लेह−१ : भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील पूर्वेकडील लडाख या सीमावर्ती जिल्ह्याचे मुख्यालय आणि एक पर्यटन केंद्र. हे श्रीनगरच्या पूर्वेस सु. २४० अंतरावर सिंधू नदीच्या उत्तरेस सस.पासून सु. ३,४५० मी. उंचीवर वसले आहे. लोकसंख्या ८,००० (१९८१). लेह हे नुवरा, चुशूल व झास्कर दरी यांच्याशी रस्त्यांनी जोडलेले असून श्रीनगर−लेह ही विमानसेवा उपलब्ध आहे. भारत−पाकिस्तान यांमधील युद्धबंदीरेषा (१ जानेवारी १९४९) याच्या उत्तरेस असून लडाखचा काही उत्तर भाग आणि बाल्टिस्तान हा भूप्रदेश पाकिस्तानने, तसेच पूर्वेकडील अक्साई चीन हा प्रदेश चीनने व्यापला आहे. त्यामुळे लेहला लष्करी दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. 

लेह हे बौद्ध मठांचे तसेच भारत−सिंक्यांग (चीन) व तिबेट यांच्यामधील एक व्यापारी केंद्र प्रसिद्ध आहे. हे चीनमधील कॅश्गार, खोतान आणि ल्हासा (तिबेट) यांच्याशी खुश्कीच्या मार्गाने जोडलेले आहे. श्रीनगर−लेह हा मार्ग झोजी खिंडीतून जातो. लेहपासून ल्हासा व चीनच्या इतर भागांत जाणारा व्यापारी मार्ग मरिअम खिंडीतून त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) नदीच्या खोऱ्यातून गेलेला आहे.

हे केंद्र १९७४ पासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून येथे डोंगरउतारावर डोग्रा घराण्यातील राजाने (ग्याल्पो) बांधलेल्या प्राचीन राजवाड्याचे अवशेष आहेत. राजवाडा शंभर खोल्यांचा व अनेक मजल्यांचा असावा, असे पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे. येथून सु. ४८ किमी. वर सर्वांत मोठा ‘हेमिस’ नावाचा गोम्पा (बौद्ध मठ) एका डोंगरावर असून त्याची उंची राजवाड्यापेक्षा जास्त आहे. यातील मौल्यवान वस्तू दर अकरा वर्षांनी पर्यटकांना पाहण्यासाठी खुल्या केल्या जातात. या दोन्ही इमारती वास्तुकलेतील कौशल्य दर्शवितात. लेहच्या परिसरात सु. १२ गोम्पा असून ३ किमी. अंतरावरील शंकर गोम्पा प्रसिद्ध आहे. बहुतेक मठांमध्ये सोनेरी बुद्धप्रतिमा व दुर्मिळ चित्रे आहेत. अव्वल इंग्रजी अमदानीत येथे पोलो हा लोकप्रिय खेळ खेळला जाई आणि त्यावेळी बाजार बंद ठेवण्यात येई. शहरात आशिया खंडातील सर्वोच्च उंचीवरील वातावरणविषयक वेधशाळा असून लेहची व्यापारपेठ लोकरीच्या उत्पादनासाठी (विशेषतः शाली व कपडे) प्रसिद्ध आहे. यांशिवाय शहरात प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, शिक्षकांसाठी प्रशिक्षण महाविद्यालये आणि साक्षरता केंद्र आहे. डीझेलवर चालणाऱ्या यंत्राद्वारे वीजनिर्मिती केली जाते. शहरात कृषिसंशोधन केंद्र आहे. याशिवाय रुग्णालये, फिरती औषधालये व खाजगी दवाखाने असून पशूंसाठी एक दवाखाना व पशुप्रजनन केंद्रे आहेत. 

 

देशपांडे, सु. र.