वायुजाळी : (गॅस मँटल). पेट्रोमॅक्स दिव्यात (गॅसबत्तीत) वापरण्यात येणारी जाळीदार कापडाची पिशवी. ही तापल्यावर झगझगीत पांढरा शुभ्रग्लो प्रकाश मिळतो. कार्ल औअर फ्रायहेर फोन वेल्सबाख यांनी दहा वर्षे प्रयोग करून या जाळीचा शोध लावला व १८८५ साली त्यांनी तिचे एकस्व (पेटंट) घेतले. या जाळीमुळे वायूच्या दिव्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाची गुणवत्ता सुधारली.

पूर्वी वायुजाळीच्या कापडासाठी सुती धागा वापरीत पण हे कापड आकसते आणि जाळीचा मूळ आकार खराब होतो, म्हणून याकरिता नंतर रॅमी या झुडपाच्या सालीपासून मिळणारा लांब व बळकट धागा किंवा रेयॉनचा धागा वापरण्यात येऊ लागला. उच्च दाबाचा वायू वापरणाऱ्या दिव्यासाठी घट्ट विणीची तर कमी दाबाचा वायू वापरणाऱ्या दिव्यासाठी सैल विणीची वायुजाळी वापरतात. वायुजाळी मोज्याप्रमाणे नळीसारखी असते. तिच्या व्यास सु. १.२५ ते १५ सेंमी. आणि लांबी सु. १५ सेंमी असते. वायुजाळीचा बंदिस्त भाग सामान्यपणे अर्धगोलाकार असतो व तिचे दुसरे मोकळे टोक बन्सन ज्वालकासारख्या ज्वालकाच्या तोंडावर घट्ट बसविता येते.

वायुजाळी सिरियम व थोरियम या धातूंच्या नायट्रेटांच्या विद्रावात भिजवून काढतात. यामुळे नायट्रेटे धाग्यांमध्ये रंध्रपूरित होतात म्हणजे भरली जातात. धागा मजबूत होण्यासाठी विद्रावात ॲल्युमिनियम, बेरिलियम व मॅग्नेशियम यांच्या नायट्रेटांपैकी एक वा अधिक नायट्रेटे टाकतात. मग जादा विद्राव काढून टाकून वायुजाळी सुकवितात.

ज्वालकातील ज्वलनशील वायूचे ज्वलन सुरू झाल्यावर प्रथम वायुजाळीचे धागे (कापड) जळतात व नायट्रेटांचे ऑक्साइडात रूपांतर होते आणि मूळ जाळीचा या ऑक्साइडांच्या रूपातील ढिसूळ सांगाडा मागे उरतो. ही ऑक्साइडे उच्चतापसह असल्याने उच्च तापमानाला जळत वा वितळत नाहीत. यामुळे वायूच्या नंतरच्या ज्वलनामुळे ऑक्साइडांची ही जाळी अतिशय तापून पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. येथे ज्योत नसते, तर तापदीप्त जाळीपासून प्रकाश मिळतो. जळलेला वायू वायुजाळीतून बाहेर पडतो. नैसर्गिक इंधन वायू, कोलगॅस, प्रोपेन तसेच बेंझीन, रॉकेल वा पेट्रोलची वाफ या ज्वलनशील वायूंच्या दिव्यांमध्ये ही वायुजाळी वापरतात. घरगुती वापराच्या पंपाच्या (प्रायमस) स्टोव्हच्या बर्नरवर अशी वायुजाळी बसवून त्याचाही दिव्यासारखा उपयोग करण्यात आला होता.

पहा : दिवे.                                                                           

मिठारी, भू. चिं.