वाराणसी : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र, भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक व त्याच नावाच्या जिल्ह्याचे आणि विभागाचे मुख्यालय. लोकसंख्या ७,०८,६४७ (१९८१). प्राचीन बौद्ध, जैन व हिंदू साहित्यात त्याची काशी वाराणसी, बनारस, अविमुक्त, आनंदवन, महाश्मशान, व्याप्ती अशी नामांतरे आढळतात. शिवाय काशेयपूर, अमरावती, केतुमती, पुष्पवती, रंगनगर, तीर्थराजी इ. नावांचाही उल्लेख आढळतो. बनारस हे नाव अनेक वर्षे वापरात होते, परंतु २४ मे १९५६ पासून शासनाने वाराणसी या नावाचा अधिकृतपणे वापर सुरू केला. गंगा नदीच्या अर्धचंद्राकृती पात्राच्या उत्तरेस डाव्या काठावर ते अलाहाबादच्या पूर्वेस सु. १३० किमी. वर वसले आहे. ईशान्य व नैर्ऋत्य सरहद्दींवरील वारणा (वारणावती किंवा वरुणा) व असी या दोन नद्यांनी वेढल्यामुळे वाराणसी या नावाने प्रख्यात झालेल्या या नगरी सभोवतालचा प्रदेश ‘काशी’ या नावाने प्रसिद्ध होता. पुराणकाळात तिचे काशी हेच नाव रूढ झाले. काशी या नावाची व्यु त्पुत्ती काश् प्रकाशणे या धातूवरून किंवा काश्यजन यांवरून आली असावी. मध्ययुगातील ताम्रपटांतून ही दोन्ही नावे प्रचारात असल्याचे दिसते. मुसलमानी अंमलात (बारावे व सतरावे शतक) वाराणसीचे बनारस हे फासीं अपभ्रष्ट रूप प्रचारात आले. काही तज्ञांच्या मते हे वारणेचे प्राकृत रूप असावे.

