भगीरथ : हिंदू पुराणातील एक धर्मनिष्ठ व दानशूर राजा, सूर्यवंशातील म्हणजेच इक्ष्वाकुवंशातील या राजाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तप करुन ⇨ गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले. सगर – असमंजस्- अंशूमत् (अंशुमान्)- दिलीप- भगीरथ असा त्याचा वंशक्रम आहे. काही पुराणांच्या मते तो अंशुमताचाच मुलगा होता, भगीरथ या शब्दाचा अर्थ ‘वैभवशाली रथ असलेला’, असा आहे. भग-वैभव भगी-वैभवशाली. वेदातील ‘भगीरथ ऐक्ष्वाक’ आणि हा भगीरथ हे दोघे एकच असण्याची तसेच भगीरथ हा ऐतिहासिक पुरुष असण्याचीही शक्यता आहे.
एकदा अयोध्येचा सगर राजा अश्वमेध करीत होता. त्यावेळी इंद्राने त्याच्या अश्वमेधाचा अश्व पळवून नेऊन कपिल ऋषींच्या मागे लपविला. या सगराला केशिनी व सुमती अशा दोन बायका होत्या. असमंजस् हा केशिनीचा मुलगा होता. सुमतीला ६० हजार पुत्र होते. या साठ हजार पुत्रांनी कपिल ऋषींच्या मागे घोडा पाहून त्यांचा अपमान केला, म्हणून त्या ऋषींनी त्या सर्वांना शापदग्ध केले, त्यांच्या रक्षेला गंगेच्या पाण्याचा स्पर्श झाला, तरच त्यांचा उद्धार होणे शक्य होते. अंशुमत् व दिलीप यांनी गंगेला पृथ्वीवर आणण्याचे केलेले प्रयत्न असफल झाल्यावर भगीरथाने तिला प्रसन्न करुन घेतले. ती खाली उतरताना तिच्या प्रवाहाने पृथ्वीवर पृथ्वी खचू नये म्हणून तिला मस्तकावर धारण करण्यासाठी त्याने शंकरालाही प्रसन्न केले परंतु ती शंकराच्या जटेच अडकल्यामुळे भगीरथाने पुन्हा तप केले व मग शंकराने जटेचा केस तोडून वाट करुन दिली. म्हणून ती ⇨ अलकनंदा होय. नंतर तिने ⇨ भगीरथामागोमाग जाऊन सगरपुत्रांचा उद्धार केला. भगीरथाने तिला पृथ्वीवर आणले, म्हणून ती भगीरथाची कन्या म्हणजेच ⇨ भागीरथी बनली (महाभारत – वनपर्व वाल्मीकी रामायण – वालकांड पद्मपुराण – ४.२१ वायुपुराण ४७.३७ भागवतपुराण – नवमस्कंध ब्रह्मांड पुराण – ९७). भगीरथाच्या कठोर तपश्वर्येवरुनच ‘भगीरथ-प्रयत्न’ असा वाक्प्रयोग रुढ झाला आणि भगीरथ हा कठोर प्रयत्नवादाचे प्रतीक बनला. भगीरथाने गंगेवर घाट बांधले, तो यमसभेचा सदस्य होता, त्याला शिवाकडून वर मिळाले, त्रितुल या गुरुच्या उपदेशावरुन त्याने राज्यत्याग केला व दीर्घकालानंतर पुन्हा राज्यग्रहण केले, त्याच्या नभ (किंवा नाभाग) व श्रुत या दोन पुत्रांपैकी श्रुत हा त्याच्यानंतर गादीवर बसला इ. प्रकारची माहिती पुराणांत मिळते.
भगीरथाने उत्तरवाहिनी गंगेला दक्षिणवाहिनी बनवून उत्तर भारतावरचे दुष्काळाचे संकट दूर केले, असे काही अभ्यासक मानतात.
साळुंखे आ.ह.