तिमोर : इंडोनेशियाच्या छोटी सूंदा द्वीपसमुहातील अगदी पूर्वेकडील बेट. क्षेत्रफळ ३३,९८५ चौ.किमी. लोकसंख्या ३०,८५,२७० (१९७०). विस्तार ८° द. ते १०° द. व १२३° पू. ते १२७° पू. यांदरम्यान. लांबी ४९९ किमी. रुंदी १५ ते ९६ किमी. १९७६ मध्ये इंडोनेशियाने घेईपर्यंत पूर्वेचा १९,२१८ चौ. किमी. क्षेत्राचा आणि ६,१०,२७० लोकवस्तीचा निम्मा भाग पोर्तुगीजांकडे होता. पश्चिमेकडील १४,७६६ चौ. किमी. क्षेत्रफळाचा व २४,७५,००० लोकवस्तीचा नुसा तेंगारा तिमूर हा निम्मा भाग आधीच इंडोनेशियाकडे होता. ही विभागणी डच व पोर्तुगीज यांमध्ये १८६० व १९१४ मध्ये झाली होती.

तिमोरच्या उत्तरेस बांदा समुद्र, पश्चिमेस साव्हू समुद्र आणि दक्षिणेस व पूर्वेस तिमोरचा समुद्र आहे. तिमोरच्या  आग्नेयीस सु. ६५० किमी. अंतरावर ऑस्ट्रेलिया आहे. हिंदी महासागरातील बड्या देशांच्या हालचालींमुळे तिमोरला भूराजनैतिक दृष्ट्या आगळेच महत्त्व प्राप्त होणार आहे.

तिमोरचा बहुतेक भाग ज्वालामुखीजन्य पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. काही ठिकाणी चिखलाचे कारंजी झरे (गायझर) आहेत परंतु जागृत ज्वालामुखी नाहीत. मौंट रामिलाऊ या सर्वोच्च शिखराची उंची २,९६० मी. आहे. ट्रायसिक व पर्मियन काळातील डोंगररांगांत आणि भूमीस्वरूपात चुनखडक आढळून येतो. नद्या आखूड आणि वेगवान असून सिंचनास किंवा वाहतुकीस उपयोगी नाहीत.

समुद्रसानिध्यामुळे येथे वर्षभर हवामान सम असते. जानेवारीत किनाऱ्यावर सरासरी तपमान २६·५° सें असून अंतर्गत भागात उंचीनुसार ते कमी आढळते. जुलैतील सरासरी तपमान २५° से. असते. डिसेंबर ते मार्चपर्यंत तिमोरमध्ये पश्चिम मोसमी वाऱ्यांमुळे सु. १४० सेंमी. पाऊस पडतो व कोरडा ऋतू दीर्घकाळ टिकतो.

येथे ऑस्ट्रेलिया व आशिया या दोन्ही खंडातील वनस्पती आढळून येतात. निलगिरी, रोझखुड, सागवान, बांबू, नारळ, चंदन, काही खुरटी झाडे व गवत या प्रमुख वनस्पती तेथे आहेत.

तिमोरमधील प्राणीजीवन समृद्ध आहे. अनेक प्रकारचे कीटक, पिलांसाठी पोटपिशवी असणारे प्राणी, सुसरी, कबूतरे, हरिण, काकाकुवा, साप, माकडे इ. प्राणी येथे आहेत.

तिमोरमधील मृदा सुपीक नाही. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाहित जमिनी मध्यम प्रतीच्या आहेत. डोंगराळ भाग जास्त असल्याने जमिनी उथळ व खड्यांनी युक्त आहेत.

भात, तंबाखू, कॉफी, नारळ, रबर ही प्रमुख पिके आहेत. मका, कापूस, ऊस, चहा व फळेही होतात. गवतावर गुरेढोरे पोसली जातात. पूर्व तिमोरमध्ये १९७१ मध्ये ७७,९४५ गाई–बैल, ४८,८५८ मेंढ्या, २,१०,२७७ शेळ्या, २,३५,२३७ डुकरे, १,३४,७४७ म्हशी आणि १,१९,४४१ घोडे होते. किनाऱ्यावर मासेमारीचा व्यवसाय चालतो. कासवाच्या पाठी व ट्रेपांग गोळा करतात. चंदनाच्या निर्यातीसाठी पूर्व तिमोर प्रसिद्ध आहे.