रामायण, महाभारत, स्कंद, लिंग, मत्स्य, पद्म, ग्नि इ. पुराणे, बौद्ध जातके, बृहत्संहिता, मआसिर-आलम-इ-गीरी इ. ग्रंथांत, फाहियान, ह्यूएनत्संग, इत्सिंग इ. चिनी प्रवाशांचे तसेच पाश्चात्त्य प्रवाशांचे वृत्तांत इत्यादींतून वारासणीविषयी माहिती मिळते. बौद्धपूर्वकाळात गंगा-यमुना दुआबातील पाच जनपदांपैकी काशी (वाराणसी) एक असून बौद्ध अंगुत्तर निकायमते तत्कालीन भारतातील सोळा ⇨ महाजनपदांमध्ये व सात प्रमुख देशांमध्ये तिची गणना होत होती. उज्ज्वल प्राचीन इतिहासाबरोबरच वाराणसीविषयी अनेक पौराणिक कथा व आख्यायिका आहेत. येथील राजांची कोसल, मगध व अंग देशांचे राजे ह्यांच्याबरोबर वारंवार युद्धे होत. अखेर कोसलच्या कंस राजाने वाराणसी जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केली. महाभारतानुसार काशीराज दिवोदास हा या नगरीचा संस्थापक असून त्याने इंद्राच्या आज्ञेवरून गंगेकाठी हे नगर वसविले. हरिवंशात ही कथा थोडी वेगळी आहे. तीत काशकुलोत्पन्न धन्वंतरी दिवोदास पणतूने  भद्रश्रेण्य राजास ठार मारून तेथे नवीन वसाहत स्थापिली. काही अभ्यासकांच्या मते वाराणसीच्या आर्य वसाहतीकरणाचा आणि शिवोपासना स्वीकृतीचा रूपकात्मक निर्देश आख्यायिकांत मिळतो. आधुनिक अभ्यासक वाराणसीची स्थापना शिवपूजक अनार्यांनी केली असे मानतात. महाभारतकाळात हा प्रदेश जरासंधाच्या अंमलाखाली होता. भारतीय युद्धानंतर कुरू राजाने तो वत्स राज्यात समाविष्ट केला. बौद्धकालात हा प्रदेश मगध, कोसल, वत्स आणि उज्जयिनी या प्रमुख राज्यांपैकी एकामध्ये आलटूनपालटून समाविष्ट असे. पुढे शिशुनाग, मौर्य, शुंग आणि कण्व वंशांच्या सत्ताकाळात हा प्रदेश त्यांच्या-त्यांच्या साम्राज्यात होता. गौतम बुद्धाच्या धर्मचक्रप्रवर्तनामुळे या नगरीच्या उत्तरेकडील सारनाथाला माहात्म लाभले. शुंगांच्या कारकीर्दीत संस्कृत भाषा आणि यज्ञादी कर्मकांडांना महत्त्व प्राप्त होऊन वाराणसी हे त्यांचे प्रमुख केंद्र बनले. पुष्यमित्र शुंगाने बौद्ध मठांचा विध्वंस करून काशीचे माहात्म्य वाढविले. पुढे क्षत्रपांनी येथे राज्य केले. त्यानंतर कुशाण घराण्यातील कनिष्क या प्रदेशाचा अधिपती झाला. त्याने बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार केला. नाग वंशातील राजांनी बौद्ध धर्माचे वर्चस्व कमी करून दशाश्वमेध घाटावर अनेक यज्ञ केले. भारशिव नाग राजांनंतर वाराणसीचा गुप्त साम्राज्यात (इ. स. ३२१-५५५) समावेश झाला. स्कंदगुप्ताने हूणांचा पराजय करून या नगरीचे पावित्र्य अबाधित ठेवले. वाराणसीजवळील एका शिलालेखात त्याचा उल्लेख आढळतो. गुप्तांनंतर कनौजच्या हर्षवर्धनाने (कार. ६०६-४६) वाराणसीवर आधिपत्य मिळविले. हर्षोत्तरकाळात शंकराचार्य आणि कुमारिल भट्ट ह्यांनी येथे धर्मविजय केले. शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांमधील प्रसिद्ध वादही याच ठिराणी झाला. अकराव्या शतकात कनौजच्या गाहडवालवंशीय राजांनी वाराणसी येथे उपराजधानी स्थापन केली. या वंशातील जयचंद राजाचा मुहम्मद घोरीने पराजय करून येथील मंदिरांची प्रचंड लूट केली. मुहम्मदाच्या जागी दिल्लीच्या तख्तावर आलेला कुत्बुद्दीन ऐबक (कार. १२०६-१०) आणि त्यानंतरचा अलाउद्दीन खल्जी यांनी येथील सु. १,००० मंदिरे नष्ट केली. पुढे जौनपुरच्या शर्की वंशाने १३९४ ते १४७७ पर्यंत यावर राज्य केले. पुढे मोगल बादशाह बाबराने हे जिंकून घेतले. तेव्हापासून शाहआलमच्या कारकीर्दीपर्यंत ते मोगल बादशाहांच्या आधिपत्याखाली राहिले. हुमायूनच्या (कार. १५३०-४० व १५५५-५६) वेळी कबीराने हिंदू आणि इस्लाम धर्मांच्या समन्वयवादाचे प्रतिपादन येथेच केले. अकबर बादशाहाच्या काळात (कार. १५५८-१६०५) गोस्वामी तुलसीदासाने रामचरितमानस हा सुविख्यात ग्रंथ येथेच लिहिला. उद्‍ध्वस्त विश्वेश्वर मंदिर अकबराच्या कारकीर्दीत १५८५ मध्ये नव्याने बांधण्यात अले, औरंगजेबाने (कार. १६५८-१७०७) ते जमीनदोस्त करून (१६६९) त्या जागी मशीद बांधली आणि हिंदूवर जझिया कर लादला. तेव्हा भक्तांनी तेथील शिवलिंग नजीकच्या ज्ञानवापीमध्ये हलविले. त्याकाळी मंदिराच्या जागेला विश्वेश्वर प्रतिमा मानून भक्तजन त्यास नमस्कार, पिंडदान व प्रदक्षिणा करीत असत. औरंगजेबाने वाराणसीचे नाव मुहंमदाबाद असे ठेवले होते.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य मोडकळीस आले. त्याचा फायदा घेऊन गंगापूरचा जमीनदार मनसारामने अयोध्येचा सुभेदार सादतखान याच्याकडून बनारस-जौनपूर-चरणाद्रीची (चुनार) जमीनदारी मिळविली आणि आधुनिक ⇨ काशी संस्थान स्थापन केले (१७३८). तेथील राजांनी काशीराज ही उपाधी धारण केली. मनसारामचा मुलगा बलवंतसिंग याने किल्ले बांधून राज्यविस्तार केला आणि राजधानी गंगापूरहून वाराणसीजवळील रामनगरला आणली (१७५०). बलवंतसिंगाच्या मृत्यूनंतर (१७७०) त्याचा अनौरस मुलगा  ⇨ चेतसिंग गादीवर आला. मराठे व अयोध्येचा नबाब आणि इंग्रज व अयोध्येचा नबाब यांत अनुक्रमे १७७३ व १७७५ मध्ये दोन तह झाले, ते ‘बनारस तह’ या नावाने प्रसिद्ध आहेत. पहिल्या तहानुसार शाहआलमने (कार. १७५८-१८०६) मराठ्यांना त्यांच्या सहकार्याबद्दल कोरा व अलाहाबाद दिले. दुसऱ्या तहानुसार वॉरन हेस्टिंग्जने शुजाउद्दौल्याला काही अटींवर कोरा व अलाहाबाद परत मिळवून दिले. शाहआलमने बक्सारच्या लढाईनंतर (१७६४) बिहार-बंगाल-ओरिसा या प्रांतांचे दिवाणी अधिकार इंग्रजांना बहाल केले (१७७५). त्यामुळे वाराणसी त्यांच्या अखत्यारीत आली. बलवंतसिंगाचा नातू महीपनारायणसिंग याला इंग्रजांनी काशीच्या गादीवर बसविले आणि राजप्रतिनिधीही (रेझिडेंट) नेमला तथापि धार्मिक व सांस्कृतिक समारंभांत राजाचे महत्त्व होते. ईश्वरीप्रसाद नारायणसिंग व पुढे त्रिभूतिनारायणसिंह या राजांनी संगीतनृत्यकलादींना उत्तेजन देऊन सभासंमेलने भरविली. या काळात मराठे सरदारांनी वाराणसी येथे अनेक मंदिर, धर्मशाळा, घाट, वाडे बांधले. त्यांपैकी विश्वनाथाचे मंदिर अहिल्यादेवी होळकर ह्यांनी १७८३ मध्ये बांधले. याशिवाय तेथे अन्नपूर्णा, साक्षी विनायक, कालभैरव ही प्रसिद्ध मंदिरे बांधण्यात आली. ब्रिटिशांनी दशाश्वमेधलक्ष हा नदीच्या पश्चिम तीरावरील मोठा रस्ता तयार केला आणि अनेक सुधारणा घडवून आणल्या. ब्रिटिशांनी १९१० मध्ये काशी हे नवीन संस्थान निर्माण केले आणि रामनगर ही त्याची राजधानी  झाली परंतु खुद्द वाराणसी शहरावर त्यांचे आधिपत्य नव्हते. स्वातंत्र्योत्तर काळात १९४९ मध्ये वाराणसी उत्तर प्रदेश राज्यात विलीन करण्यात आले. तत्कालीन राजे विभूतिनारायणसिंह यांनी ‘ काशीराज न्यास ‘ स्थापून त्याचा निधी पुराणांच्या संशोधित आवृत्त्या प्रकाशित करण्यासाठी उपलब्ध करून दिला .


