वाय्. एम्. सी. ए. : यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन ह्या संघटनेचे वाय्. एम्. सी. ए. हे लघुरूप होय. १८४४ साली इंग्लंडमध्ये जॉर्ज विल्यम्स नावाच्या एका तरुणाने तिची स्थापना केली. तो स्वतः कापडधंद्यात कारकून म्हणून नोकरी करीत होता. कापडाच्या तसेच अन्य व्यवसायांतल्या तरुणांची आध्यात्मिक स्थिती सुधारणे, हे ह्या संघटनेचे उद्दिष्ट होते. आरंभी त्याच्याबरोबर फक्त बारा तरुण होते. अशाच प्रकारच्या अनेक संघटना ग्रेट ब्रिटनमध्ये नंतर निघाल्या. १८५० साली ऑस्ट्रेलियात, १८५१ साली उत्तर अमेरिकेत अशा संघटनांचे काम सुरू झाले. ठिकठिकाणच्या अशा संघटनांची एक परिषद १८५५ साली पॅरिसला भरली होती. बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड आणि अमेरिका (युनायटेड स्टेट्स) येथील संघटनांचे (वाय्. एम्. सी. ए.) प्रतिनिधी ह्या परिषदेला हजर होते. ह्या परिषदेत ‘वर्ल्ड अलायन्स ऑफ यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन्स ’ ह्या विशाल संघटनेची स्थापना झाली. तिचे मुख्यालय जिनीव्हा येथे आहे.
ठिकठिकाणच्या स्थानिक वाय्. एम्. सी. ए. ह्या त्या त्या देशांच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेशी संलग्न असतात आणि ह्या राष्ट्रीय संघटना ‘वर्ल्ड अलायन्स ऑफ यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन’ च्या सदस्य असतात.
वाय्. एम्. सी. ए. ही संघटना कोणत्याही विशिष्ट पंथाची नाही, तसेच ती राजकीयही नाही. सर्वसामान्य ख्रिस्तीजनांची ही चळवळ आहे. सामूहिक उपक्रमांतून नागरिकत्वाचे प्रशिक्षण देणे आणि उच्च प्रतीचे ख्रिस्ती व्यक्तिमत्त्व विकसित करणे, हे वाय्. एम्. सी. ए. चे ध्येय आहे.
वाय्. एम्. सी. ए. च्या कार्यक्रमात क्रिडा, शारीरिक शिक्षण, औपचारिक तसेच अनौपचारिक शिक्षण, निरनिराळ्या प्रकारची लोकसेवा, शिबिरे अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. वाय्. एम्. सी. ए. तर्फे वसतिगृहे , उपहारगृहेही चालविली जातात.
वाय्. एम्. सी. ए. ने अमेरिकेतील यादवी युद्धाच्या वेळेपासून सैन्यांना सेवा द्यावयास सुरुवात केली आणि ती परंपरा पुढील सर्व युद्धांच्या वेळी टिकविली. युद्धछावणीतील अनेक कैद्यांना शिक्षण, मनोरंजन ह्यांसारख्या सुविधा मिळवून देण्याची कामगिरी १९२९ च्या ‘जिनीव्हा कनव्हेन्शन’ने वाय्. एम्. सी. ए. वर सोपवली.
‘वर्ल्ड अलायन्स ऑफ यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन्स’ची शताब्दी १९५५ साली साजरी झाली. त्या निमित्ताने पॅरिसमध्ये झालेल्या परिषदांना जगातील ७६ देशांतील वाय्. एम्. सी. ए. च्या चाळीस लाख सदस्याचे प्रतिनिधित्व करणारे आठ हजार प्रतिनिधी उपस्थित होते. वाय्. एम्. सी. ए. आणि वाय् . डब्ल्यू. सी. ए. (यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन) ह्या संघटनांचे उद्देश जवळपास सारखेच असले, तरी त्या दोन स्वतंत्र संघटना आहेत.
महाराष्ट्रात वाय्. एम्. सी. ए. ची केंद्रे मुंबई, औरंगाबाद, कोडोली (जि.कोल्हापूर), नागपूर, पुणे, नासिक, मिरज, ह्या ठिकाणी आहेत.
रायकर, प्रमोद