मॅक्‌गिल विद्यापीठ : माँट्रियाल (कॅनडा) येथील एक विद्यापीठ. माँट्रियालच्या जेम्स मॅक्‌गिल ह्या प्रसिद्ध व्यापाऱ्याने पैसा व जमीन देऊन  हे विद्यापीठ १८२१ मध्ये स्थापन केले. त्याच्या स्मरणार्थ विद्यापीठास पुढे मॅक्‌गिल विद्यापीठ हे नाव देण्यात आले. प्रारंभी मॅक्‌गिल  महाविद्यालयात अध्यापनास सुरुवात झाली व पुढे त्याचे विद्यापीठात रूपांतर झाले. त्यानंतर विद्यापीठाचा उत्तरोत्तर विकास झाला. क्वीबेक शासनाचे ह्या विद्यापीठास सहकार्य लाभले आहे.

प्रारंभीस विद्यापीठात कृषी, गृहविज्ञान आणि शिक्षक प्रशिक्षण ह्या विद्याशाखा होत्या. आता कृषी, कला, विज्ञान, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, पदवी अभ्यास संशोधन, विधी, वैद्यक, संगीत, शिक्षक, व्यवस्थापन, धर्मशास्त्र इ. विविध विद्याशाखा आहेत. फ्रेंच ही माँट्रियालची बोलभाषा असली, तरी विद्यापीठातील बव्हंशी अभ्यासक्रमांचे अध्ययन-अध्यापन इंग्रजी भाषेत केले जाते. वीस संशोधन संस्था विद्यापीठाशी संलग्न  आहेत. विद्यापीठात एकूण २०,२११ विद्यार्थी व १,४८० अध्यापक असून विद्यापीठीय ग्रंथालयात ६,५०,००० ग्रंथ होते (१९८२–८३).

मिसार, म. व्यं.