मराठवाडा विद्यापीठ : महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील विद्यापीठ. तत्कालीन मुबंई राज्यशासनाच्या १९५८ मधील अधिनियमानुसार स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे प्रत्यक्ष कार्य २३ ऑगस्ट १९५८ पासून औरंगाबाद येथे सुरू झाले.

विद्यापीठाचे स्वरूप संलग्‍न व अध्यापनात्मक असून त्याच्या क्षेत्रात औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, जालना व लातूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागातील ९० महाविद्यालये विद्यापीठास संलग्‍न केलेली आहेत.

पूर्वी हे क्षेत्र उस्मानिया विद्यापीठाच्या (हैदराबाद) अखत्यारित होते. विद्यापीठात कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, विधी, वैद्यक व शिक्षणशास्त्र ह्या विद्याशाखा आहेत. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांत लोकप्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, विदेशी भाषा, प्राणिविज्ञान, भौतिकी इ. सतरा विद्याशाखांचा अंतर्भाव होतो. संस्कृत, पाली, विधी, मानसशास्त्र, उर्दु आणि संगीत या विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम असून ते संलग्‍न महाविद्यालयांतून शिकवले जातात. नांदेड येथे विद्यापीठाचे पदव्युत्तर शिक्षण तसेच संशोधन केंद्र आहे.

विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २५ जून – १५ मार्च असून त्यात (१) १५ जून – १६ ऑक्टोबर, (२) २२ नोव्हेंबग -१५ मार्च अशी दोन सत्रे होती. वैद्यक, ग्रंथपालनशास्त्र व अभियांत्रिकी या विद्याशाखांच्या बाबतीत विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष काहीसे भिन्न होते. १९८२ -८३ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाने सत्र परिक्षा पद्धत बंद केली असून पूर्वीचीच वार्षिक पद्धत स्वीकारली आहे. एम्. ए. व एम्. कॉम्. अभ्यासक्रमांत पाठनिर्देश पद्धतीचा आणि अभियांत्रिकी विभागासाठी वार्षिक परीक्षा पद्धतीचा विद्यापीठाने अंगीकार केला आहे. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व मराठी आहे. भाषा शाखांतर्गत रशियन, फ्रेंच, जर्मन यांचा प्रमाणपत्र, पदविका, पदव्युत्तर (रशियन भाषेत) अभ्यासक्रम वाणिज्य शाखांतर्गत उत्पादन व्यवस्थापन, प्रवर्तक तंत्र,विक्रीकला व जाहिरात तसेच नाट्यशास्त्र आदीचा एक वर्षीय पदविका व पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात उपलब्ध आहेत.

मराठवाडा विद्यापीठाच्या १९५८ पासूनच्या कुलगुरूंची नावे व कालावधी पुढीलप्रमाणे आहे: (१) श्री. एस्. आर. डोंगरकेरी १९-६-१९५८ ते १८-६-१९६४, (२) डॉ. नानासाहेब तावडे १९-६१९६४ ते १५-१०-१९७१, (३) श्री. रे. पं. नाथ १६-१०-१९७१ ते १५- १-१९७५, (४) श्री. शंकरराव खरात १६-१-१९७५ ते ६-६-१९७७, (५) डॉ. ब. रा. भोसले ७-६- १९७७ ते ७.७-१९८२, (६) श्री. गो. रा. म्हैसेकर ८-७-१९८२ ते २०-८-१९८३, (७) न्यायमूर्तमु. पा. कानडे ५-१०-१९८३ पासून …

विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे संलग्‍न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यासाठी वैद्यकीय तपासणीची सोय केली जाते विद्यापीठाचे रोजगार मार्गदर्शन संचालनालय विद्यार्थ्याना रोजगाराबाबत मार्गदर्शन करून त्यांना अंशकालिक रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. याशिवाय विद्यापीठातर्फे शैक्षणिक चर्चासत्र. परिसंवाद, प्रशिक्षणवर्ग इ. उपक्रम आयोजित केले जातात. क्रीडागार, वसतिगृहे इत्यादींच्या विद्यापीठात सुविधा आहेत. विद्यापीठातर्फे आंतरमहाविद्यालयीन व आंतरविद्यापीठीय क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात येतात. राष्ट्रीय सेवा योजना, प्रौढशिक्षण योजना, कमवा आणि शिका योजना, सहकारी ग्राहक भांडार योजना, बहि:शाल शिक्षण योजना यांसारख्या योजनाही राबविल्या जातात.

विद्यापीठाच्या मराठी विभागात महाराष्ट्रातील विविध धर्मसंप्रदायांची सु. ३,००० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. यांतील महानुभाव संप्रदायाची सु. १, १०० हस्तलिखिते सकळी, सुंदरी इ. विविध सांकेतिक लिप्यांतील आहेत. यातील निव्वळ मराठी हस्तलिखितांच्या सूचीचे काम पुर्ण झाले असून काही ग्रंथांचे संपादनकरून ते प्रसिद्ध केले आहेत. विभागातर्फे मराठवाड्यातील मराठी कोरीव लेख आणि अरबी, फार्सी व तुर्की शब्दांचा व्युत्पत्तिकोश हे संशोधन प्रकल्प लवकरच पूर्ण होतील.विज्ञान विभागातील लेसर किरण, वनस्पती आणि ती वरील कीड, जलचर आणि भूचर प्राणी इत्यादींसंबंधीचे संशोधन कार्य इतिहास विभागातील पारसनीस वस्तुसंग्रहालय प्राणिशास्त्र विभागातील निर्जीव प्राणिसंग्राहालय तसेच वनस्पति उद्यान इ. उल्लेखनीय आहेत.

विद्यापीठाच्या समृद्ध ग्रंथालयात २,२८,५७१ ग्रंथ, १,११५ नियतकालिके असून झेरॉक्स यंत्र, सूक्ष्मकार्डे व सूक्ष्मपट यांची सोय आहे. पंच नियतकालिकाचे १०० वर्षाचे खंड आणि जॉन मिल्टन (१६०८-७४) ह्या इंग्रजी कवीच्या काव्यसंग्रहाचे सुवर्णाक्षरांनी विभूषित असे सात खंडदेखील या ग्रंथालयात आहेत. विद्यापीठात एकून ३०,३२६ विद्यार्थी व २, ६२२ प्राध्यापक होते (१९८१-८२). याच वर्षाचे विद्यापीठाचे अनुदानासहित उत्पन्न ४.७२ कोटी रू. व खर्च ४.५८ कोटी रू. होता.

विद्यापीठाचे विद्यमान नाव बदलून ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’ असे करावे, असा प्रस्ताव विद्यापीठ कार्यकारिणीत संमत झाला. २७ जुलै १९७८ रोजी तो ठराव महाराष्ट्र विधिमंडळात संमत करण्यात आला. या नामांतर ठरावाची अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही. मराठवाड्यातील नामांतरविरोधी संघटनांकडून त्यास विरोध करण्यात आला. नामांतराच्या या वादग्रस्त प्रश्रनांची सोडवणूक करण्यासाठी विविध प्रकारचे पर्याय सुचवण्यात आले. तथापि हा प्रश्र अजून अनिर्णितच आहे.

जोशी. वा. ल.