श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विदयापीठ : दिल्ली येथील एक अभिमत विदयापीठ. १९६२ साली विजया दशमीच्या दिवशी भरलेल्या अखिल भारतीय संस्कृत साहित्य संमेलनाने ‘ अखिल भारतीय संस्कृत विदयापीठा ’ची स्थापना त्याच वर्षी केली. २ ऑक्टोबर १९६६ रोजी या विदयापीठाचे ‘श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विदयापीठ’ असे नामकरण करण्यात आले. १ एप्रिल १९६७ पासून भारत सरकारने हे विदयापीठ आपल्या ताब्यात घेतले. १९७१ पासून राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे एक घटक विदयापीठ म्हणून ‘श्री लाल विदयापीठ’ या नावाने याचे कामकाज सुरू झाले. २० जानेवारी १९८७ रोजी या विदयापीठाची एक सामाजिक संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. भारत सरकारच्या १६ नोव्हेंबर १९८७ च्या अधिसूचनेनुसार या विदयापीठाला अभिमत विदयापीठाचा दर्जा देण्यात आला.

या विदयापीठाने नवी दिल्ली येथील स्वमालकीच्या सु. ४.४ हे. परिसरात वर्गखोल्या, गंथालय, अतिथिगृह, वसतिगृह, अध्यापक व इतर कर्मचाऱ्यांसाठीची निवासगृहे इ. इमारती उभारल्या आहेत. विदयापीठात वेद-वेदांगे, दर्शन, साहित्य आणि संस्कृती, आधुनिक ज्ञान व विज्ञान या विदयाशाखा आहेत. वेद-वेदान्त, दर्शन, साहित्य व संस्कृती या विदयाविभागांव्दारे संस्कृतमधील वेगवेगळ्या शाखांतील तीन वर्षांची शास्त्री, शास्त्री (ऑनर्स) व दोन वर्षांची आचार्य ही पदवी मिळविता येते. आधुनिक ज्ञान व विज्ञान शाखेव्दारे एक वर्षाचा शिक्षक प्रशिक्षण अभ्यासकम पूर्ण केल्यानंतर ‘ शिक्षा शास्त्री ’ ही पदवी व त्यानंतर ‘शिक्षा शास्त्रा’तील एक वर्षाचा प्रगत अभ्यासकम पूर्ण केल्यानंतर ‘ शिक्षाचार्य ’ ही पदवी मिळते. ज्यांना संस्कृत विषयातील वेगवेगळ्या शाखांमध्ये संशोधन करावयाचे आहे, ते वर उल्लेखित कोणत्याही विदयाशाखेत प्रवेश घेऊ शकतात. विदयापीठात संशोधन व प्रकाशन हा स्वतंत्र विभाग आहे. देशभरातील नामांकित विद्वानांचे प्रकाशित लेखन या विभागात ठेवले जाते. या विभागामार्फत शोध-प्रभा ही स्वत:ची संशोधन ज्ञानपत्रिका काढली जाते. याशिवाय संस्कृत स्टडीज इन इंडिया, संस्कृत स्टडीज ॲबॉड, समरीज ऑफ पेपर्स, सूव्हेनिअर ही या विभागांची प्रकाशने आहेत. तसेच विभागामार्फत एक पंचांगही काढले जाते. १९९४-९५ या शैक्षणिक वर्षापासून शास्त्री अभ्यासकमाबरोबरच संस्कृत, हिंदी व संगणक उपयोजनांचे व्यवसायशिक्षण अभ्यासकम यशस्वीपणे राबविले जात आहेत.

वेद-वेदांग, साहित्य आणि संस्कृती, दर्शन, आधुनिक ज्ञान व विज्ञान या विदयाशाखांतर्गत धर्मशास्त्र, ज्योतिष, पौरोहित्य, व्याकरण, संगणकशास्त्र, इंग्रजी, हिंदी, साहित्य, प्राकृत, पुराणेतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अव्दैत वेदान्त, जैन दर्शन, मीमांसा, प्राचीन न्याय वैशेषिक व नव्य न्याय, सांख्य योग, सर्वदर्शन, विशिष्टाद्वैत वेदान्त, संशोधन व प्रकाशन इ. विषय विदयापीठात शिकविले जातात.

बी.ए. (तीन वर्षे), बी.एड्. (एक वर्ष), ज्योतिष प्रज्ञा, ज्योतिषभूषण हा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासकम, पौरोहित्य प्रशिक्षण हा तीन महिन्यांचा अर्धवेळ अभ्यासकम, वैदयकीय फलज्योतिष पदविका (एक वर्ष), एम्.ए. (दोन वर्ष), एम्.एड्. (एक वर्ष), वास्तुशास्त्रविषयक पदव्युत्तर पदविका (दोन वर्षे), पीएच्.डी. हे या विदयापीठातील प्रमुख अभ्यासकम आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रमाणपत्र परीक्षा विदयापीठामार्फत आयोजित केल्या जातात.

चौधरी, वसंत