लैंगिक शिक्षण: लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ आनुवंशिक प्रेरणा आहे पण मानवतेवर प्राण्यांमध्ये असते, तशी मानवामध्ये ह्या प्रेरणेचे नियमन करण्याची काही नैसर्गिक यंत्रणा नाही. मानवामध्ये ह्या प्रेरणेचे कार्य व आविष्कार प्राण्यांप्रमाणेच पुनरुत्पादनापुरताच मर्यादित असता, तर लैंगिक शिक्षण अनावश्यक ठरले असते. उलट असे दिसून येते, की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानव पुनरुत्पादनाव्यतिरिक्त, केवळ लैंगिक सुखासाठीदेखील त्या प्रेरणेचा आविष्कार करू लागला. सामाजिक जीवनात गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे समाजाला नीतिनियम, निर्बंध, निषेध वगैरेंद्वारा ह्या प्रेरणेचे नियमन करणे आवश्यक झाले. ही सामाजिक नियंत्रणे विवेकपूर्वक पाळली गेली पाहिजेत म्हणून लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे. लैंगिक प्रेरणेच्या संदर्भातील सामाजिक निर्बंधांमुळे प्रजननयंत्रणेविषयी अज्ञान निर्माण होऊ शकते. जननेंद्रियांविषयी अतिगुप्तता बाळगण्याची प्रवृत्ती वाढीला लागते. कडक सामाजिक निषेधाच्या भयाचे दडपण येते. त्याचप्रमाणे लैंगिक व्यवहारविषयी गैरसमजुती निर्माण होऊ शकतात आणि अशा विविध कारणांमुळे अनेकदा स्त्री-पुरुष स्वतःची यथोचित लैंगिक भूमिका समजू शकत नाहीत आणि लैंगिक जीवनाच्या निरामय आनंदास मुकतात. इतकेच नव्हे, तर केव्हा केव्हा ह्या प्रेरणेसंबंधीच्या दमनविषयक अपसमजांमुळे पौगंडावस्थेततील मुलांमध्ये मानसिक ताण, वैफल्य, न्यूनगंड व त्यामुळे होणाऱ्या मानसिक व मनोकायिक विकृतींचा उद्‌भव होतो. योग्य लैंगिक शिक्षणाने हे सर्व टाळता येण्यासारखे आहे आणि ह्यामुळे लैंगिक शिक्षण आवश्यक झाले आहे. १९०० च्या आसपास, विशेषतः सिग्मंड फ्रॉइड, हॅबलॉक एलिस, ऑटो, रांक वगैरे मानशास्त्रज्ञांच्या कार्यामुळे लैंगिक शिक्षणाची चळवळ सुरू झाली. आज ती केवळ एक चळवळच राहिली नसून, एकूण शिक्षणाचा एक आवश्यक भाग झाली आहे. 

मानवाच्या लैंगिक जीवनाला इतक्या भिन्न व परस्परव्यंजक बाजू आहेत, की त्या सर्वांचा एकत्र विचार करणे कठीण आहे. ह्यामुळेच लैंगिक शिक्षणाची सर्वस्वीकार्य अशी व्याख्या करणे कठीण आहे. एवढे खरे, की ह्या शिक्षणाचा केंद्रबिंदू मानवी लैंगिकतेवर असला पाहिजे व ते व्यक्तीच्या कुटुंबाशी व समाजाशी होणाऱ्या समायोजनाशी संलग्न असले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यात विधायक लैंगिक आत्मभानाचा (आयडेंटिटी) विकास करण्यावर भर दिला पाहिजे. कित्येक अभ्यासक लैंगिक शिक्षणाची पुढीलप्रमाणे व्याख्या करतात : ‘स्त्री-पुरुषांमधील शारीरिक फरक व पुनरुत्पादनयंत्रणा अथवा त्यांच्यातील लैंगिक व्यवहारासंबंधी सामाजिक नीती ह्यांचे शिक्षण’. अशा व्यक्तीला सुखी, निरोगी व समाजमान्य असे लैंगिक समायोजन करण्यास साहाय्य व्हावे, हा लैंगिक शिक्षणाचा हेतू सामान्यपणे सांगितला जातो. 

