वारूळ : वाळवी व मुंगी यांच्या घरट्यास वारूळ म्हणतात. वाळवी वा मुंग्या जमिनीत राहतात व जमिनीखाली बिळे व भोके पाडून त्यांची एक गुंतागुंतीची मालिका तयार करून वारूळ बनवितात. जमिनीवर वारुळाच्या मातीचा ढिगारा नेहमी आढळतोच असे नाही. वाळवीच्या आदिम (आद्य) जाती लाकूड खातात व ते कुरतडून त्यात सज्जे तयार करतात. उच्च जातीच्या वाळवीच्या वारुळाचा जमिनीवरील मातीचा ढिगारा खूप मोठा असतो. त्याची उंची ६ मी. पेक्षा जास्त असते व तळाचा व्यास ३-४ मी. असतो. तो खूप बळकट व टिकाऊ असतो. तो तयार करण्यासाठी मातीचे कण, चिखल, लाळ व विष्ठा यांचा वापर केलेला असतो. वाळल्यावर तो सिमेटच्या कामासारखा कठीण व भक्कम होतो.
वारुळाच्या आतील भागात कोठ्या, रस्ते यांचे अनियमित जाळे असते. रागीची कोठी तळाला असलेल्या कोठ्यांमध्ये असते. जमिनीखाली असंख्य वाटांची मालिका व गवत साठविण्याची जागा ह्या एका वसाहतीच्या वारुळात असतात. मॅस्ट्रोटर्मिस डार्षिनिएन्सिस ही वाळवीची सर्वांत आद्य जाती मूलतः लाकूडभक्षक व जमिनीखाली राहणारी असून ती जमिनीवर वाटा बांधते, ही अत्यंत कुतूहलजनक बाब आहे. कॅलोटर्मिटिडी कुलातील बहुतेक जाती लाकडात राहणाऱ्या व लाकूड खाणाऱ्या असतात, तर ऱ्हिनोटर्मिटिडी कुलातील जाती मूलतः जमिनीखाली राहतात. जमिनीत भोक पाडतात, त्यांची घरटी पुरल्या गेलेल्या लाकडात असतात व कधीकधी जमिनीवरही असतात. टर्मिटिडी कुलातील जाती जमिनीखाली राहतात पण बऱ्याच जाती वारुळे बांधतात किंवा झाडांवरही घरटी बांधतात. मॅक्रोटर्मिटिनी उपकुलातील जाती (उदा., ओडोंटोटर्मिस) कवकांचे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचे) पोळे तयार करतात.
सामान्यतः मानवाला व इतर प्राण्यांना वारुळे नष्ट करणे अवघड असते. वारुळांतील अन्नाच्या साठ्यांच्या गोळ्यांचा उपयोग दुखऱ्या भागावर गरम लेप देऊन शेकण्यासाठी करतात.
पहा : घरटे मुंगी वाळवी.
जमदाडे, ज. वि.
“