 शहरात अनेक हिंदू मंदिरे तसेच मशिदीही आहेत. ह्यूएनत्संग शंभर मंदिरांचा उल्लेख करतो तर जेम्स प्रिन्सेप (१७९९-१८४०) या विख्यात ब्रिटिश संशोधक व पुरातत्त्वज्ञ यांच्या पाहणीत एक हजार मंदिरे व ३३३ मशिदी आढळल्या. एम्. ए. शेरिंगच्या मते येथे १,४५४ मंदिरे आणि २७२ मशिदी होत्या तथापि शहरात सद्यस्थितीत एकही प्राचीन मंदिर अवशिष्ट नाही. येथील प्राचीन अवशेषांचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध असून आपल्या भारताच्या राष्ट्रचिन्हावरील असलेले अशोककालीन स्तंभशीर्ष तेथे सुस्थितीत आहे. सारनाथ येथे महाबोधी सोसायटीने तसेच चिनी, तिबेटी व ब्रह्मी लोकांनी बांधलेले स्तूप व बौद्ध विहार असून त्यांची देखरेख ते ते देश पाहतात. सारनाथ व बनसार येथे प्रिन्सेपच्या वेळी तसेच त्यानंतरही १९४० व १९५७ साली उत्खनने झाली. त्यांत मुद्रालेख, मौर्यकालीन मृत्पात्रे, नाणी, मृण्मूर्ती इ. अवशेष मिळाले. सर्व हिंदू मंदिरांत विश्वनाथ, तुलसी मानस, त्रिलोचन, अन्नपूर्णा, साक्षी विनायक, दुर्गा, कालभैरव ही प्रमुख व प्रसिद्ध मंदिरे असून स्थानिक आख्यायिकेनुसार विश्वेश्वर वा विश्वनाथ हा या क्षेत्राचा अधिष्ठाता देव, भैरव हा कोतवाल, तर धुंडिराज गणेश (साक्षी विनायक) हा नगरपालक आहे. विश्वेश्वर मंदिरानजीकच अन्नपूर्णा या अधिष्ठात्री देवतेचे मंदिर आहे. बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या परिक्षेत्रातील तुलसी मानस आणि विश्वनाथ ही मंदिरेही सुबक व आकर्षक आहेत. विश्वेश्वर हा भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून त्याचे मंदिर मुसलमानी अंमलात अनेक वेळा पाडण्यात आले, पण त्याची पुनर्बांधणीही झाली. अहिल्या देवी होळकरांनी औरंगजेबकालीन मशीद न पाडता ज्ञानवापीतून शिवलिंग काढून विद्यमान पंचमंडपयुक्त विश्वनाथाचे मंदिर बांधले (१७८३). पुढे १८३९ मध्ये महाराजा रणजितसिंगाने या मंदिराचे शिखर सोन्याने मढवून दिले. हे शिखर रेखीव असून त्यावर कलात्मक नक्षी आहे परंतु मंदिरद्वयांना जोडणाऱ्या उघड्या स्तंभयुक्त बाह्यमंडपाचे इस्लामी घुमटाकृती शिखर मुख्य मंदिर शिखराशी विसंगत वाटते. या मंदिराच्या कुशीत औरंगजेबकालीन मशिदीचे मीनार आहेत. मंदिराजवळच दक्षिणेस ज्ञानवापी-ज्ञानरूपी-शिवास स्नान घालणारी अशा अर्थाने प्रसिद्ध असलेली व विश्वेश्वराने नित्य स्नानार्थ स्वतः त्रिशूळाने खोदलेली, अशी समजूत असलेली, प्रसिद्ध विहीर आहे. या मंदिराच्या उत्तरेकडे सु. पाऊण किमी. वर बिसेसर गंज अंतर्भागात कालभैरवाचे मंदिर आहे. तो क्षेत्रपाल (कोतवाल) मानला जातो. त्याला दंडपाणी, भैरवनाथ, काळराज, आमर्दक, पापभक्षणक वगैरे अन्य नावे आहेत. विश्वनाथपूजेने सुरू होणारी यात्रा कालभैरवाच्या पूजनाने संपते, अशी भाविकांत धारणा आहे. यांशिवाय ॐकार, त्रिलोचन, चंद्रशेखर, केदार इ. चौदा महालिंगे आहेत.