हे लैंगिक शिक्षण साधारणपणे व्यक्ती प्रजननक्षम होण्याच्या पूर्वकाळात म्हणजे पौगंडाप्राप्तिकाळात देणे अधिक योग्य समजले जाते. हा काळ मुलींमध्ये वयाच्या बाराव्या वर्षाच्या सुमाराचा असतो, तर मुलांमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षाच्या सुमाराचा असतो. पण कित्येक शिक्षणतज्ञांचे व मनोविश्लेषणतज्ञांचे म्हणणे  असे आहे, ही मूल स्वतःचे लिंग ओळखू लागते व त्याला मुलगा व मुलगी ह्यांमधल्या फरकाची कल्पना येऊ लागते, तेव्हाच त्याचे लैंगिक शिक्षण सुरू होते. जर मातापित्यांनी त्याला सहज समजू शकेल अशा निरोगी व निषेधरहित भाषेत ते शिक्षण दिले नाही, तर त्याला रोजच्या व्यवहारात इतर मुलांशी, प्रौढांशी व सवंगड्याशी होणाऱ्या आंतरक्रियेमधून आपोआप त्याविषयी कल्पना येते व त्यातून त्याच्या ज्या मनोवृत्ती तयार होत राहतात, त्यांवर मातापित्यांचे काही नियंत्रण नसते. असे आपोआप होणारे ज्ञान गैरसमजुतींनी भरलेले असते. फ्रॉइडच्या म्हणण्याप्रमाणे ह्या कल्पना व मनोवृत्ती गैर व अनिष्ट असतात. त्यांचा मुलांच्या मनांवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे मुलांमध्ये आंतरविग्रह, ⇨न्यूनगंड, अपराधभावना वगैरे निर्माण होतात व मनोविकृतींचे बीज पेरले जाते. 

लैंगिक शिक्षणामध्ये स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांची रचना, त्यांचे कार्य, प्रजननयंत्रणा, त्याचबरोबर जननेंद्रियांची स्वच्छता, त्यांचे रोग, शिवाय लैंगिक व्यवहाराबाबतची धार्मिक व सामाजिक नीतिबंधने वगैरेंची माहिती समाविष्ट केली पाहिजे. ह्यांपैकी कोणती माहिती वयाच्या कोणत्या टप्प्यावर व कशा भाषेत दिली पाहिजे, ते बोलविकासतज्ञांच्या व शिक्षणतज्ञांच्या सल्ल्याने ठरविले पाहिजे. लैंगिक व्यवहाराच्या अनिष्ट व विघातक बाजूवर-उदा., व्यभिचार, गुप्तरोग, अनौरस संतती, कौमार्यावस्थेतील मातृत्व इ. – भर न देता, ती बाजू टाळता येण्यासाठी आवश्यक ती माहितीही समाविष्ट केली पाहिजे. त्याचप्रमाणे लैंगिक व्यवहारांतून येणाऱ्या शारीरिक व मानसिक विकृती, अपमार्गण, दुष्ट सामाजिक प्रभाव वगैरेंबाबतही तरुणांना सावध करण्यापुरतेच महत्त्व देऊन शिक्षण दिले पाहिजे. 

शालेय वयापूर्वी मुलांना शिक्षण देण्याची मुख्य जबाबदारी ही कुटुंबाची-विशेषतः मातापित्यांची–आहे. येथे मुलाला प्राथमिक आरोग्यविषयक काळजी, जननेंद्रियाची स्वच्छता यांविषयीचे मार्गदर्शन सोदाहरण द्यावयास पाहिजे. मुलांना सामान्य आणि आरोग्यकारक अशा शारीरिक सवयी लावणे व त्यासाठी योग्य मनोवृत्ती तयार करणे, हे मातापित्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठी मातापित्यांना शालेय सुयोजित लैंगिक शिक्षणाच्या कार्यक्रमामध्येच मार्गदर्शन केले पाहिजे.  

शाळांमध्ये लैंगिक शिक्षणासाठी योग्य अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याची संधी जीवनशास्त्राच्या वर्गात मिळू शकते. त्यात प्रजोत्पादनयंत्रणेचे सामान्य ज्ञान देणे, लैंगिक विषयांबाबत वैज्ञानिक मनोवृत्ती तयार करणे, लैंगिकतेबाबतच्या सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी योग्य ती पार्श्वभूमी तयार करणे वगैरेंकडे लक्ष वेधले जाईल अशा तऱ्हेने ह्या शिक्षण-कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे. 

