मार्टिन ल्यूथरल्यूथर, मार्टिन : (१० नोव्हेंबर १४८३-१८ फेब्रुवारी १५४६). जर्मन धर्मोपदेशक आणि खिस्ती धर्मातील प्रॉटेस्टंट पंथाचा प्रवर्तक. जर्मनीतील आइस्लेबन, सॅक्सनी येथे एका शेतकरी कुटुंबात जन्मला. ल्यूथरचे वडील खाणीत काम करीत. मॅग्डेबर्ग आणि आयसेनाख येथील लॅटिन शाळांतून शिक्षण घेतल्यानंतर एर्फुर्ट विद्यापीठात तो अध्ययन करू लागला. तेथून बी. ए. (१५०२) आणि एम्.ए. (१५०५) झाला. त्याने वकील व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. तथापि १५०६ साली एर्फुर्ट येथील ऑगस्टिन्यन मठात त्याने प्रवेश केला. १५०७ मध्ये धर्मोपदेशक म्हणून त्याने दीक्षा घेतली. मठात त्याने प्रवेश का केला, हे निश्चितपणे ठाऊक नसले, तरी त्याच्या मठप्रवेशाच्या अवघ्या चौदा दिवस आधी घडलेली एक घटना त्याला कारणीभूत असावी. तो पायी प्रवास करीत असता वीज कडाडली आणि तो फेकला गेला. तेव्हाच्या भयभीत अवस्थेत ‘मी मठवासी होईन’ असे तो म्हणाला. परमेश्वराचा आणि आपला धनिष्ठ संबंध यावा देवाची प्रीती आणि कृपा यांचा अनुभव मिळावा ह्यासाठी आपण हा मार्ग स्वीकारला, असे ल्यूथर नेहमीच सांगत असे. स्वतःच्या कृत्यांमुळे नव्हे, तर परमेश्वराच्या कृपेमुळे नैतिक पूर्णत्व लाभते, ह्याचा अनुभव आल्याची साक्ष त्याने अनेकदा दिली. ईश्वरी प्रेमाचा श्रद्धेने स्वीकार करण्यामुळेच आपण तारले जातो हा ल्यूथरचा सिद्धांत ‘श्रद्धामूलक समर्थन’ म्हणून ओळखला जातो. १५०९ ते १५१२ ह्या कालखंडात त्याने एर्फुर्ट येथे, तर १५१२ ते १५१५ ह्या काळात व्हिटन्बेर्क येथे त्याने अध्यापन केले. १५१५ ते १५२४ ह्या कालखंडात तो धर्मसुधारणेच्या चळवळीत मग्न होता. १५२४ पासून तो पुन्हा व्हिटन्बेर्क येथे अध्यापन करू लागला आणि १५४६ पर्यंत तो तेथे अध्यापक होता. ह्या अध्यापनाच्या कालखंडातच-१५१२ साली- त्याला ईश्वरविद्येतील डॉक्टरेट मिळाली. सेंट पॉलची पत्रे, जर्मन गूढवाद व कँटरबरीच्या सेंट ॲन्सेल्मचे लेखन ह्यांचा त्यूथरच्या मनावर विशेष परिणाम झाला होता. १५१५ साली व्हिटन्बेर्कच्या एका चर्चचा धर्मोपदेशक आजारी पडल्यामुळे ल्यूथरने त्याच्या जागी त्या चर्चचा धर्मगुरु म्हणून काम स्वीकारले. त्या वेळी काही गोष्टी ल्यूथरच्या लक्षात आल्या. माणसांची नैसर्गिक प्रकृती पापमय आहे परंतु ईश्वरपुत्र ख्रिस्ताने मानवतेसाठी यातनामय मरण स्वीकारून माणसाला आदिम पापापासून मुक्त केले, ही खिस्ती धर्माची पायाभूत भूमिका. माणूस स्वबळाने पापमुक होऊ शकणार नाही परंतु सतत सत्कृत्ये करून तो आपल्याला लाभलेल्या ईश्वरी प्रसादात भर टाकू शकतो अधिकाधिक पुण्यवान होऊ शकतो. स्वतःचे तारण होण्यासाठी आवश्यक असलेल्या पुण्यापेक्षाही काही व्यक्तींचा-उदा., संतांचा-पुण्यसंचय अधिक होऊ शकतो. अशा अतिरिक्त पुण्यसंचयावर पोपचा अधिकार असून एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट पापाचे क्षालन घडवून आणण्यासाठी जेवढ्या पुण्याची गरज लागेल तेवढे पुण्य ह्या अतिरिक्त पुण्यसंचयातून त्या व्यक्तीकडे तो संक्रांत करू शकतो. अशी चर्चची भूमिका होती. पुण्य संक्रांत करण्याच्या पोपच्या ह्या कृतीला ‘अनुज्ञा’ किंवा ‘इंडल्जन्स’ अशी संज्ञा आहे. ह्या अनुज्ञेच्या बदल्यात त्या व्यक्तीने चर्चला काही देणगी द्यावयाची काही धर्मादाय करावयाचा. अशा देणग्यांमधून भव्य प्रार्थनामंदिरे बांधणे, रुग्णालये उभी करणे अशी काही कामे केली जात. परंतु पापपरिमार्जनाच्या अशा व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होऊ शकतो, हे ल्यूथरला स्पष्टपणे जाणवले. माइन्त्सचा आर्चबिशप अशा अनुज्ञा विकत आहे, हे त्याला दिसले, ह्या अनुज्ञा विकण्यासाठी ह्या आर्चबिशपने योहान येत्सेल नावाच्या एका ‘एजंटा’ची योजना केली होती. ह्या प्रकाराविरूद्ध तीव्र आणि परखड प्रतिक्रिया देण्यासाठी ३१ ऑक्टोबर १५१७ रोजी ल्यूथरने ’९५ थीसिस’ (९५ सिद्धांत) ह्या नावाने ओळखले जाणारे पत्रक व्हिटन्बेर्क येथील ‘ऑल सेंट्स चर्च’च्या दरवाजावर चिकटविले. त्यातील मुख्य मुद्दा हा होता, की अनुज्ञा विकत घेणाऱ्याला धर्मगुरुकडून होणाऱ्या शासनापासून मुक्तता मिळते हे म्हणणे सयुक्तिक वाटते परंतु केलेल्या पातकांमुळे निर्माण होणारी अपराधीपणाची भावना किंवा परगेटरीत (मृत्यूनंतर पूर्णपणे पापक्षालन होऊन स्वर्गात प्रवेश मिळेपर्यंतच्या अवधीत पापपरिमार्जनार्थ ईश्वराने दिलेल्या शिक्षा भोगण्याकरिता आत्म्यांची जेथे वसती असते, ती जागा. इथे असे आत्मे असतात, की जे तत्काळ स्वर्गप्रवेश मिळण्याइतके सुद्ध नाहीत व नरकात जाण्याइतके पापीही नाहीत) होणाऱ्या यातना किंवा परमेश्वराचा क्रोध व तो करणार असलेली शिक्षा ह्यांच्या पासून मुक्ती मिळते, हे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही.

