वाल्मीकि जमात : भारतातील एक अनुसूचित जमात. वाल्मीकींची वस्ती प्रामुख्याने आंध्र प्रदेश, ओरिसा व कर्नाटक या राज्यांतून आहे. आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम्, विशाखापटनम्, व पूर्व गोदावरी या जिल्ह्यांमध्ये त्यांची वस्ती अधिक आहे. त्यांची एकूण लोकसंख्या ४२,९४४ (१९८१) होती. बेरड जंगम या अनुसूचित जमातीमध्येही या जमातीचा समावेश होतो. जनगणनेच्या १९८१ च्या अहवालात त्यांची नोंद अनुसूचित जातीमध्ये (अस्पृश्य) करण्यात आलेली आहे. सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन मानवशास्त्रज्ञ तसेच भारतीय आदिवासी जमातींचा अभ्यासक ⇨क्रिस्टोफ फोन फ्यूरर – हायमेनडॉर्फ (१९०९-) याने पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये वाल्मीकी हे कोंड मल म्हणून ओळखले जातात, असा उल्लेख केला आहे. आंध्र प्रदेश, ओरिसा येथील वाल्मीकी भ्रष्ट उडिया बोली बोलतात. कर्नाटकातील जमातीवर कन्नड भाषेचा प्रभाव दिसून येतो.
ग्रामीण भागात राहणारे वाल्मीकी हे पाडू पद्धतीने शेती करतात. काही शेतमजुरी करतात. त्यांची अर्थव्यवस्था उच्च वर्णियांना पूरक अशा प्रकारची आहे. बऱ्याच वेळा रेड्डींना ते शेतकामासाठी मजूर म्हणून ठेवतात.
डोंगराळ प्रदेशात राहणारे वाल्मीकी हे मात्र फिरस्ते व्यापारी व सावकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यापाशी मालवाहतुकीसाठी बैल असतात, त्यांच्या मदतीने डोंगराळ भागात ते व्यापार करीत हिंडतात. रेड्डींना आपला माल विकण्यासाठी अनेक वेळा या वाल्मीकींवरच अवलंबून रहावे लागते. ख्रिश्चन मिशनऱ्यांचा प्रभाव आणि नागरी जीवनाशी वाल्मीकींचा सतत येणारा संपर्क यामुळे त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार होत आहे. परिणामतः शिक्षक-कारकून या पदांवरही काही वाल्मीकी काम करू लागले आहेत. शासकीय सेवांमध्ये त्यांची आता मोठ्या प्रमाणावर भरती झालेली दिसते. राजकारणातही ते सहभागी झालेले दिसतात. आंध्र प्रदेश राज्याच्या विधिमंडळावर राखीव मतदारसंघांतून त्यांचे काही प्रतिनिधी निवडून येतात. तथापि या जमातीला अद्यापि सामाजिक प्रतिष्ठा लाभलेली नाही. रेड्डी त्यांच्याकडे अजूनही अस्पृश्य म्हणूनच पाहतात.
गोदावरी जिल्ह्यात अद्यापि रेड्डींसाठी वाल्मीकीच्या दोन परंपरागत सेवा चालू आहेतः एक, लग्नप्रसंगी रेड्डींच्या घरी बासरी, सनई यांसारखी सुषिर वाद्ये वाजविणे व दुसरे, मृत व्यक्तिच्या चितेला अग्नि देणे. या सेवांसाठी त्यांना २-३ रुपये एवढा अल्प मोबदला मिळतो.
वाल्मीकी हे तेलुगू संस्कृतीचे पूर्वज समजले जातात. कुटुंबियांच्या संमतीने, मुलीला पळवून नेऊन अथवा पळून जाऊन अशा तीन प्रकारांनी त्यांच्यामध्ये लग्न होते. गंगादेबुदू, संकुदेबुदू, पेद्दादेबुदू या त्यांच्या काही प्रमुख देवता. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रसारामुळे अनेक वाल्मीकी ख्रिस्ती झाले आहेत.
वाल्मीकींची स्वतःचीच अशी पंचायत सभा असते. ती भांडणतंटे व सर्व झगडे आपापसांतच सोडविते परंतु रेड्डींच्या पंचायतीमध्ये एका वाल्मीकीची उपस्थिती आवश्यक असते. वाल्मीकींचे जीवन रेड्डींच्या जीवनप्रवाहाशी निगडित असल्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक जीवनात त्याचे पडसाद उमटलेले दिसून येतात. विद्यमान परिस्थितीमध्ये आजूबाजूच्या जीवनप्रवाहांत वाल्मीकी एकरूप होत असल्याचे दिसून येते.
संदर्भ : 1. Furer Haimendorf, C. Von, Aboriginal Tribes of Hyderabad, Vol. 1, London, 1943.
2. Furer Haimendorf, C. Von, Tribes of India – The Struggle for Survival, Delhi, 1985.
3. Govt. of Andhra Pradesh, Scheduled Tribes of Andhra Pradesh, Hyderabad, 1963.
मिस्त्री, शीला दि.