उत्कल विद्यापीठ : ओरिसा राज्यातील एक विद्यापीठ. ते कटक ह्या ठिकाणी १९४३ मध्ये स्थापन झाले. पुढे १९६२ मध्ये ते भुवनेश्वर ह्या स्थळी हलविण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप संलग्‍नकारी व अध्यापनात्मक असून ओरिसा राज्यातील कटक, पुरी, बलसोर, मयूरभंज, केओंझर व धेनकानाल या जिल्ह्यांतील महाविद्यालये त्याच्या कक्षेत येतात. विद्यापीठात विविध विषयांच्या एकूण एकोणीस शाखोपशाखा असून भूविज्ञान व प्राणिशास्त्र यांचे विभाग कटक येथे आहेत. दोन घटक महाविद्यालये व ४३ संलग्‍न महाविद्यालयांतून मानव्यविद्या, विज्ञान, तंत्रविद्या, विधी, वैद्यक, वाणिज्य, ललित कला इ. विषय शिकविले जातात. कुलगुरू हाच विद्यापीठाचा प्रत्यक्षात प्रशासक असून तो पूर्णवेळ पगारी नोकर आहे. त्याची नियुक्ती पाच वर्षांकरिता होते. १९६०-६१ मध्ये ह्या विद्यापीठाने त्रिवर्षीय पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम स्वीकारला असून पदव्युत्तर परीक्षांसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांस विद्यापीठातील ज्ञान-विज्ञान परिषद ही संस्था आर्थिक साहाय्य देते. विद्यापीठाचे माध्यम इंग्रजी आहे. विद्यापीठाचा १९७१-७२ चा अर्थसंकल्प पुढीलप्रमाणे होता : प्राप्ती रु. १११·०२ लाख व खर्च रु. १०६·७६ लाख. विद्यापीठातील सर्व शाखा व इतर घटक व संलग्‍न महाविद्यालये यांतून १९७१-७२ मध्ये सु. ३३,१९० विद्यार्थी शिकत होते. 

घाणेकर, मु. मा.