वनस्पति, बीजी विभाग : (फॅनेरोगॅमिया स्पर्‌मॅफायटा). ज्यांचे प्रजोत्पादन वा नवीन संततीची निर्मिती बीजामुळे होते, अशा सर्वसामान्य वनस्पतींना बीजी वनस्पती असे म्हणतात [⟶ बीज]. खात्रीशीर लैंगिक पद्धतीने प्रजोत्पादन घडून येणाऱ्या वनस्पती, अशी त्यांची व्याख्या प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ ⇨कार्ल लिनीअस यांनी केली होती (१७३५) व त्यानुसार फॅनेरोगॅमिया या नावाने ह्या वनस्पती त्या वेळी ओळखल्या जात. त्यांना सामान्य इंग्रजीत ‘फ्लॉवरिंग प्लँट्स’ व मराठीत ‘फुलझाडे’ अथवा ‘सपुष्प वनस्पती’ असेही कधीकधी म्हणतात. फुलातील अवयवाशी तुलना करण्यासारखी परंतु बीजे निर्माण न करणारे अवयव (बीजुकपर्णे) काही अबीजी वनस्पतींत (टेरिडोफायटा–वाहिनीवंत अबीजी वनस्पती, नेचाभ पादप) आढळतात म्हणून गोंधळ टाळण्याकरिता बीजी वनस्पती (स्पर्‌मॅफायटा) हीच संज्ञा फक्त बीजे निर्माण करणाऱ्यांना आता निश्चित झाली आहे. लिनीअस यांनी कृत्रिम वर्गीकरण केले व अबीजी वनस्पतींपासून बीजी वनस्पतींचे वेगळेपणही दाखवून दिले. पुढे अनेक शास्त्रज्ञांनी नैसर्गिक वर्गीकरण करण्याकरिता त्यातील श्रेणी, गण, कुले व प्रजाती (वंश) यांचा दर्जा (प्रारंभिकता व प्रगतावस्था) निश्चित करण्याचा प्रयत्न  केला व अनेक वर्गीकरण पद्धती पुढे आणल्या. जी. बेंथॅम व जे. डी. हूकर, ए. एंग्लर व के. प्रांट्‌ल, जे. हचिन्सन, ओ. टिप्पो, सी. ई. बेसी व एच्‌. सी. बोल्ड इत्यादींच्या पद्धती आज निरनिराळ्या देशांत वापरात आहेत. बीजी वनस्पतींचे प्रकटबीज व आवृतबीज असे दोन उपविभाग ⇨रॉबर्ट ब्राउन यांनी केले (१८२७) असून ज्यांची बीजे किंजदलावर [⟶ फूल ] उघडी असतात, त्यांना प्रकटबीज वनस्पती (जिम्नोस्पर्मी) म्हणतात उदा., पाइन, सायकस, यू, जूनिपर इत्यादी. ज्यांची बीजे किंजपुटात (बीजकोशात) झाकलेली असतात, त्यांना आवृतबीज वनस्पती (अँजिओस्पर्मी) अथवा सामान्यपणे फुलझाडे म्हणतात उदा., आंबा, निंब, मका, नारळ इत्यादी.

बीजी वनस्पतींत आढळणारी बीजुकधारी म्हणजे बीजुके हे लाक्षणिक सूक्ष्म प्रजोत्पादक अवयव असणारी (द्विगुणित) पिढी फार जटिल असून गंतुकधारी म्हणजे जननकोशिका (जननपेशी) युक्त (एक गुणित) पिढी फार ऱ्हास पावलेली असते [⟶ एकांतरण, पिढ्यांचे ]. परागकणात पुं-गंतुकधारीची सुरूवात होते व परागनलिकेत ती पूर्ण होते [ आवृतबीज वनस्पतींत या पिढीच्या फक्त २ किंवा ३ कोशिका (पेशी) असून स्त्री-गंतुकधारी (अथवा गर्भकोश) बहुधा फक्त आठ कोशिकांचा असतो]. पुं-गंतुके केसलहीन म्हणजे लवरहित (गिंको व सायकॅडेसी यांमध्ये चलनशील) असतात गुरूबीजुककोशातून (बीजकातून) गुरुबीजुक सुटे (अलग) होत नाही परागकणांच्या (लघुबीजुकांच्या) रुजण्यानंतर परागनलिका बनते गुरूबीजुकातील स्त्री-गंतुकधारीचे किंवा त्यापासून बीज बनते व त्यावर दोन आवरणे असतात [⟶ बीज ] क्वचित त्यांपैकी एक किंवा दोन्ही लुप्त होतात बीजात गर्भावस्थेतील बीजुकधारी, गुरुबीजुककोशाचे आवरण आणि कधी कधी पुष्कही (गर्भाबाहेरील अन्नांशही) असतो.

