वटसावित्री : हिंदू सुवासिंनींनी सौभाग्यप्राप्तीसाठी करावयाचे एक व्रत. पतीला दीर्घायुष्य मिळावे, हीच या व्रतामागची भावना. ज्येष्ठ मासातील पौर्णिमा हा या व्रताचा महत्त्वाचा दिवस असला, तरी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत करावयाचे हे त्रिरात्र व्रत आहे. तीन दिवस उपवास करणे शक्य नसल्यास पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला तरी चालतो. सावित्रीसह ब्रम्हदेव ही या व्रताची मुख्य देवता. सत्यवान, सावित्री, नारद व यज्ञधर्म ह्या उपांग देवता. या व्रतामध्ये सावित्रीची सुवर्णप्रतिमा करून किंवा वडाच्या झाडाखाली सावित्री, सत्यवान, यम ह्यांची चित्रे करून पूजा करावी असे सांगितले असले, तरी प्रथेनुसार महाराष्ट्रात स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्षाच्या विविधांगांमध्ये सावित्रीसह ब्रम्हदेव, विष्णू व शिव यांचे वास्तव्य असते, असे मानण्यात येते. सुवासिनी त्याच्या मुळाशी पाणी घालतात. त्याला प्रदशिणा घालून सुताचे फेरे गुंडाळतात व त्याची पूजा करतात. नंतर देवतांच्या प्रतिमा ठेवल्या असल्यास त्यांची पूजा करतात. वटवृक्ष जवळपास नसल्यास त्याची फांदी आणून किंवा वटसावित्रीचे चित्र भिंतीवर लावून षोडशोपचारे पूजा करतात. पूजानविधीनंतर सुवासिनी एकमेकींना वाण देतात व सत्यवान-सावित्रीची कथा वाचतात किंवा श्रवण करतात.
बंगालमध्ये हे व्रत ‘सावित्रीव्रत’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी सुवासिनी आपल्या पतीची पूजा करतात. त्याला सुगंधी उटणे, तेले लावतात. गळ्यात फुलांचे हार घालतात हातात पुष्पगुच्छ देतात व पूजेनंतर त्याला नवीन वस्त्र देतात. याशिवाय यमाची पूजा करून त्याला फळे, फुले व वडाची फांदी अर्पितात. उत्तर भारतात ज्येष्ठ मासातील अमावस्येच्या दिवशी वटसावित्रीचे व्रतविधान केले जाते. व्रताचा आरंभ तेथे ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशीपासून होतो.
या व्रताची कथा अशी : मद्र देशाचा राजा अश्वपती ह्याला संतान नव्हते. संतानप्राप्तीसाठी त्याने ब्रम्हपत्नी सावित्रीचे (सूर्या हिचे) पुरश्चरण केले. सावित्रीच्या कृपाप्रसादाने त्याला कन्या झाली. त्यामुळे तिचे नाव त्याने सावित्री असेच ठेवले. ती उपवर झाल्यावर तिच्या विलक्षण तेजस्वीपणामुळे कोणीही राजपुत्र तिला मागणी घालीत नाही असे पाहून राजाने तिला वरसंशोधनार्थ पाठविले. तिने शाल्व देशाधिपती द्युमत्सेनाचा पुत्र सत्यवान ह्यास वर म्हणून निवडले. द्युमत्सेन राज्यभ्रष्ट होऊन अंधावस्थेत पत्नी ह्यांच्यासह अरण्यात राहात होता. सावित्रीने आपली निवड पित्यास सांगितली, तेव्हा देवर्षी नारदही तेथे होतेच. त्यांनी सत्यवान हा अल्पायुषी असून बरोबर एक वर्षाने त्याचा मृत्युयोग असल्याचे सांगितले. परंतु दृढनिश्चयी सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला आणि राजवैभव त्यामागून ती अरण्यात गेली. आपल्या सत्शील वागणुकीने व प्रेमळ स्वभावाने तिने सर्वांना आपलेसे केले. सत्यवानाच्या मृत्यूच्या तीन रात्री आधी तिने उपवास करून मनोभावे ईशचिंतन केले. पौर्णिमेच्या दिवशी लाकडे तोडण्यासाठी निघालेल्या सत्यवानाबरोबर ती आग्रहाने अरण्यात गेली. तो लाकडे तोडीत असतानाच वटवृक्षाखाली मूर्च्छित पडला. त्याला शुद्घीवर आणण्याचा प्रयत्न सावित्री करीत असतानाच प्रत्यक्ष यम सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी तेथे आला. प्राण हरण करून तो परत जाऊ लागताच सावित्रीही त्याच्या मागे जाऊ लागली. यमाचे व तिचे बराच वेळ संभाषण झाले. आपल्या वाकचातुर्याने आणि युक्तिवादाने तिने यमाकडून आपल्या सासऱ्याची दृष्टी व राजवैभव, पित्याला पुत्रप्राप्ती आणि स्वतःलाही पुत्रप्राप्ती असे वर मागून घेतले. वैधव्यदशेत पुत्रप्राप्ती कशी होणार? असा पेच तिने निर्माण केला आणि सत्यवानास जिवंत करावयास यमाला भाग पाडले. अखेरीस यमाने सावित्रीच्या पतिभक्तीची स्तुती करून सत्यवानास जिवंत केले.
भारतीय पुराणकथांत अनेक पतिव्रतांची आख्याने असली, तरी सावित्रीच सर्वोत्तम आदर्श ठरली आहे. सुवासिनीला आशीर्वाद देताना ‘जन्मसावित्री हो’ असा तो देण्याचा प्रघात आहे. सावित्री ही अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरली आहे.
कापडी, सुलभा