वाक्यपदीय : व्याकरणविषयक संस्कृत ग्रंथ, बहुसंख्य विद्वानांच्या मते ह्या ग्रंथाची रचना ⇨भर्तृहरीने केली. वाक्यपदीयकर्ता भर्तृहरी आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरी असे एकाच नावाचे दोन ग्रंथकर्ते होऊन गेले, असे दिसते. इ. स. सातव्या शतकात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी इत्सिंग ह्याने भर्तृहरी नावाच्या एका भारतीय विद्वानाचा उल्लेख केला आहे. वाक्यदीय हा ग्रंथ ह्याच भर्तृहरीने लिहिल्याचा स्पष्ट उल्लेख इत्सिंगने केलेला आहे. ह्या भर्तृहरीचा काळ इ. स.च्या चौथ्या शतकाची अखेर वा पाचव्या शतकाची सुरुवात असा असावा. हा भर्तृहरी बौद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता.

 

हा ग्रंथ तीन कांडांत विभागलेला असून त्यात एकूण १,९६४ श्लोक आहेत. आगमकांड किंवा ब्रह्मकांड हे पहिल्या कांडाचे नाव. दुसऱ्या कांडाचे नाव वाक्यकांड असे आहे. पदकांड किंवा प्रकीर्णक ह्या नावाने तिसरे कांड प्रसिद्ध आहे. भर्तृहरीचा मूळ ग्रंथ फक्त पहिल्या दोन कांडांचाच असावा आणि १४ समुद्देशांत विभागलेले तिसरे कांड ह्या ग्रंथास मागून जोडले असावे, असे काही विद्वानांचे मत आहे. याउलट दुसरे आणि तिसरे कांड हाच मूळ ग्रंथ असून ज्याला आज आपण पहिले कांड म्हणून ओळखतो, ते नंतर जोडलेले असावे, असेही काही विद्वान मानतात. 

 

ह्या ग्रंथाच्या पहिल्या कांडात शब्दाचे ब्रह्मरूपाने वर्णन आहे. शब्दब्रह्म एक व नित्य आहे. त्याच्या अनेक शक्ती आहेत. त्यांत कालशक्ती ही प्रमुख आहे. ह्या कालशक्तीच्या साहाय्याने शब्दब्रह्म अनेक स्वरूपांत उपलब्ध होते. त्यामुळे जगाच्या व्यवहाराची उपपत्ती लागते. शब्दांपलीकडे विचार व अस्तित्व नाही. ज्या वस्तू शब्दगम्य आहेत, त्या ‘सत्’ आहेत. ह्या शब्दांची अनेक रूपे आहेत ती अशी : (१) ध्वनी (तोंडातून काढलेला ध्वनी) (२) स्फोट (ऐकणाऱ्याने काढलेला ध्वनी) व (३) अर्थवाही शब्द (अर्थ पोचविणारा शब्द). 

दुसऱ्या कांडात ‘वाक्य’ हा प्रमुख विषय आहे. भर्तृहरीच्या मते भाषेतील मूलभूत घटक ‘वाक्य’ असून ते अर्थबोधक असते. ते एक आणि अखंड असते. ‘पद’ व ‘पदार्थ’ ह्या केवळ व्याकरणशास्त्रात पृथक्करणाच्या सोयीसाठी कल्पिलेल्या गोष्टी आहेत. वाक्यापासून एकदम अर्थबोध प्रतिभेच्या साहाय्याने होतो. सर्व व्यवहार प्रतिभेमुळेच चालतो. परंतु भाषेच्या कल्पितांगांचे अध्ययन आवश्यक आहे, हे जाणून भर्तृहरीने जाती, द्रव्य, गुण, कारक, क्रिया, काल, पुरुष, संख्या इत्यादींचा विचार तिसऱ्या कांडात केलेला आहे. 

ह्या ग्रंथात भाषाशास्त्र, अर्थविचार (सिमँटिक्स) आणि तत्त्वमीमांसा ह्या निरनिराळ्या शाखांचे सिद्धांत एकत्र गुंफल्यामुळे हा ग्रंथ कळण्यास अत्यंत दुर्बोध झाला आहे. शिवाय भर्तृहरीचे तत्त्वज्ञान नंतरच्या दार्शनिकांनी मानले आहे. धर्मकीर्ती, दिङ्नाग व कुमारिल भट्ट ह्यांनी त्याचे मत खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आठव्या शतकानंतरच्या सर्व टीकाकारांनी शंकराचार्यांचा अद्वैतवादच भर्तृहरीला अभिप्रेत होता, असे गृहीत धरले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ह्या ग्रंथाच्या अध्ययनाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. कारण ह्या ग्रंथातील सिद्धांत केवळ संस्कृत भाषेपुरतेच मर्यादित नसून सर्व भाषांना उपयोगी पडणारे आहेत.  

 

ह्या ग्रंथाचे इंग्रजी, फ्रेंच आणि मराठी अनुवाद झालेले आहे. वृषभदेव, पुण्यराज, हेलाराजा, हरिवृषभ ह्यांनी ह्या ग्रंथावर टीका लिहिल्या आहेत.  

जोशी, शि. द.