विश्वेश्वराच्या दर्शनानंतर यात्रेकरू येथील लोलकतीर्थ, केशव मंदिर व आदिकेशव घाट, पंचगंगा घाट-बिंदुमाधव मंदिर, दशाश्वमेध घाट व मणिकर्णिका तीर्थ आणि घाट या प्रमुख पंचतीर्थांचे दर्शन घेतात. त्याला ‘पंचक्रोशी यात्रा’ किंवा ‘परिक्रमा’ म्हणतात. मणिकर्णिका घाटासभोवतालच्या सु. ६५ किमी. त्रिज्येच्या अर्धवर्तुळातील ही सर्व क्षेत्रे असून परिक्रमेचा प्रारंभ या घाटापासूनच होतो. वाराणसीमध्ये गंगेच्या काठावर सु. सात किमी. लांबीचे दगडी पायऱ्यांचे विशाल घाट बांधलेले आहेत. विभिन्न काळांत भारतातील राजेमहाराजांनी तसेच धनिकांनी हे घाट बांधले असून आदिकेशव, कपालमोचन, वेदेश्वर इ. घाट बाराव्या शतकातील आहेत. गाहडवाल राजा गोविंदचंद्र याने कपालमोचन घाट ११२२ मध्ये बांधल्याचा शिलालेखात उल्लेख मिळतो. काही घाट राजस्थानी स्थापत्यशैलीत-अंबर राजवाड्याप्रमाणे-सोपान पद्धतीने बांधलेले आहेत. येथे उल्लेखनीय असे ५१ घाट असून एकावन्नावा घाट पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या नावे बांधला आहे. केदार, हनुमान, दुर्गा, नारद, जानकी, तुलसी, पंचगंगा, ब्रह्मा, भोसला, राजराजेश्वरी, ललिता, राम, लक्ष्मण, शीतला इ. घाट प्रसिद्ध आहेत.

