वॉटकिन्झ ग्लेन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्यातील एक पर्यटन स्थळ व थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या २,४४० (१९८०). ते फिंगर लेक्स प्रदेशात सेनिक सरोवराच्या दक्षिण काठावर सस.पासून सु. ३३३ मी. उंचीवर वसले आहे. एल्मिरच्या उत्तरेस सु. ३३ किमी.वरील या गावाच्या जागी इंग्रज वसाहतवाल्यांनी प्रथम १७९१ मध्ये वसाहत केली १८४२ मध्ये त्याचा जेफर्सन या नावाने संघीय राज्यात समावेश करण्यात आला आणि नंतर सॅम्युएल वॉटकिन्झ या आद्य प्रवर्तकाच्या सन्मानार्थ त्याचे वॉटकिन्झ असे नामकरण करण्यात आले (१८५२). १९२६ मध्ये त्याला ग्लेन (दरी) हा शब्द जोडण्यात आला. या खेड्याच्या मध्यभागी नैसिर्गिकरीत्या निर्माण झालेली एक अतिखोल व सव्वातीन किमी. लांब अशी विलक्षण दरी असून तेथे वॉटकिन्झ ग्लेन राज्य उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या घळीतून २१३ मी. खोल सरोवराची खाडी गेलेली असल्यामुळे छोटी डबकी, द्रुतवाह आणि प्रपातमालांची निर्मिती झाली आहे. येथे मीठ तयार करणे, मद्यनिर्मिती इ. व्यवसाय चालतात. यांशिवाय याच्या परिसरात फळबागांचे, विशेषतः द्राक्षांचे, उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सभोवतालच्या प्रदेशाची ही बाजारपेठ आहे. पूर्वी येथे वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोटारशर्यत (ग्रां प्री) भरत असे परंतु १९८१ नंतर ती दुसरीकडे हलविण्यात आली. येथील नैसर्गिक खडकांची अपूर्व रचना, प्रपातमाला, उद्यान नैसर्गिक घळी तसेच खनिजजल, ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे होत.

देशपांडे, सु. र.