ल्यूथरच्या ह्या कृत्यामुळे मोठी खळबळ माजली. १५१८ साली आउग्जबर्ग येथे पोपचा प्रतिनिधी कार्डिनल कॅजिटॅन ह्याच्या समोर त्याला बोलावण्यात येऊन त्याला त्याचे पत्रक मागे घेण्यास सांगण्यात आले. ल्यूथरने असे करण्यास ठाम नकार दिला. १५१९ मध्ये जर्मन ईश्वरविद्यावेत्ता योहान एक ह्याच्याशी वाद करण्याचे त्याने मान्य केले. ह्या वादाने अत्यंत तीव्र स्वरूप घेतले. ल्यूथरने अनेक पुस्तिकांच्या द्वारे आपल्या विचारांना प्रसिद्धी दिली व लोकजागृती केली. त्याने जर्मन राजे आणि सम्राट ह्यांना चर्चचा व्यवहार सुधारण्याच्या कामी लक्ष घालण्याचे आवाहन केले. जून १५२० मध्ये पोपने ल्यूथरला शरण येण्याचा आदेश दिला होता. पोपशी आपला काहीही संबंध नाही, असे १० डिसेंबर १५२० रोजी ल्यूथरने जाहीर केले. सम्राट पाचवा चार्ल्स ह्याचा पवित्र रोमन सम्राट म्हणून १५२० मध्ये राज्याभिषेक झाला होता. १५२१ मध्ये त्याने आपली राज्यसभा (डाएट) वर्म्झ येथे भरवली. तेथे आपले म्हणणे मांडण्यासाठी ल्यूथरला बोलावण्यात आले. ल्यूथरला सुरक्षिततेची हमी देण्यात आली होती. चर्चच्या अधिकृत परिषदेचे धर्मनिर्णय निर्दोष असतात हे ल्यूथरने मान्य करावे, अशी अपेक्षा होती. ल्यूथरने ते मान्य केले नाही. पाचव्या चार्ल्सची वृत्तीही आपल्याला प्रतिकूल आहे, हे त्याला दिसून आले. तो वर्म्झ येथून निघाला. पाचव्या चार्ल्सने चर्चच्या अधिकारांच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहावयाचे ठरविले होते. त्याने ल्यूथरला पाखंडीही ठरविले, वर्म्झ येथून परततनाना ‘फ्रीड्रिख द वाइज’ ह्याने ल्यूथरच्या सुरक्षिततेसाठी त्याला पळवून व्हार्टबुर्कच्या किल्ल्यात ठेवण्याची व्यवस्था केली. ल्यूथरच्या मतांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत होता आणि त्याला बरेच अनुयायीही मिळत होते. जर्मन शेतकऱ्यांनी १५२४ मध्ये जो उठाव केला, त्यासाठी ल्यूथरच्या धार्मिक सिद्धांतांचा आधार घेतला. अर्थात, ह्या चळवळीतले लोक जेव्हा अतिरेकाच्या आहारी जाऊ लागले, तेव्हा ल्यूथरने त्यांचा निषेध केला. १५२५ च्या सुमारास कॅथलिक पंथावर निष्ठा असलेले राजे संघटित होऊ लागले. परिणामतः धर्मसुधाराणावादी राजांनाही एकत्र आणण्याचे प्रयत्न सरु झाले. दोन पक्षच निर्माण झाले. त्यांचा झगड्यातून⇨प्रॉटेस्टंट पंथ निर्माण झाला.

