मेलानीशियन : मेलानिशियाच्या विशिष्ठ भूभागात आढळणारे एका वांशिक समूहातील लोक. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ इ. ए. हूटनच्या वंश वर्गीकरणानुसार मेलानीशियन हा निग्रॉईड ह्या प्राथमिक मूळच्या वंशापासून तयार झालेल्या संयुक्त वंशामधील एक समूह वा गट असून तो दुय्यम प्रकारचा उपवंश आहे. ह्या वंश प्रकारातील बहुसंख्य लोक मेलानिशिया व त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात जास्त प्रमाणात असल्यामुळे ह्यास मेलानिशियन वंश असे म्हणतात. साधारणतः न्यूगिनी, द बिस्मार्क द्वीपसमूह, लुईझिॲद, सॉलोमन, सांताक्रूझ, व्हॉनूआटू तसेच लॉयल्टी बेटे, न्यू कॅलेडोनिया, फिजी व त्या आसपासच्या लहान बेटांवरील लोक-गटांमध्ये या वंशप्रकाराचे अंश आढळतात. स्थूल मानाने नेग्रिटो, ऑस्ट्रलॉईड, बहिर्वक्र नाकाचे मेडिटरेनियन, पॉलिनीशियन व मालायन इ. वंशाचे हे मिश्रण आहे. त्यातही ह्या मिश्रणातील काळी तुळतुळीत कातडी आणि लोकरीसारखे केस या नेग्रिटो लक्षणांची उपस्थिती जास्त प्रमाणात दिसून येत असल्यामुळे, त्यांना सुरुवातीस नेग्रिटो वंश गटांत घालण्यात आले परंतु नंतरच्या संशोधनाने या मतात बदल झाला. यांशिवाय ऑस्ट्रेलॉईडशी ह्या उपवंशाचे अधिक घनिष्ठ  संबंध दाखविले जातात. आधुनिक संशोधनानुसार मात्र मेलानिशियनांचा निग्रॉईडशी दुरत्वाने संबंध दाखविला जातो. तर ऑस्ट्रेलॉईडशी अधिक जवळचा संबंध दाखविला जातो. अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्याबाबत तज्ञांमध्ये दुमत असले, तरी मेलानिशियन हा संकरित किंवा मिश्र वंश प्रकार असण्याबाबत मात्र तज्ञांत एकमत आहे.

ह्या वंशप्रकाराच्या उत्पत्ती च्या संदर्भात दोन प्रकारची कारणमीमांसा हू टनने दिलेली आहे. त्यापैकी एक उत्क्रांतिद्वारे वंशप्रकाराचे आगमन ह्यावर आधारलेली असून दुसरी ‘संकरित प्रकारांवर’ आधारलेली आहे. ह्यापैकी संकरित प्रकार आधारे ह्या वंशाचे अस्तित्व असले पाहिजे, यामताला त्याने प्राधान्य दिले.

याबाबत दुसराही असा एक प्रवाद आहे, की मेलानिशियन लोकांचे उत्पत्तिस्थान आशियाच्या दक्षिणेकडील देशांमध्ये कोठेतरी असले पाहिजे. त्या ठिकाणी सुद्धा प्राचीन काळी हा संकरित प्रकार निर्माण झाला असावा. तसेच अनेक परस्परविरोधी अशीही मते असल्याने मेलानिशियनां च्या संकरित उत्पत्तिबद्दल निश्चितपणे कोणतेही अनुमान करणे कठीण आहे. या भौगोलिक प्रदेशातील लोकांची शारीरिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे देण्यात येतात : लोकरीसारखे केस, रुंद नकटे नाक, रुंद मस्तक आणि राकट शरीरयष्टी व काळसर वर्ण.

संदर्भ : 1. Comas, Juan, Manuel of Physical Anthropolgy, Oxford, 1961.

            2. Hooten, E. A. Up From the Ape, London, 1946.

            3. Steinbauer, Friedrich, Melamesian Cargo Cults, Brisbane, 1979.

कुलकर्णी, वि. श्री.