क्रूपस्कय, नड्येअझड कनस्टन्ट्यीनॉव्हन : (२६ फेब्रुवारी १८६९–२७ फेब्रुवारी १९३९). रशियन शिक्षणतज्ञा व प्रसिद्ध रशियन क्रांतिकारक नेता लेनिन याची पत्नी. सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड) या गावी एका सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबात जन्मली. तिचे पदवी परीक्षेपर्यंतचे सर्व शिक्षण जन्मगावीचे झाले. तिने १८९१ मध्ये मार्क्सिस्ट चळवळीमध्ये प्रवेश केला आणि अखेरपर्यंत ती कम्युनिस्ट पक्षात राहिली. या चळवळीत तिची लेनिनशी गाठ पडली आणि त्याची परिणती जुलै १८९८ मध्ये विवाहात झाली. तिला अनेक वर्षे कारावास व हद्दपारी भोगावी लागली. हद्दपारीत तिचे वास्तव्य फिनलंडमध्ये होते. ती काही दिवस इस्क्रा (ठिणगी) या नियतकालिकाची सचिव होती. रशियातील झारशाहीच्या अस्तानंतर शिक्षणखात्याचे सदस्यत्व तिला देण्यात आले. १९२० मध्ये ती शिक्षणखात्याची उपप्रमुख झाली. कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीची ती सदस्य होती. त्यामुळे पक्षाचे शैक्षणिक धोरण ठरविण्यात तिचा मोठा वाटा होता. तिने रशियात सर्वांना सोयीचे होईल असे व्यापक शिक्षण आणले आणि जुन्या शिक्षणपद्धतीत अनेक आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. लेनिनच्या मृत्यूनंतरही तिचा राजकारणावरील आणि मुख्यत्वे शिक्षणावरील प्रभाव कमी झाला नाही. तिने लिहिलेली पॉप्युलर एज्युकेशन अँड डेमॉक्रसी (१९१६), मेमरीज ऑफ लेनिन (१९३०) व सोव्हिएट वुमन (१९३७) ही पुस्तके लोकप्रिय आहेत. रशियाच्या आधुनिक शिक्षणपद्धतीचे सर्व श्रेय क्रूपस्कयला देण्यात येते. ती मॉस्को येथे मरण पावली.

देशपांडे, सु. र.