वाघ, अनुताई : (१७ मार्च १९१०–२७ सप्टेंबर १९९२). सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ. जन्म पुणे येथे. त्यांचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. आई यमुनाबाई सोनोरी येथील सरदार पानसे यांच्या घराण्यातील होत्या. वयाच्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला (१९२३). परंतु सहा महिन्यांतच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. विवाहाच्या दिवसानंतर सासरचे किंवा पतीचे दर्शनही झाले नाही. त्यांनी पुढे माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव चालू ठेवले. तत्कालीन सामाजिक चालीरीती व स्त्रीजातीवरील बंधने झुगारून त्यांनी आपले अध्ययन पुढे चालू ठेवले. मराठी सातवी झाल्यावर अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या (१९२९). त्यांनी सुरुवातीस नासिक विभागात खेडेगावांतून प्राथमिक शिक्षिका म्हणून तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्या पुण्यात हुजूरपागा प्राथमिक विद्यालयात नोकरीस लागल्या (१९३३) आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन मॅट्रिक झाल्या (१९३७). पुन्हा त्या ग्रामीण भागात सामाजिक व शैक्षणिक कार्यांत मग्न झाल्या. म. गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या आदेशातून प्रेरणा घेऊन १९४५ साली मुंबईमधील बोरिवली भागात भरलेल्या ग्रामसेविकांच्या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाल्या. त्यावेळी ⇨ ताराबाई मोडक यांच्याशी अनुताईंचा परिचय झाला आणि अनुताईंच्या सर्जनशील गुणांना चालना मिळाली व त्यांतून त्यांचे ग्रामीण भागातील अध्यापनकार्याचे ध्येय साकारले. त्याच वर्षी बोर्डी (ठाणे जिल्हा) येथील मुलांसाठी ग्राम बालशिक्षा केंद्र ही पूर्वप्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. तीत अनुताई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यावेळेपासून सतत ४७ वर्षे (१९४५ ते १९९२) म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी अविरत व निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण शिक्षणाचे कार्य केले. हे कार्य चालू असतानाच मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची बी. ए. परीक्षा त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या (१९६१).
ठाणे जिल्ह्यातील ग्राम बालशिक्षा केंद्र (बोर्डी १९३३–४४) व नूतन बालशिक्षा केंद्र (कोसबाड १९४५–७३) यांत त्यांनी अध्यापिका म्हणून काम केले. त्यांनतर कोसबाडच्या नूतन बालशिक्षा केंद्राच्या सरचिटणीस (१९७४-७५), राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्या (१९७६–७९), अखिल भारतीय पूर्वमाध्यमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा इ. पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. अनुताईंचा अनेक शिक्षणसंस्थांशी घनिष्ठ संबंध आला तथापि बोर्डी-कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा व्याप वाढविला. या परिसरात त्यांनी दहा पाळणघरे, अकरा बालवाड्या, चार पूर्वप्राथमिक शाळा, बालसेविका प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षणवर्ग, अध्यापक प्रशिक्षण विद्यालय, कार्यानुभव प्रकल्प, उद्योगप्रशिक्षण, स्त्रीशक्ती जागृती संस्था (ठाणे), रात्रशाळा, ३० प्रौढशिक्षण संस्था, कुरणशाळा, मूकबधिर संस्था (डहाणू), आरोग्यकेंद्रे इ. अनेक संस्था स्थापन केल्या. या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी मुलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. ताराबाई मोडक यांनी ब्रिटिशांनी रूढ केलेल्या परकीय शैक्षणिक संकल्पनेला आव्हान दिले होते. त्यांच्या प्रयोगशीलतेला अनुताईंच्या निर्मितिक्षमतेची तेवढीच प्रभावी जोड मिळाली आणि तीतून बोर्डी व नंतर कोसबाड ह्या बालशिक्षणाच्या प्रयोगशाळाच बनल्या. ताराबाईंच्या मृत्यूनंतर (१९७३) या संस्थांची पूर्ण धुरा अनुताईंनी अखेरपर्यंत सांभाळली तसेच त्यांचा विस्तारही केला. मुलांचे शिक्षण म्हणजे त्यांचे खेळणे! ‘शिकलो’ हे लक्षातही येऊ न देता मुलांना शिक्षित करावयाचे खेळण्याच्या, बालगीतांच्या, गोष्टींच्या रूपात शैक्षणिक साधने तयार करावयाची, त्यासाठी मुलांच्या भावविश्वाचा शोध घ्यावयाचा आणि स्वतः बनविलेले शिक्षणसाहित्य वापरून मुलांना हाताळायचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. परिणामतः त्यांच्या संस्थांत स्त्रिया, मूक-बधिर व अपंग यांच्या विकासाचे प्रकल्प कार्यान्वित झाले. पाच-पंचवीस गावांचा समूह एकत्र करून ‘ग्राममंगल प्रकल्पा’पर्यंत अनुताई अखेर पोहोचल्या. आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. महात्मा गांधी, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेने स्त्रीजागृती आणि स्त्रियांचा उद्धार यांसाठी अनुताईंनी अविरतपणे कार्य केले. त्यांच्या विधायक व भरीव कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श शिक्षिका’ (१९७२) व ‘दलित मित्र’ (१९७५) हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. फाय फाउंडेशन पुरस्कार (इचलकरंजी, १९७८), ‘आदर्श माता’, सावित्रीबाई फुले पुरस्कार (१९८०), बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार (१९८०), जमनालाल बजाज पुरस्कार (१९८५), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा आशा भोसले पुरस्कार (१९९२) व रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार (१९९२) इ. पुरस्कार देऊन विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले. केंद्र शासनाने ‘पद्मश्री’ (१९८५) हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
अनुताईंनी आपल्या शैक्षणिक संकल्पना, पद्धती आणि प्रयोग यांची साद्यंत चर्चा स्फुटलेख व पुस्तकांद्वारे केली. त्यांच्या पुस्तकांपैकी बालवाडी कशी चालवावी (१९५६), कुरणशाळा, विकासाच्या मार्गावर, शिक्षणमित्र माला, अजब सातभाई (१९७७), आटपाट नगरात, सकस आहार गीते, टिल्लूची करामत, कोसबाडच्या टेकडीवरून (१९८०), गुरुमाऊलीचा संदेश (नाटक, १९८२), सहजशिक्षण (१९८२), दाभणेच्या जंगलात, विकासवाडी दर्शन (नाटक) इ. पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी काही पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती, इ. भाषांत अनुवादही झाले असून काहींच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. (१) बालवाडीतील गोष्टी भाग १ व २, (२) बालवाडीतील बडबडगीते, (३) बालवाडीतील कृतिगीते, (४) प्रबोधिका इ. पुस्तके आणि शिक्षक-पालक–प्रबोधनासाठी चालविलेल्या शिक्षणपत्रिका, स्त्रीजागृती करणारे सावित्री इ. मासिकांचे त्यांनी स्फुटलेखन केले. केसरी, छावा इ. नियकालिकांतून स्फुटलेखन केले. अनुताईंचे हे कार्य तरुणपिढीस, विशेषतः स्त्रीवर्गास, स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल असेच आहे. बोर्डी येथे त्यांचे अल्प आजाराने निधन झाले.
मिसार, म. व्यं. पानसे, रमेश