चेझारे लोंब्रोसो लोंब्रोसो, चेझारे: (६ किंवा १८ नोव्हेंबर १८३५−१९ ऑक्टोबर  १९०९). इटालियन वैद्यकवेत्ता आणि गुन्हेशास्त्रज्ञ. जन्म व्हेरोना येथे एका ज्यू कुटुं बात. तूरिन, पाव्हिया, व्हिएन्ना आणि पॅरिस येथे त्याने वैद्यकाचे अध्ययन केले. १८६२ साली पाव्हिया येथे मनोदोषचिकित्सा ह्या विषयाचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. १८७१ मध्ये तो पेझारो येथील एका मनोरुग्णालयाचा संचालक झाला. तूरिन विद्यापीठातील न्यायवैद्यक व आरोग्यशास्त्र ह्या विषयांच्या अध्यासनी १८७६ मध्ये तो नेमला गेला. पुढे ह्याच विद्यापीठात गुन्हेशास्त्रीय मानवशास्त्र (क्रिमिनल अँथ्रपॉलॉजी) ह्या विषयाचे त्याने अध्यापन केले. तूरिन येथे तो निधन पावला. 

लोंब्रोसोची ख्याती त्याच्या दोन वादग्रस्त सिद्धांतांवर अधिष्ठित आहे : पहिला लोकोत्तर बुद्धिमत्तामनोविकृती ह्यांचा संबंध आणि दुसरा आनुवंशिकता अवनतिदर्शक शारीरिक कलंक वा लक्षणे (हिरेडिटरी पॅथॉलॉजिकल स्टिग्‌ मॅटा) व गुन्हेगारी ह्यांचा संबंध. 

लोकोत्तर बुद्धिमत्ता ही अपस्माराची (एपिलेप्सी) प्रारंभिक अवस्था असून सर्वच लोकोत्तर बुद्धिमंतांत शारीरिक व मानसिक अपकर्षाची लक्षणे दिसून येतात, असे त्याचे प्रतिपादन होते. मनोरुग्णांच्या, तसेच काही प्रतिभावंतांच्या चरित्रांचा अभ्यास करून हे मत त्याने मांडले होते. Genio e folio (१८६४, इं.भा जीनिअस अँड इन्‌ सॅनिटी, १८९१), L’Uomo di genio (१८८८, इं.भा. द मॅन ऑफ जीनिअस, १८९१) हे त्याचे ग्रंथ ह्या संदर्भात उल्लेखनीय होत. 

गुन्हेगार हे त्यांच्या शारीरिक लक्षणांवरून ओळखता येतात, हे लोंब्रोसोचे दुसरे वादग्रस्त मत त्याने अनेक गुन्हेगारांच्या शवचिकित्सेच्या, तसेच मानवमितीच्या दृष्टिकोणातून केलेल्या त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे बनविले होते. गुन्हेगारांची ओळख पटविणाऱ्या शारीरिक लक्षणांना त्याने कलंक (स्टिग्‌ मॅटा) असे संबोधिले. लहान कवटी, कमी वजनाचा मेंदू, लांब हात, पाठीमागे पसरत असणारे कपाळ, पुढे सरणारा जबडा, जास्त प्रसृत कान ही लोंब्रोसोला अभ्रिपेत असलेली, गुन्हेगारनिदर्शक अशी काही शारीरिक लक्षणे वा कलंक होत. ह्या कलंकांच्या आधारे लोंब्रोसोने असेही मत मांडले, की जन्मजात गुन्हेगारीचे मूळ गुन्हेगारांच्या पूर्वजांपासूनच्या पुनरावर्तित अशा गुणापकर्षात असते. हा पूर्वजप्रत्यावर्तनाचा-अटाव्हिझमाचा−प्रकार आहे, अशी त्याची धारणा होती. ह्या संदर्भात L’Uomo delinquent (इं. भा. द क्रिमिनल मॅन, १८९५) हा त्याचा ग्रंथ निर्देशकीय आहे. 

जन्मजात गुन्हेगारांखेरीज प्रासंगिक गुन्हेगार, वेडाच्या भरात गुन्हे करणारे, असे गुन्हेगारांचे प्रकारही लोंब्रोसाने मानले होते. 

लोंब्रोसाची गुन्हेगारांच्या संदर्भातली मते सर्वसंमत नसली, तरी गुन्हेशास्त्राचा पाया घालण्याचे श्रेय त्याला दिले जाते. Le Crime, Causes et remedes (१८९९,इं.भा. क्राइम, इट्स कॉझीस अँड रेमिडीज, १९१७) हा त्याचा ग्रंथही महत्त्वाचा आहे. 

गुन्हेगारांकडे पाहण्याची लोंब्रोसोची दृष्टी मानवतावादी होती आणि तिचा प्रभाव न्यायालयांवर पडला. 

पहा : गुन्हेशास्त्र दंडशास्त्र बालगुन्हेगारी. 

संदर्भ : 1. Kutella, H. G. Lombroso : A Modern Man of Science, London, 1911

           2. Lombroso Ferrero, Gina, Criminal Man According to the Classification of Cesare Lombroso, London, 1911.

भोपटकर, चिं. त्र्य.