प्राथमिक शाळेमध्ये स्त्री-पुरुषांच्या शरीरांमधील प्रजोत्पादनयंत्रणा, गर्भधारणा, गर्भाचा विकास, प्रसूती वगैरेंचे थोडक्यात व मुलानंना समजेल व पचेल अशा भाषेत, पण कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्ट वणैन करावे. त्यासाठी उदाहरणदाखल पाळीव प्राण्यांचा उपयोग करावा. 

माध्यमिक व उच्च शाळांत लैंगिक शिक्षण हे प्रजनन, मासिक ऋतुचक्र, जननेंद्रियांचे आरोग्य, त्यांचे रोग (गुप्तरोग, एड्स इ.), ⇨लैंगिक अपमार्गण ह्यांवर केंद्रित असावे. प्रशालांमध्ये त्या त्या विषयाच्या तज्ञांकडून हे शिक्षण दिले जावे व त्यात ज्ञानाच्या अचूकपणावर भर असावा. जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र वगैरे विषयांतील तज्ञ माणसे, त्याचप्रमाणे डॉक्टर व परिचारिका ह्यांचादेखील त्यात सहभाग असावा. लैंगिक शिक्षणाचा जो भाग वर्गातील पाठामध्ये अंतर्भूत करता येत नाही, त्यासाठी तज्ञांची चर्चात्मक व्याख्याने आयोजित करावीत. हे सर्व शिक्षण अतांत्रिकी (नॉन-टेक्निकल) भाषेत करावे. लैंगिकता ही जीवनातील एक प्रबळ व विधायक शक्ती, प्रेरणा आहे व विद्यार्थ्यास तिच्यातील जे चांगले, निकोप- निरोगी व वांछनीय आहे, त्याचे रसग्रहण करण्यास शिकविले पाहिजे. त्याचप्रमाणे लैंगिक अपमार्गण, स्वैराचार ह्यांची अनिष्टता व ते टाळण्यासाठी आवश्यक असलेली आरोग्यकारक दृढ मनोवृत्ती ह्यांचा त्यांच्यात विकास केला पाहिजे. 


लैंगिक शिक्षणाचा धर्म व नीती ह्यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे लैंगिक शिक्षणात धार्मिक नीतिनियमांची माहिती देणेही उचित होईल. काही पश्चिमी देशांत लैंगिक शिक्षणाच्या शालेय परियोजनेत धर्मगुरूंचा किंवा धर्मोपदेशकांचा सहकार घेतला जातो. भारतातही ही दृष्टी लैंगिक शिक्षणाबाबतचे सर्वमान्य धोरण ठरविताना व त्या शिक्षणाची परियोजना करताना ठेवली पाहिजे. 

लैंगिक शिक्षणामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की मुले व त्यांच्या संगोपन-संस्करणास जबाबदार असलेले मातापिता, इतर प्रौढजन व शिक्षक ह्यांच्याकडून मानवी लैंगिकतेवर उघड व निखालस चर्चा झाली पाहिजे. लैंगिक शिक्षणाचे वर्ग बालवर्गापासून कॉलेजपर्यंतच्या सर्व स्तरांवर आयोजित केले पाहिजेत व त्यांत शिक्षणार्थींना सुरक्षित व मोकळे वाटले पाहिजे. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक आपापल्या विषयांत पूर्ण तयार असले पाहिजेत म्हणजे विद्यार्थ्यांच्या शंका व अनपेक्षित प्रश्न त्यांना गोंधळात टाकणार नाहीत. अशा निलाखस व मोकळ्या शिक्षणासाठी शाळांना समाजाचा भक्कम आधार व पाठिंबा असणे आवश्यक आहे.  

