रॅकून : सस्तन प्राण्यांच्या मांसाहारी गणातल्या प्रोसिऑनिडी कुलातील प्रोसिऑनिनी या उपकुलातला प्राणी. हा प्रोसिऑन प्रजातीचा असून याच्या सात जाती आहेत. प्रोसिऑन लॉटर ही जाती दक्षिण कॅनडा, रॅकून (प्रोसिऑन लॉटर)अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा बहुतेक भाग आणि मध्य अमेरिकेत आढळते. प्रो. कँक्रिव्होरस ही जाती दक्षिण कोस्टा रीका, पनामा आणि दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग येथे आढळते आणि इतर पाच जाती कित्येक बेटांवर सापडतात. सामान्यतः पाण्याच्या जवळ असणाऱ्या झाडाझुडपांच्या क्षेत्रात ते वारंवार दिसतात.

डोक्यासकट शरीराची लांबी ४१·५−६० सेंमी. व शेपूट २०−४० सेंमी. लांब असते. खांद्याजवळ उंची २३−३० सेंमी. असते आणि वजन १०−२२ किग्रॅ. असते. रंग करड्यातून काळ्यापर्यंत कोणताही असतो. केसाळ शेपटीवर ५−१० काळी वलये असतात. चेहऱ्यावर दोन्ही डोळ्यांवरून जाणारा एक आडवा काळा पट्टा असतो. मुसकट टोकदार असते. कान लहान आणि उभे असतात. पाय लहान असतात. पुढच्या पायांचे माणसाच्या नाजूक, बारीक हातांशी साम्य दिसून येते व हे प्राणी त्यांचा जवळजवळ हातांसारखाच उपयोग करतात. बोटांवरील नख्या आत ओढून घेता येत नाहीत.

रॅकून रात्रिंचर आहेत दिवसा ते क्वचितच बाहेर पडतात. ते आसरा घेण्याकरिता झाडावर चढतात. ते उत्तम पोहणारेही आहेत. सामान्यतः ते झाडांच्या ढोलीत अथवा खडकावरील फवाऱ्यांत राहतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण भागातील रॅकून सर्व वर्षभर क्रियाशील असतात परंतु उत्तरेकडील भागातले रॅकून हिवाळ्यात शीतनिष्क्रियतेत (हिवाळ्यात काही प्राण्यांना येणाऱ्या अर्धवट वा पूर्ण गुंगीच्या स्थितीत) जातात.

रॅकून सर्वभक्षी आहेत. बेडूक, मासे, गोगलगाई, खेकडे, लहान स्थलचर प्राणी, फळे, बिया, धान्य, कलिंगडे इ. ते खातात. जवळपास पाणी मिळण्यासारखे असले, तर ते आपले भक्ष्य पाण्याने धुऊन खातात.

रॅकुनांत बहुपतिपत्नीत्व आढळते. प्रजोत्पादनाचा काल जानेवारी पासून जूनअखेरपर्यंत असतो. गर्भावधी ६०−७३ दिवसांचा असून एका वेतात बहुधा ३-४ पिल्ले होतात. पिल्ले सु. १० आठवड्यांची झाल्यावर आईबरोबर बाहेर हिंडू लागतात आणि एक वर्षाची झाल्यावर स्वतंत्रपणे भटकू लागतात.

रुचकर मांसाकरिता आणि केसाळ कातडीकरिता यांची मोठ्या प्रमाणावर शिकार करतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर वर्षी यांची जवळजवळ १० लक्ष कातडी खपतात.

जमदाडे, ज. वि.