रोहिलखंड विद्यापीठ : उत्तर प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. बरेली येते स्थापना (१९७५). १५ फेब्रुवारी १९७५ रोजी विद्यापीठाचे कार्य सुरू झाले. बिजनोर, मुरादाबाद, रामपूर, बरेली, शाहजहानपूर, बदाऊन आणि पीलीभीत ह्या जिल्ह्यांत विद्यापीठाचे क्षेत्र विखुरलेले आहे. विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक असून त्याच्या अखत्यारीत ३१ महाविद्यालये येतात. जुलै ते जून हे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून कला, वाणिज्य, शिक्षण, विधी, विज्ञान, कृषी इ. विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. अध्यापनाचे माध्यम हिंदी व इंग्रजी आहे.

‘जीवविज्ञाने’ (लाइफ सायन्सेस) ही विद्याशाखा उघडण्याची विद्यापीठाची कार्यवाही सुरू आहे. विद्यापीठाच्या कक्षेत राहणाऱ्यांसाठी बी. ए., बी. कॉम्., एम्. ए., एम्. कॉम्. इ. परीक्षा खाजगी रीतीने देणे तसेच शिष्यवृत्त्या, विद्यावेतने, वसतिगृहे इ. सोयीही विद्यापीठात उपलब्ध आहेत. विद्यापीठात एकूण ३४,८४८ विद्यार्थी व ९०२ अध्यापक होते (१९८८-८९). विद्यापीठाचे उत्पन्न व खर्च अनुक्रमे १.३० कोटी रू व १.३६ कोटी रू. होता (१९८४-८५).

मिसार, म. व्यं.