिन्स्टन विद्यापीठातून गणितीय भौतिकीचे प्राध्यापक म्हणून परतले. लिओ त्सिलार्ड व एडवर्ड टेलर या दोन हंगेरियन शास्त्रज्ञांसमवेत विग्नर यांनी प्रयत्न करून अमेरिकेचे त्या वेळचे अध्यक्ष फ्रँक्लिन रूझवेल्ट यांना अमेरिकेच्या अणुबाँब प्रकल्पाला चालना देणारे ऐतिहासिक पत्र लिहिण्यास अँल्बर्ट आइन्स्टाइन यांना उद्युक्त केले. दुसऱ्या महायुद्ध काळात विग्नर यांनी शिकागो विद्यापीठातील धातुवैज्ञानिक प्रयोगशाळेत काम केले आणि एनरीकोफिर्मी यांना पहिली नियंत्रित अणुकेंद्रीय भंजन विक्रिया प्रस्थापित करण्यास मदत केली. विग्नर यांनी ओक् रिज् येथील क्लिंटन लॅबोरेटरीजमध्ये संशोधन व विकास संचालक म्हणून १९४६−४७ मध्ये काम केले. १९७१ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रिन्स्टन, लुइझिॲना राज्य विद्यापीठ वगैरे अनेक विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. १९३७ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. अणुऊर्जा आयोगाच्या सर्वसाधारण सल्लागार मंडळाचे १९५२−५७ मध्ये व १९५९−६४ मध्ये ते सदस्य होत.

विग्नर यांनी प्रारंभी रासायनिक विक्रियांच्या वेगासंबंधी संशोधन केले. त्यानंतर त्यांनी ⇨पुंजयामिकीत ⇨गट सिद्धांताचा उपयोग करण्यासंबंधीची तत्त्वे विकसित केली आणि मूलकणांचे वर्तन चिन्हित करणारी अवकाश व काल यांतील सममितीची संकल्पना मांडली. आणवीय व रेणवीय वर्णपटलांतील नियमिततांचे स्पष्टीकरण करण्यासाठी या तत्त्वांचा त्यांनी विशेषत्वाने उपयोग केला. या संशोधनाच्या संदर्भात               त्यांनी गट सिद्धांतावर १९३१ मध्ये लिहिलेला ग्रंथ या क्षेत्रातील अभिजात ग्रंथ म्हणून गणला जातो. या ग्रंथाचे १९५९ मध्ये ग्रुप थिअरी या शीर्षकाखाली इंग्रजीत भाषांतर प्रसिद्ध झाले. विग्नर यांचे बरेचसे संशोधन सापेक्षता सैद्धांतिक तरंग समीकरणांच्या सिद्धांताविषयी (विशेषतः त्यांच्या गट सैद्धांतिक गुणधर्माविषयी) होते. भौतिकीय प्रक्रियांच्या निश्चल राशीसंबंधी भाकित करण्यातील सममिती तत्त्वांचे महत्त्व प्रथम ओळखलेल्या शास्त्रज्ञांपैकी ते एक होते आणि यांपैकी अनेक तत्त्वे त्यांनी स्वतः मांडली. यातून समतेची अक्षय्यता [⟶ समता] व काल व्युत्क्रमण या आविष्कारांचा पहिला तर्कशुद्ध परामर्श घेण्यास आधार मिळाला.

विग्नर यांनी १९३६ मध्ये न्यूट्रॉन शोषणासंबंधीचा सिद्धांत तपशीलवार मांडला. १९३८ मध्ये त्यांनी अणुकेंद्रकीय भंजनापासून ऊर्जा मिळविण्याच्या प्रश्वनाकडे आपले लक्ष वळविले. त्यांनी अणुकेंद्रकीय विक्रियकासंबंधीची (अणुबंधीसंबंधीची) परिगणने करण्यासाठी सैद्धांतिक तंत्रे विकसित केली व त्यांपैकी फैर्मी यांना पहिली नियंत्रित अणुकेंद्रकीय शृंखला विक्रिया निर्माण करण्यास आधारभूत ठरली. सैद्धांतिक बाजूबरोबरच विग्नर यांना विक्रियक आराखडा व संबंधित यांत्रिक यांच्या तांत्रिक तपशीलांचेही उत्तम ज्ञान होते.

त्यानंतरच्या काळात विग्नर यांचे लक्ष पुंजयामिकी सिद्धांताच्या तत्त्वज्ञानात्मक अभिप्रेत अर्थाकडे, तसेच विज्ञानाचे भवितव्य व त्याचे समाजाशी असावे लागणारे उचित संबंध यांविषयी अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या समस्यांकडे वेधले गेले. यासंबंधी त्यांनी अनेक निबंध लिहिले उदा., द लिमिट्स ऑफ सायन्स (१९५०), टू काइंड्स ऑफ रिॲलिटी.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगाने एन्रीको फेर्मी पारितोषिक (१९५८), ‘शांततेसाठी अणू’ पुरस्कार (१९६०), जर्मन फिजिकल सोसायटीचे माक्स प्लांक पदक (१९६२), ॲल्बर्ट आइनस्टाइन पुरस्कार (१९७२) हे महत्त्वाचे बहुमान तसेच विस्कॉन्सिन, वॉशिंग्टन, केस नोत्रदाम वगैरे अनेक विद्यापीठांकडून सन्माननीय पदव्या मिळाल्या. अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स वगैरे अनेक मान्यवर वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य आहेत. गट सिद्धांतावरील ग्रंथाखेरीज त्यांनी न्यूक्लीअर स्ट्रक्चर (एल्. आयझेनवडसमवेत, (१९५८), द फिजिकल थिअरी ऑफ न्यट्रॉन चेन रिॲक्टर्स (ए. एम्. वाइनबर्गसमवेत, १९५८), सिमेंट्रीज अँड रिफ्लेक्शन्स (१९६७) हे ग्रंथ लिहिले. त्यांनी डिस्पर्शन रिलेशन्स अँड देअर कनेक्शन वुइथ कॉझॅलिटी (१९६४), हू स्पिक्स फॉर सिव्हिल डिफेन्स (१९६८) व सर्व्हायव्हल अँड द बाँब : मेथडस ऑफ सिव्हिल डिफेन्स (१९६९) या ग्रंथांचे संपादक केले.

भदे, व. ग.