ल्यूथरने कॅथरिना फोन वोरा ह्या खिस्ती संन्यासिनीशी (नन्) १५२५ साली विवाह केला. ह्या दांपत्याला तीन मुलगे व तीन मुली झाल्या.

 

ल्यूथरने विपुल लेखन केले. त्यात बायबलवरील भाष्ये, प्रवचने, स्तोत्रे इत्यादींचा समावेश आहे. आयस्लेबन येथे तो निधन पावला.

पहा : खिस्ती धर्मपंथ धर्मसुधारणा आंदोलन.

संदर्भ : 1. Bainton, Roland H. Here I Stand, A Life of Martin Luther, New York, 1950.

           2. Dickens, Arthur Geoffrey, Martin Luther and the Reformation, London, 1967.

           3. Fife, Robert H. The Revolt of Martin Luther, New York, 1957.

           4. Green, V. H. H. Luther and the Reformation, New York, 1964.

           5. Pelikan, J. Lehmann, H. P. Ed. Collected Works of Martin Luther, 56 Vols., New York, 1955-76.

           6. Ritter, Gerhard, Trans. Riches. John. Luther : His Life and Work, New York, 1964.

           7. Rupp, Gordon, The Righteousness of God, Luther Studies, Cambridge, 1953.

रायकर, प्रमोद