वाराणसी हे प्राच्यविद्यांचे महापीठ असून विद्याकेंद्र म्हणून त्याची परंपरा शतकानुशतके अबाधित आहे. येथे गौतम बुद्ध, महावीर, कुमारिल भट्ट, शंकराचार्य इ. अनेक विद्वानांनी अध्ययन वादविवाद केले. बौद्ध साहित्यात येथील अनेक प्राचीन पाठशाळांचे उल्लेख आढळतात परंतु काशी विद्यापीठास नालंदा वा तक्षशिला यांच्याप्रमाणे प्रतिष्ठा लाभली नाही, तरीसुद्धा तक्षशिलेचेही काही विद्यार्थी येथे विद्यार्जनार्थ येत असत. ह्यूएनत्संगाच्या मते येथील बौद्ध विहार, हिंदू मंदिरे व आश्रम यांत श्रेष्ठ पंडित आणि ऋषिमुनी देशोदेशींच्या जिज्ञासू विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असत. जातककथांनुसार बुद्धाने येथे विभिन्न गायन-शाखांचे अध्ययन केले होते. विद्यादानाची परंपरा असलेल्या या नगरीत आजही विद्यार्थ्यांना संथा देणाऱ्या अनेक छोट्या पाठशाळा आहेत. ॲनी बेझंट यांच्या प्रयत्‍नांनी १८९८ मध्ये येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना झाली. त्यानंतर मदनमोहन मालवीय यांनी पुढाकार घेऊन बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली (१९१६). आधुनिक पद्धतीने प्राचीन धार्मिक ग्रंथांचा अभ्यास व्हावा, ही मालवीयजींची त्यामागील प्रेरणा होती. आधुनिक ज्ञान-विज्ञानाचे अध्यापनही या विद्यापीठात केले जाते. काशी विद्यापीठ (१९२१) आणि संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय (१९७४) ही आणखी दोन विद्यापीठे येथे असून त्यांपैकी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय हे नाव वाराणसेय संस्कृत विश्वविद्यालयाला १९७४ मध्ये देण्यात आले. संगीत, नृत्य व कला यांचे हे देशातील एक प्रमुख केंद्र असून संगीतातील बनारस घराणे आणि कथ्थक नृत्यप्रकार भारतभर प्रसिद्ध आहेत. भारत कला भवन संग्रहालय, पुराणवस्तू संग्रहालय (सारनाथ), संस्कृत विद्यापीठ ग्रंथालय इ. येथील संस्था प्रसिद्ध आहेत. येथे संग्रहालयशास्त्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी एक संस्था आहे. वारणसीत लष्कराची छावणीही आहे.


