वाय्. डब्‍ल्यू. सी. ए. : एकख्रिस्ती संघटना. यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन हे ह्या संघटनेचे संपूर्ण नाव. ख्रिस्ती धर्मातील कोणत्याही विशिष्ट पंथाची ती नाही. पंथ, वंश, राष्ट्रीयत्व, वर्ग ह्यांच्या अतीत राहून युवतींचे शारीरिक, सामाजिक , बौद्धिक , नैतिक आणि आध्यात्मिक हित साधणे, हे ह्या संघटनेचे उद्दिष्ट आहे.  संघटनेच्या आध्यात्मिक, शैक्षणिक आणि मनोविनोदनात्मक बाजूंचे प्रतीक असणारा निळा त्रिकोण हे ह्या संघटनेचे बोधचिन्ह होय.  शरीर, मन आणि आत्मा ह्यांचेही ते प्रतीक आहे.

‘प्रेअर यून्यन’ (संस्थापिका एम्मा रॉबर्टस) आणि ‘द जनरल फीमेल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ’(संस्थापिका मेरी जेन किनेअर्ड) ह्या दोन स्वतंत्र गटांच्या स्वरूपात इंग्लंडमध्ये ही संघटना अस्तित्वात आली (१८५५). औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या  सामाजिक स्थितीत स्त्रियांच्या परिस्थितीचा विचार करून ती सुधारणे, हे ह्या दोन्ही गटांचे उद्दिष्ट होते. १८५८ पर्यंत ही चळवळ न्यूयॉर्क शहरापर्यंत पसरली. १८६६ मध्ये  ती बॉस्टन मध्ये आली. १८७७ साली उपर्युक्त  ‘प्रेअर यून्यन ’ आणि ‘द जनरल फीमेल.. ’ हे दोन गट ‘वाय्. डब्‍ल्यू. सी. ए.’ म्हणून एकत्र आले. १८८४ साली ह्या संघटनेने आपली घटना तयार केली. १९०० सालापर्यंत अमेरिकेत (यू.एस्.) शेकडो  वाय् . डब्‍ल्यू. सी. ए. निघाल्या. १९०६ मध्ये  तेथे वाय्. डब्‍ल्यू. सी. ए. ला एका राष्ट्रीय संघटनेचे स्वरूप देण्यात आले आणि ही राष्ट्रीय संघटना ‘यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ’ ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. तत्पूर्वी १८९४ मध्ये एक जागतिक संघटना म्हणून वाय्. एम्. सी. ए. ची स्थापना झाली होती. जिनीव्हा हे तिचे मुख्यालय ठरविण्यात आले होते. वाय् . डब्‍ल्यू. सी. ए. ह्या नावाने काम करणाऱ्या ठिकठिकाणच्या स्थानिक संघटना ह्या त्या त्या  देशातील राष्ट्रीय वाय्. डब्‍ल्यू. सी. ए. शी संलग्न असतात आणि राष्ट्रीय वाय्. डब्‍ल्यू. सी. ए. जागतिक संघटनेशी संलग्न असते.

वाय्. डब्‍ल्यू. सी. ए. ही संघटना विविध वयोगटांतील स्त्रियांना निरनिराळे उपक्रम उपलब्ध करून देते. क्रिडा, मनोविनोदन, शिक्षण, उन्हाळी शिबिरे भरविणे, निकोप सामाजिक संबंध विकसित करणे, उत्तम नागरिकत्वाची शिकवणूक देणे, संपूर्ण कुटुंबाचा विकास होऊन कौटुंबिक जीवनाचे धागे बळकट करणे ह्या दृष्टीने उपक्रम आयोजिले जातात. नोकरीच्या निमित्ताने ठिकठिकाणी जाणाऱ्या तरुण मुलींसाठी ह्या संघटनेने वसतिगृहांची सोय केली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर ह्या शहरांत वाय्. एम्. सी. ए. ची केंद्रे आहेत.   

                                                                          रायकर, प्रमोद