पुणे विद्यापीठ : महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ . याची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे येथे झाली. नारायण चंदावरकर (२ डिसेंबर १८५५–१४ मे १९२३) यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वीच्या मुंबई प्रांतात सन १९१७ मध्ये शैक्षणिक परिषद भरली होती. त्या वेळी प्रादेशिक विद्यापिठे असावीत, अशा अर्थाचा ठराव करण्यात आला. हे तत्त्व सेटलवाड समितीने मान्य केले परंतु प्रत्यक्षात १९३२ पर्यंत काहीच घडले नाही. मुकुंदराव जयकर यांनी हा प्रश्न पुन्हा धसास लावला. १९४२ च्या सुमारास शासनाने त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमून याविषयीचा अहवाल देण्याची विनंती केली. हा अहवाल स्वीकृत होऊन १९४९ साली पुणे विद्यापीठ अस्तित्वात आले. त्याचे पहिले कुलगुरू म्हणून मुकुंदराव जयकर यांचीच नेमणूक शासनाने केली. पुणे विद्यापीठाची सध्याची  जागा त्यावेळच्या मुंबई राज्याकडून उपलब्ध करून घेण्यात त्यांना यश मिळाले. विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले. शिवाय दानशूर लोकांकडून देणग्याही मिळविल्या. या विद्यापीठास आंतरराष्ट्रीय दर्जार प्राप्त करून देण्यात त्यांचा  सिंहाचा वाटा आहे.

पुणे विद्यापीठात १९४९ सालापासून पुढील व्यक्तींनी कुलगुरू म्हणून काम पाहिले. त्यांच्या नावांपुढे त्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे.

(१) मु. रा. जयकर (१७ एप्रिल १९५० ते १७ एप्रिल १९५६), (२) र. पु. परांजपे (१८ जून १९५६ ते र ३१ मे १९५९), (३) द. गो. कर्वे (१ जून १९५९ ते १५ मे १९६१), (४) दत्तो वामन पोतदार (१ जुलै १९६१ ते ३० जून १९६४), (५) न. वि. गाडगीळ (१ जुलै १९६४ ते १२ जानेवारी १९६६), (६) ध. रा. गाडगीळ (३ मार्च १९६६ ते २८ ऑगस्ट १९६७), (७) ह. वि. पाटसकर (५ सप्टेंबर १९६७ ते २१ फेब्रुवारी १९७०),(८) बा. पां. आपटे (१५ जून १९७० ते ३ मे १९७२), (९) ग. स. महाजनी (४ मे १९७२ ते १७ जानेवारी १९७५), (१०) दे. अ. दाभोलकर (१८ जानेवरी १९७५ ते २२ ऑगस्ट १९७८), (११) रा. गो. ताकवाले (२३ ऑगस्ट १९७८- ).

विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून १०७ महाविद्यालये विद्यापीठाला संलग्न आहेत. यांशिवाय १८ मान्यवर संस्था विद्यापीठास जोडलेल्या आहेत. विद्यापीठाच्या कक्षेत पुणे, अहमदनगर, नासिक, जळगाव, धुळे या पाच जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा यात अंतर्भाव होतो.

विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणेच असून कुलगुरू व कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च अधिकारी प्रशासकीय कारभार पाहतात. विद्यापीठात पुरातत्वविद्या, वृत्तपत्रविद्या, मानवशास्त्र, व राज्यशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, प्राकृत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, आणि सार्वजनिक प्रशासन, आधुनिक भाषाशास्त्र, यूरोपीय भाषा, शिक्षण, वनस्पतिविज्ञान, रसायनशास्त्र, भूविज्ञान, गणित, सांख्यिकी, भौतिकी व प्राणिविज्ञान, विधी, वैद्यक, अभियांत्रिकी इ. विषयांच्या अध्यापनाची व्यवस्था असून वाङ्मय, सामाजिक विज्ञाने, नैसर्गिक विज्ञाने, विधी, वैद्यक, स्थापत्य, आयुर्वेद, वाणिज्य व शिक्षण यांच्या विद्याशाखा आहेत. पुरातत्वविद्या व भाषाशास्त्र यांचे विभाग डेक्कन महाविद्यालय (पुणे) व भूविज्ञान शाखा फर्ग्युसन महाविद्यालय (पुणे) येथे आहेत. विद्यापीठात पीएच्.डी., पदव्युत्तर आणि पदवीपूर्व अभ्यास करणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची संख्या ८२,५९० असून १७,५५९ बहिःस्थ विद्यार्थी शिकत होते. (१९७७–७८). शिक्षणाचे माध्यम इंग्रजी व मराठी आहे. विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज आहे. त्यात विविध विषयांवरील सु. २,२२,६१९ ग्रंथ असून अनेक नियतकालिके येतात. विद्यापीठाचे वार्षिक उत्पन्न व खर्च अनुक्रमे २,०३,५२,८०० रु. व २,३०,५३,३०० रु होता (१९७७–७८). विद्यापीठाच्या उत्पन्नाच्या बाबींत शासकीय अनुदान, शिक्षणशुल्क व देणग्या यांचा वाटा मोठा आहे.

विद्यापीठाचे स्वतंत्र आरोग्यकेंद्र असून वसतीगृहातील विद्यार्थि-विद्यार्थिनींना तसेच कर्मचाऱ्यांना विनामूल्य आरोग्यसेवा उपलब्ध आहे. विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण-केंद्रामार्फत व्याख्याने योजून सामान्य नागरीकांत ज्ञानाचा प्रसार करण्यात येतो तसेच विद्यापीठ ग्रंथप्रकाशनही करते. विद्यापीठाने सर्व विद्याशाखांत सत्र-पद्धतीचा अवलंब केला असून येथे संस्कृत आणि अर्थशास्त्र विषयांच्या प्रगत शिक्षणाची केंद्रे आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षापद्धतींतील सुधारणा अंमलात आणण्यासाठी या विद्यापीठाची निवड केली आहे. त्याप्रमाणे सत्र-परीक्षेचा अवलंब करून, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासाबद्दल गुण द्यावयास प्रारंभ केला आहे. १०० पैकी ४० गुण विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासास व ६० गुण सत्रअखेरीस होणाऱ्या लेखी परीक्षेस देण्यात येतात.    

                                               शेख, रुक्साना