बीजामध्ये वनस्पतीच्या तीन पिढ्यांचे प्रतिनिधी असतात. बीजावरण व कधीकधी आढळणारे परिपुष्क (बीजकातील प्रदेहापासून बनलेले व दलिकांबाहेरील अन्नांशाव्यतिरिक्त कोशिकांचा समूह) हे चालू पिढीचे (बीजुकधारीचे) प्रतिनिधी बीजांतील गर्भाभोवती असलेले अन्न (पुष्क) हा मधल्या पिढीचा (विशेषतः प्रकटबीजीतील स्त्री-गंतुकधारी) प्रतिनिधी व प्रत्यक्ष गर्भ [आदिकोरक (कोंब), आदिमूळ (मोड) व दलिका (डाळिंब्या)] हा तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी आहे व त्यापासून नवीन वनस्पती वाढते.

शरीराच्या बाह्य व आतील संरचनेच्या बाबतीत सर्वात अधिक श्रमविभागणी व प्रभेदन बीजी वनस्पतींतच आढळते. त्यांचा क्रमविकास (उत्क्रांती) सर्वांत अधिक, प्रसार मोठा (जगभर) व संख्या जास्त (सु. २.५ लाख जाती) आहे. ⇨ओषधी, ⇨क्षुप, ⇨वृक्ष, ⇨महालता इ. विविध स्वरूपांच्या व्यक्ती तर आढळतात शिवाय कित्येक ⇨अपिवनस्पति, परोपजीवी (जीवोपजीवी व शवोपजीवी) व कीटकभक्षक आहेत स्थानपरत्वे जलवनस्पती, मध्यवनस्पती, लवण वनस्पती आणि कच्छ वनस्पतीही आहेत. पुरातनत्वाच्या बाबतीत साधारणतः पुराजीव महाकल्पाच्या मध्यापासून (सु. २६ कोटी वर्षांपूर्वीपासून) प्रकटबीज वनस्पतींचे पूर्वज (जीवाश्म म्हणजे शिळारूप झालेल्या अवशेषांच्या रूपात) व साधारणतः मध्यजीव महाकल्पाच्या मध्यापासून (सु. १२ कोटी वर्षांपूर्वीपासून) आवृतबीज वनस्पती पृथ्वीवर असल्याचा पुरावा शिळारूप अवशेषांच्या रूपांत आढळतो.

परागनलिका व बीजे हे अवयव बीजी वनस्पतींना टेरिडोफायटापासून [⟶ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] वेगळे ओळखण्यास पुरेसे नाहीत असे ⇨बीजी नेचे या विलुप्त वनस्पतींच्या गटाच्या अभ्यासामुळे दिसून आले आहे. ह्या नेचासारख्या वनस्पतींच्या पानांवर बीजे असल्याचे त्यांच्या जीवाश्मांवरून आढळून आले आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन ए. जे. इम्स यांनी १९३६ मध्ये नेचे व बीजी वनस्पती यांचा टेरोप्सिडा हा एक गट (उपसंघ) ठरवून इतर तीन उपसंघांबरोबर (स्फेनोप्सिडा, लायकोप्सिडा व सायलोप्सिडा) ट्रॅकिओफायटा हा एक संघ बनविला आहे नेचे व बीजी वनस्पतींत मोठी पाने व पर्ण-विवरे [  पर्णलेशाला वेढणाऱ्या फटी ⟶ पान] असतात.

मनुष्याच्या दैनंदिन गरजा (अन्न, वस्त्र, औषधे, पेये, लाकूड, तेले, रंग इ.) भागविण्यास यांपैकी अनेकांचा उपयोग मनुष्यप्राणी पुरातन कालापासून करीत आला असून मानवी संस्कृतीचा व कित्येक उपयुक्त वनस्पतींचा निकट परस्परसंबंध आलेला आहे. सर्व प्राण्यांचे जीवन बीजी वनस्पतींवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे.

पहा : गर्भविज्ञान पुरावनस्पतिविज्ञान वनस्पति, अबीजी विभाग वनस्पति, आवृतबीज उपविभाग वनस्पति, प्रकटबीज उपविभाग वर्गीकरणविज्ञान.

संदर्भ : 1. Dittmer, H. J. Phylogeny and Form in the Plant Kingdom, New York, 1964.

           2. Lawrence, G. H. M. Taxonomy of the Vascular Plants, New York, 1965.

परांडेकर, शं. आ.