विकासावरोध : पुष्कळ कीटक व माइट, तसेच थोडे कवचधारी प्राणी व गोगलगाई आणि कदाचित इतर विशिष्ट आणि गटातील प्राणी आपल्या शरीराची वाढ, प्रजोत्पादन इ. जीवनव्यवहार स्वाभाविकपणे (स्वतः होऊन) काही काळ स्थगित ठेवतात. त्यांच्या या स्थितीला विकासावरोध म्हणतात. डब्लू. एम्. व्हीलर यांना काही नाकतोड्यांच्या गर्भावस्थेत अशी परिस्थिती सर्वप्रथम आढळली व तिच्याकरिता त्यांनी ही संज्ञा वापरली. त्यांच्या या म्हणण्याला एल्. एफ्. हेनेगाय यांनी दुजोरा दिला.

या परिस्थितीत प्राण्याचे चयापचयाचे (शरीरात सतत होणऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींचे) कार्य कमी झालेले आढळते. येऊ घातलेल्या पर्यावरणीय प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची ही पूर्वतयारी वा प्रतिसाद असतो, असे बाह्यतः म्हणता येईल. याचा अर्थ ही स्थिती काही अंशी नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असते. अंडी, अळी (डिंभ), कोश व प्रौढ, कीटक यांपैकी कोणत्याही अवस्थेत विकासावरोध आढळू शकतो मात्र कोशावस्थेत ही स्थिती सर्वात सामान्यपणे आढळते.

विकासावरोधात कीटक (प्राणी) अन्नपाणी ग्रहण करीत नाहीत व त्यांच्या प्रजोत्पादनाच्या ग्रंथीचे कार्य थांबते. अनुकूल परिस्थिती निर्माण होताच ही स्थिती संपते व कीटक नेहमीप्रमाणे जीवनव्यवहार करू लागतो. काही कीटकांची विकासावरोध अवस्था रासायनिक वा भौतिक प्रयोगाने वा उष्णतेने संपुष्टात आणता येते. उदा., बाँबिक्स मोरी या जातीचे रेशमाचे किडे प्रयोगाशाळेत सहजपणे जगविता व वाढविता येत असल्याने त्यांच्यावर असे बरेच प्रयोग करण्यात आलेले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत यांची अंडी विकासावरोध दाखवितात म्हणजे त्यांच्यापासून योग्य वेळी अळ्या बाहेर पडत नाहीत. मात्र या अंड्यांना वीजेचा सौम्य धक्का दिला अथवा ती काही वेळ सौम्य हायड्रोक्लोरिक अम्लात ठेवली किंवा त्यांना सुई टोचली, तर थोड्याच वेळात ती या सुप्त अवस्थेतून बाहेर पडतात. मग त्यांचा झपाट्याने विकास होऊन थोड्याच दिवसांत त्यांच्यातून अळ्या बाहेर पडतात. बाह्य परिस्थिती प्रतिकूल असतानाच नव्हे तर काही कीटक ही परिस्थिती अनुकूल असतानाही विकासाबरोध दर्शवितात, असे व्ही. बी. विगल्सवर्थ यांचे मत आहे.

विकासावरोधात अनेक नैसर्गिक घटक कारणीभूत असतात. त्यांच्यापैकी उष्णता, आर्द्रता, अन्नाची उपलब्धता व सूर्यप्रकाश हे महत्त्वाचे आहेत. कीटकांच्या वाढीसाठी तापमान एका किमान व कमाल मर्यादेत असावे लागते. किमान पातळीच्या बरेच खाली तापमान गेल्यास कीटक विकासावरोध दर्शवितात आणि तापमान पुरेसे वाधले की, त्यांचा जीवनक्रम नियमितपणे सुरू होतो उदा., रेशमाचे किडे व मेलॅनोप्लस प्रजातीतील कीटक (एक प्रकारचे टोळ). हवेतील आर्द्रता कमी झाल्यावर काही कीटक विकासावरोध दर्शवितात उदा., सिटोना व नोटोस्ट्रिया या प्रजातीचे कीटक. अन्नपदार्थांतील आर्द्रता कमी असल्यास काही कीटक विकासावरोध दाखवितात उदा., कापसाच्या बोंडातील तांबूस अळी. बऱ्याच कीटकांची योग्य रीतीने वाढ होण्यासाठी १०−१२ तास सूर्यप्रकाशाची गरज असते. असा भरपूर प्रकाश न मिळाल्यास हे कीटक विकासावरोध दाखवितात उदा., पिरीस, पायरोस्टा इ. प्रजातींचे कीटक. अशा प्रकारे कोणत्याही अवस्थेतील कीटकाला बाहेरच्या अनुकूल घटकांची जाणीव होताच त्याच्या शरीरातील अंतःस्त्रावी (वाहिनीविहीन) ग्रंथींतून हॉर्मोन (उत्तेजक स्त्राव) स्त्रवतो व तो सरळ रक्तात मिसळून शरीरभर पसरतो, त्यानंतर सुप्तावस्था (विकासावरोध) जाऊन कीटकाचे नित्य जीवनव्यावहार सुरू होतात.

विकासावरोधाची सुरुवात व शेवट यांचे नियंत्रण करणारी यंत्रणा जवळजवळ अज्ञातच आहे. तथापि काही कीटकांत प्रोक्टोडोन हे हॉर्मोन या यंत्रणेचे गमक असल्याचे म्हणतात. या हॉर्मोनामुळे विकास परत सुरू होतो, असे मानतात. अग्र आतड्याच्या भागात निर्माण होणाऱ्या या हॉर्मोनामुळे मेंदूतील हॉर्मोननिर्मितीला चालना मिळते, असेही मानतात तसेच वृद्धीशी व कात टाकण्याशी निगडित असलेल्या हॉर्मोनांची शरीरातील संहती (प्रमाण) कमी झाल्यावर विकासावरोध सुरू होतो, असे म्हणतात सामान्यपणे दिवसाची लांबी, तापमान किंवा अन्नाची विपुलता यांच्यात होणारे बदल व अशी स्थिती (विकासावरोध) एकाच वेळी उद्‌भवतात. विकासावरोध जननिक (नैसर्गिक) रीतीने निश्चित होत असतो परंतु प्राणी स्थिर व अनुकूल पर्यावरणीय परिस्थितीत वाढविल्यास विकासावरोध टाळता येतो, हे प्रयोगांद्वारे दिसून आले आहे.

टोणपी, गो. स.