तिमोरमध्ये सोने, तांबे व जिप्सम यांचे साठे आढळलेले आहेत परंतु तंत्रविज्ञान, मनुष्यबळ व वाहतुकीची साधने यांच्या अभावामुळे खनिजांचे उत्पादन करता येत नाही. आग्नेय भागात तेल सापडण्याची शक्यता आहे.

तिमोरच्या लोकांत मलायी, पापुअन व पॉलिनीशियन यांचे मिश्रण आढळते. किनारी भागात काही यूरोपीय, चिनी व अऱब आहेत. मासेमारी, शेती, खोबरे वाळविणे, विणकाम करणे, दागिने व हत्यारे बनविणे हे स्थानिक लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत. किनारी भागात घरे खूपच उतरत्या गवती छपरांची व खांबावर उभारलेली असतात. बहुपत्नीकत्व, मागासलेपणा व अस्वच्छता या गोष्टी सर्वत्र आढळतात. येथील लोक इतर इंडोनेशियन लोकांपेक्षा लहान चणीचे व अधिक काळे आहेत. मानववंशशास्त्र दृष्ट्या ते अंबोइनी लोकांस अधिक जवळचे आहेत. तेराव्या शतकापासून हिंदू व जावा संस्कृतींच्या प्रभावामुळे व सतराव्या शतकात ख्रिश्चनांच्या संपर्कामुळे बहुतेक लोक नाममात्र मुस्लिम आहेत. येथील आदिवासी निग्रॉइड लोक अंतर्भागात शिकार व कंदमुळे गोळा करून राहतात. ते मेण, डिंक, मध इ. जंगली पदार्थ गोळा करून विकतात. पूर्वीच्या पोर्तुगीज तिमोरमध्ये १९७१–७२ मध्ये १ महाविद्यालय व १ माध्यमिक शाळेत १९७ विद्यार्थी, ३३९ प्राथमिक शाळांतून ३३,६५५ विद्यार्थी, ५ तंत्रविद्यालयांत ९३० विद्यार्थी व ७५९ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शाळांत, २ चर्च शाळांत १२४ विद्यार्थी व एका शिक्षक प्रशिक्षण शाळेत १०८ विद्यार्थी होते. कूपांग येथे नवीन विद्यापीठ स्थापन झाले आहे. रस्ते २,२४६ किमी., दूरध्वनितारा ५,८३९ किमी., दूरध्वनी केंद्रे ५९ व यंत्रे ७९४ आणि ४ बिनतारी केंद्रे दिली येथे होती. १९७४ मध्ये १४,०४० रेडिओ होते. व्यापार चिनी, मलायी व अरब लोकांच्या ताब्यात आहे. प्रमुख निर्यात खोबरे, कॉफी, रबर, कातडी व मेण यांची आहे.

सोळाव्या शतकात पोर्तुगीज मसाल्याच्या पदार्थांच्या व चंदनाच्या व्यापारासाठी येथे आले आणि त्यांनी वसाहतही केली. १६१३ मध्ये डच आले व त्यांच्या दीर्घकालीन स्पर्धेनंतर त्यांनी एकोणिसाव्या व विसाव्या शतकात हे बेट आपसात वाटून घेतले. दुसऱ्या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला, तेव्हा तिमोरचा पश्चिम भाग ‘नुसा तेंगारा तिमूर’ हाही इंडोनेशियात आला परंतु पोर्तुगीजांकडील भाग त्यांचेकडेच होता. जुलै १९७६ मध्ये पोर्तुगीजांची राजवट समाप्त होऊन पूर्व तिमोर इंडोनेशियाचा अठ्ठाविसावा प्रांत म्हणून जाहीर झाला. तेथील फ्रेटलिन गटाचे लोक पूर्व तीमोर स्वतंत्र ठेवू इच्छित होते परंतु इंडोनेशियाने तेथे स्वयंसेवक पाठवून तो प्रश्न सोडवला. त्यामुळे पोर्तुगालने इंडोनेशियाशी राजनैतिक संबंध तोडले.

पश्चिम तिमोरमध्ये कूपांग व पूर्व तिमोरमध्ये १०,७५३ (१९७०) लोससंख्येचे दिली, ही दोनच महत्त्वाची शहरे व बंदरे आहेत. तेथे अनुक्रमे डच व पोर्तुगीज राजधान्या होत्या. कूपांग जाकार्ताशी व दिली पोर्ट डार्विनशी (ऑस्ट्रेलिया) विमानमार्गाने जोडलेले आहे.

डिसूझा, आ. रे. भागवत, अ. वि.