वाँगनूई : न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरील शहर व बंदर. लोकसंख्या ३८,४०० (१९८८ अंदाज). हे वेलिंग्टनच्या उत्तरेस १५२ कि.मी. वाँगनूई नदीमुखाजवळ वसलेले असून वेलिंग्टनशी ते लोहमार्ग व रस्ते यांनी जोडलेले आहे. प्रथम १८४१ च्या सुमारास या ठिकाणी वसाहत उभारण्यात येऊन तिला प्रारंभी ‘पेत्रे’ असे नाव देण्यात आले होते. सांप्रतचे ‘वाँगनूई’ हे नाव १८४४ पासून रूढ झाले. माओरी भाषेतील या शब्दाचे ‘महामुख’ (बिग माउथ), ‘महाउपसागर’ (बिग बे) किंवा ‘महास्वर्ग’ (बिग हेव्हन) असे अर्थ होतात. प्रारंभीचे ब्रिटिश वसाहतकार व स्थानिक माओरी लोक ह्यांच्यात अनेक संघर्ष उद्‌भवले विशेषतः १८४७, १८६४ व १८६८ या वर्षी युद्धे झाली. १८७० पर्यंत माओरींकडून या शहरावर अनेकदा हल्ले झाले होते. वाँगनूईला १८६२ मध्ये खेड्याचा, १८७२ मध्ये नगरपालिकीय गावाचा व १९२४ मध्ये शहराचा दर्जा मिळाला.

शहराच्या आसमंतातील मेंढपाळी, पशुपालन आदी व्यवसायांमुळे वाँगनूई हे न्यूझीलंडमधील एक महत्त्वाचे दूध उत्पादन व वितरण केंद्र बनले आहे. याव्यतिरिक्त शहरात मांस डबाबंदीकरण, अन्नप्रक्रिया, फर्निचर, लोकर व लोकरीचे कपडे, पादत्राणे, साबण इत्यादींच्या निर्मितीचे उद्योग असून छपाई व सर्वसाधारण अभियांत्रिकी कारखाने विकसित झाले आहेत. वाँगनूई शहराच्या कॅसलक्लिफ या नदीमुखावरील बंदरामधून लोकर, अन्न, मांस, दूधपदार्थ यांची निर्यात, तर सिमेंट, कोळसा, खते इत्यादींची आयात केली जाते.

शहरात महाविद्यालय-शाखा, वाँगनूई कॉलेजिएट स्कूल (देशातील मोठ्या खाजगी निवासी शाळांपैकी एक) इ. शैक्षणिक सुविधा असून संगीतिका गृह, युद्धस्मृतिभवन (वॉर मिमॉरिअल हॉल), सार्जंट आर्ट गॅलरी ही कलावीथी, वाँगनूई विभागीय संग्रहालय, अलेक्झांडर ग्रंथालय व संग्रहालय इ. लक्षणीय वास्तू आहेत.

दळवी, र. कों.