लोकार्नो: (जर्मन लगारस). स्वित्झर्लंडच्या दक्षिण भागातील तीचीनो परगण्यातील एक हवेशीर आरोग्यधाम आणि पर्यटनकेंद्र, लोकसंख्या १४,२२४ (१९८३ अंदाज). ते माद्जोरे सरोवराच्या उत्तर काठावर माद्जा नदीमुखापाशी बेलंझोन शहराच्या नैऋत्येस सु. १६ किमी. वर वसले आहे. तेथील सौम्य आल्हाददायक हवामान, निसर्गसौंदर्य आणि प्राचीन चर्च यांमुळे ते प्रवाशांचे आकर्षण बनले आहे. सरोवराकाठची वस्ती व उतारावरील वस्ती, असे गावाचे दोन स्वाभाविक विभाग पडले आहेत.
लोकार्नोचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. तथापि तेथे इतिहासपूर्वकाळात वसती असावी. त्याचा कागदोत्री प्रथम उल्लेख इ.स. ७८९ मध्ये आढळतो. ते मध्ययुगात मिलनच्या ड्यूकच्या आधिपत्याखाली होतो (१३४२-१५१३). त्यानंतर त्यावर स्विस संघराज्याची अधिसत्ता आली. पुढे त्याचा १८०३मध्ये तीचीनो परगण्यात समावेश करण्यात आला. पहिल्या नेपोलियनने स्वित्झर्लंड पादाक्रांत केल्यानंतर फ्रेंच संचालक मंडळाने निर्मिलेल्या हेल्वेटिक प्रजासत्ताकात त्याचा काही वर्षे (१७९८ – १८०३) अंतर्भाव करण्यात आला. लूगानो व बेलंझोन या शहरांबरोबरच लोकार्नोला तीचीनो परगण्याची आणखी एक राजधानी होण्याचा मान मिळाला (१८१५ – ८१). येथील वास्तूंवर इटालियन वास्तुशैलीची छाप जाणवते. प्याझा ग्रांदे चौकात व्यापारीपेठ असून तेथील दुकाने व उपाहारगृहे यांच्या कमानींत तिचा प्रभआव आढळतो. डोंगरउतारावरील छोट्या बंगलीवजा घरांभोवती बागबगीचे व द्राक्षांचे मळे आहेत. याच उतारावर पर्यटकांसाठी उद्यानगृहे असून सरोवराकाठीही लहानमोठी निवासस्थाने व उपाहारगृहे आहेत. वसंतऋतूत येथील कॅमीलिआ (सदाहरित फुलझाडे), लाजाळू, कवठी चाफा, कण्हेर इ. फुलझाडे आणि अंजीर, डाळिंब, ऑलिव्ह ही फळझाडे बहरतात. शहरात कापड, रसायने, मोटारी, साबण, विजेची उपकरणे, मद्यपेये इत्यादींचे उद्योंगधंदे चालतात. दागिने, लाकडी कलाकाम, इटालियन शिल्पे तयार करण्याचाही येथे व्यवसाय चालतो. येथील मॅडोनो देल सॅसो हे प्राचीन चर्च (स्था. १४८०) आणि त्यातील ब्रामांतीनो या प्रसिद्ध इटालियन चित्रकाराने काढलेले रंगीत चित्र, ही यात्रेकरुंची खास आकर्षणे होत. या चर्चची पुनर्बांधणी १६१६ मध्ये झाली. याशिवाय मिलानच्या सरदारांचा पंधराव्या शतकातील तटबंदीयुक्त किल्ला प्रेक्षणीय असून त्यात १९२६ पासून वस्तुसंग्रहालय आहे. येथील बहुसंख्य लोक रोमन कॅथलिक पंथाचे असून ते इटालियन भाषा बोलतात. दरवर्षी येथे चित्रपटमहोत्सव साजारा होतो.
पहिल्या महायुद्धानंतर ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम, चेकोस्लोव्हाकिया आणि पोलंड या यूरोपीय देशांनी भावी सुरक्षितता व शांतता यांकरिता दिनांक ५ ते १६ ऑक्टोबर १९२५ मध्ये येथे विविध परिषदा घेऊन पाच तह केले. ते ‘लोकार्नो करार’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
देशपांडे, सु. चि.
“