वारंग: (रानभेंडी, भोती, पोतारीहिं. पुला गु. मोटी हिरवणी क. बेंडे, बेळ्ळक लॅ. किडिया कॅलिसीना कुल-माल्व्हेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा सु. १२ मी. उंच व ०.९-१.४ मी. घेर असलेला शोभिवंत पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र, विशेषतः मिश्र पानझडी जंगलात व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. याची साल करडी असून तिचे पातळ व लांबट खवल्यासारखे तुकडे सोलून निघतात. कोवळे भाग लवदार असतात. पाने साधी, एकाआड एक,. १०-१२ × ७-१० सेंमी., गोलसर, खंडयुक्त व हृदयाकृती असून त्यांची खालची बाजू लवदार असते व वरच्या बाजूस हस्ताकृती शिरा स्पष्ट दिसतात. फूलोरे शाखायुक्त[परिमंजरी ⟶ पुष्पबंध] आणि पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस येतात. फुले हिरवट पांढरी किंवा जांभळट असून ती सप्टेंबर ते नोव्हेंबरात येतात या वेळी हा वृक्ष शोभिवंत दिसतो. फुलाला ४-६ छदके, संवर्त घंटेसारखा व फळाबरोबर वाढणारा पाकळ्या पाच, केसरदले एकत्र जुळलेली व किंजपुटात तीन कप्पे असतात किंजले तीन व किंजल्क छत्राकृती असतो [⟶ फूल]. फळे (बोंडे) लहान, गोलसर, वाटाण्याएवढी व लवदार असून तडकल्यावर तीन शकले होतात. बिया गर्द पिंगट, मूत्रपिंडाकृती व रेषांकित असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ माल्व्हेसी कुलात (भेंडी कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड छाट कलमे लावून किंवा बियांपासून रोपटी बनवून करतात. मुळांपासून मुनवे निघून नवीन निर्मिती होते. वाढ जलद होते पंधरा वर्षांत वृक्ष सु. १२ मी. वाढतो . तथापि सापेक्षतः हा वृक्ष अल्पायुषी असतो.
वारंगाचे मध्यकाष्ठ तपकिरी आणि रसकाष्ठ पांढरे असते. ते मध्यम कठीण, मजबूत व हलके असते. उघड्यावर फारसे टिकाऊ नसते, कीटकांपासून ते जपावे लागते, कापण्यास व रंधून झिलई करण्यास सोपे असते. फळ्या, शेतीची अवजारे, वल्ही, कातीवकाम, आगपेट्या, खोकी, चौकटी, तक्ते, ब्रशांच्या पाठी, खेळणी इत्यादींसाठी विविध प्रकारे त्याचा उपयोग करतात. वृत्तपत्रांच्या कागदाकरिता याचा लगदा बांबूच्या लगद्यासह वापरता येतो. अंतर्सालीपासून धागा काढतात व त्याचे दोर बनवितात. कोवळी साल श्लेष्मल (बुळबुळीत) असून गूळ बनविताना मळी निघून जाण्यासाठी उसाच्या रसात टाकतात. तिच्यापासून गोंदही मिळतो. लाकूड कोळशाकरिता व जळणास वापरतात. पाला गुरांना चारतात, भारतीय लाखेचे किडे पोसण्यास हा वृक्ष उपयुक्त आहे. वेदना कमी करण्यास पानांचा लेप वापरताततसेच कातडीच्या रोगांत पानांचे पोटीस लावतात.
संदर्भ : C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.
जोशी, गो. वि. परांडेकर, शं. आ.
“