लैंगिक शिक्षणावर टीका करणारेही आहेत. काही टीकाकार म्हणतात, की लैंगिक शिक्षणाने विद्यार्थ्यामध्ये नको त्या विषयात नको तितका रस निर्माण होतो. त्यामुळे तरुणांमध्ये प्रबळ व भयानक अशी लैंगिक शक्ती बंधमुक्त होऊन उफाळून येण्याचा संभव अधिक आहे. कोणत्याही स्वरूपात जननेंद्रियांचा व लैंगिकतेचा उल्लेख समाजस्वास्थाच्या दृष्टीने धोक्याचा आहे म्हणून लैंगिक शिक्षण देऊ नये. किमानपक्षी त्याचे स्वरूप व हेतू लैंगिक प्रवृत्तींचे दमन करण्याचा असावा. उलट मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे, की जननेंद्रियांविषयी अज्ञान, गैरसमजुती, प्रबळ लैंगिक प्रवृत्तीला दमन करून गवसणी घालण्याची धडपड ह्यांमुळे अनिष्ट मनोवृत्ती निर्माण होतात व परिणामतः व्यक्तीचे आणि पर्यायाने समाजाचे मानसिक आरोग्य धोक्यात येते म्हणून लैंगिक शिक्षण देऊन मुलांचे तद्‌विषयक गैरसमज दूर करणे, निसर्गनिर्मित वस्तुस्थितीची योग्य शब्दांत ओळख करून देणे व विवेकाने दुष्ट वृत्ती ताब्यात ठेवण्यास त्यांना मदत करणे हे अधिक आयोग्यप्रद आहे. 

काही आदिवासी जमातींत (घोटुल), गिटिओरा इ. नावांनी अस्तित्वात असलेली युवागृहे लैंगिक शिक्षणाच्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. ह्या युवागृहांत ठराविक वयानंतरची सर्व अविवाहित मुले व मुली रात्री वास्तव्याला जातात. लैंगिक जीवनाची व नेतृत्वाची कला येथे शिकता येते. युवक-युवती स्वेच्छेने व मोकळ्या मनाने युवागृहात येतात. परस्परांच्या स्वभावाचा परिचय करून घेतात. ह्यातून त्यांना लैंगिक शिक्षणही मिळते. अमेरिकेतील संकेतभेटीशी (डेटिंग) ह्या प्रथेशी काही प्रमाणात तुलना करता येण्यासारखी आहे. 

लैंगिक शिक्षणाच्या चळवळीमुळे जननेंद्रिये व तत्संबंधीच्या विषयांभोवती वैज्ञानिक व यथोचित वातावरण तयार झाले. लैंगिकता ही जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणून तिच्याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ज्ञान म्हणून अधिकृतपणे समावेश झालेला असो वा नसो, त्याचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. शिवाय त्याविषयी करण्यात येणाऱ्या चर्चा व अभ्याससत्रांमुळे त्याविषयीचे निषेधाचे व दमनकारक निर्बंधाचे वातावरण हळूहळू विरघळू जाऊ लागले आहे. त्याचप्रमाणे लैंगिक प्रेरणेच्या जाणीवपूर्वक नियमनाकडे नेणाऱ्या घटकांवर वाढता भर देण्यात येऊ लागला आहे. 

भारतात स्वातंत्र्योत्तर काळात देशाला लोकसंख्याविस्फोटापासून वाचविण्यासाठी ‘कुटुंबनियोजन’ व ‘कुटुंबकल्याण’ ह्या नावांनी संततिनियमनाची योजना राबविली जाते परंतु शासकीय पातळीवर विवाहपूर्व लैंगिक शिक्षण दिले जात नाही. तसेच तारुण्य प्राप्त होण्यापूर्वीच्या काळात मुलामुलींना शासकीय खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट इ. प्रभावी प्रचारमाध्यमांचा उपयोग करणे इष्ट आहे व त्यासाठी विचारपूर्वक धोरण व परियोजना ह्यांचीही गरज आहे. 

 

पहा : कामशास्त्र लिंग लैंगिक अपमार्गण 

संदर्भ : 1. Baruch, D.W. New Ways in Sed Education A Guide for Parents and Teachers, New York, 1959.

           2. Call, A. L. Toward Adulthod: Sex Education, New York, 1969

           3. Dallas, Dorothy, M. Sex Education in School and Society, Buckinghamshire, 1972.

           4. Ellis, Albert Abarbanel, Alberts Ed., The Encyclopaedia of Sexual Behaviour, 2 Vols., New York, 1961.

           5. Ellis Albert, Sex without Guilt, New York, 1958.

           6. McCary, J. L. A Complete Sex Education for Parents, Teenagers and Young Adults, New York, 1973.

           7. National Education Association and American Medical Association, Sex Edcuation, Chicago, 1955

           8.  Rogers, Rex, Ed., Sex Education : Rationale and Reaction, Combridge, 1974.

 

भोपटकर, चिं. त्र्यं.