 उत्तर पेशवाईत, विशेषतः अव्वल इंग्रजी अंमलात, येथे एक विशिष्ट चित्रशैली विकसित झाली, ती ‘काशी चित्रशैली’ या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या शैलीतील चित्रे प्रामुख्याने जुने वाडे, मंदिरे यांच्या भिंतींवर काढलेली असून भित्तिचित्रांची फार जुनी परंपरा आहे. या चित्रशैलीत विभिन्न राजपूत चित्रशैलींचे मिश्रण आढळते. स्थानिक लोककलेतून या शैलीने प्रेरणा घेतली असून ही शैली पूर्णतः वर्णनात्मक आहे, तथापि तिच्यात दार्शनिक, आध्यात्मिक व आदर्शवादी प्रवृत्तींना स्थान असून सामाजिक जीवनासंबंधीचे विषयही चितारलेले आहेत. उत्सव, समारंभ, लग्नविधी, वरात इत्यादी चित्रणांत जिवंतपणा असून महेंद्रनाथसिंह, कलमसिंह, चतुर्वेदी वगैरे आधुनिक कलाकारांनी वरात, प्रतीक्षा, गंगापूजन, वटसावित्री अशा काही कलाकृतींतून या भित्तिचित्रांचे अनुकरण केले आहे. मंदिरांतील भित्तिचित्रांत, विशेषतः रत्‍नेश्वर मंदिरात, शिव आणि त्याच्या पौराणिक कथा यांचेही दर्शन आढळते.

वाराणसीला १८६७ मध्ये नगरपालिकेची स्थापना करण्यात आली व १९६० मध्ये महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. शहराची मूळ वस्ती गंगेच्या काठाने नागमोडी रचनेत वसली असून जुन्या भागात गल्ल्या व बोळ आणि अरुंद रस्ते आहेत तर नवीन वसाहतीत रुंद रस्ते असून सिमेंट काँक्रीटच्या आधुनिक वास्तू दिसतात. शहरात रेशीम कापड, जरीचे कापड, कशिदा केलेल्या साड्या, लाकडी खेळणी, काचेच्या बांगड्या, पितळी आणि हस्तिदंती वस्तू यांचे निर्मितिउद्योग चालतात. येथील भरजरी ‘बनारसी शालू’ जगप्रसिद्ध आहेत. पूर्वी येथील ‘काशि-विलेपन’ आणि ‘काशि-चंदन’ ही सुगंधी उटणी साऱ्या भारतात सुविख्यात होती. डीझेल रेल्वे एंजिने तयार करण्याचा कारखाना येथे आहे. वाराणसी हे दिल्ली-कलकत्ता, वाराणसी-कन्याकुमारी, गोरखपूर-वाराणसी या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांनी तसेच हवाई वाहतुकीने इतर शहरांशी जोडलेले असून लोहमार्गांवरील ते एक महत्त्वाचे प्रस्थानकही आहे. गंगा नदीतून जलवाहतूकही होते. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांचे सर्वाधिक लोकप्रिय तीर्थस्थान असलेले तसेच राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हजारो वर्षांचा अखंड इतिहास आणि परंपरा असलेले वाराणसीइतके पुरातन शहर भारतात अन्यत्र क्वचितच आढळेल.

पहा : उत्तर प्रदेश कथ्थक नृत्य तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा.

संदर्भ : 1. Alatekar. A. S. Benares and Sarnath : Past and Present Varanasi, 1947.

           2. Eck, Daine L. Banaras : City of Light, Melbourne, 1983.

           3. Havell, E. B. Benares, The Sacred City, London, 1905.

           4. Jha, Makhan, Ed. Social Anthropology of Pilgrimage, London, 1990.

           5. Narain, A. K. Lallanji, Gopal, Ed. Introducing Varanasi, Varsnasi, 1969.

           6. Sherring, M. A. Benares : The Sacred City of the Hindus in Ancient and Mordern Times, London. 1990.

          7. Sukul, Kuber Nath, Varanasi Down The Ages, Varanasi, 1947.

          8. Vidyarthi, L. P. Saraswati, B. N. Jha, Makhan, Ed. The Sacred Complex of Kashi, Delhi, 1979.

         ९. चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री, प्राचीन भारतीय स्थलकोश : काशी, प्रथम खंड, पुणे, १९६९,

       १०. विश्वकर्मा, ईश्वरशरण, काशी का ऐतिहासिक भूगोल, नवी दिल्ली १९८७.

देशपांडे, सु. र.