लैंगिक वैगुण्ये : प्राकृत (सर्वसाधारण) समागमासाठी निर्दोष रचना व कार्यक्षमता असलेली बाह्य जननेंद्रिय आवश्यक आहेत. बाह्य जननेंद्रियांच्या रचनेत, कार्यात व एकूण लैंगिक कार्यक्षमतेत योग्य तऱ्हेने प्राकृत समागम होऊ न शकण्यासारखा किंवा त्यात अडथळा येण्यासारखा दोष असेल, तर त्यास लैंगिक वैगुण्य म्हणता येईल. 

मानवातील कामप्रवृत्ती मुख्यतः मानसिक पातळीवर असल्याने [⟶ लैंगिक वर्तन] येथे लैंगिक कार्यक्षमता हा शब्द केवळ बाह्य जननेंद्रियांचे तात्कालिन कार्य या अर्थाने वापरलेला नसून प्राकृत कामेच्छा, विरुद्ध लिंगी आकर्षण, समागमाची मानसिक व शारीरिक पूर्वतयारी, प्राकृत व आनंददायक−किमान त्रासदायक नसलेला–समागम व समागम पूर्तीचा आनंद (कामसंतृप्ती) या विस्तृत अर्थाने वापरलेला आहे. तसेच मानवामध्ये समागम केवळ प्रजोत्पादनासाठी होत नसून आनंद, जोडप्यातील सहभावना दृढ करणे, प्रेम व्यक्त करणे, मानसिक शांती व संतुलन, मानसिक ताण शिथिल करणे इ. अनेक मानसिक करणांसाठी होत असतो म्हणून प्रजोत्पादनाची गरज उरलेली नसतानाही प्राकृत समागम ही आवश्यकता ठरते. वंध्यत्व व लैंगिक वैगुण्य या वेगळ्या गोष्टी असून वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी लैंगिक वैगुण्य हे फक्त एक कारण आहे व प्राकृत समागम होत असूनही वंध्यत्व असण्याची इतर अनेक कारणे आहेत [⟶ वंध्यत्व]. उलट अनेक परिस्थितींत वंध्यत्व हा प्रश्न नसतानादेखील लैंगिक वैगुण्य असू शकते व त्यावर शक्य ते उपाय करावे लागतात. 

कारणे व त्यांचे वर्गीकरण : लैंगिक वैगुण्याची कारणे बहुधा एकमेकांत मिसळणारी व परस्परावलंबी असतात. त्यांचे खालील वर्गीकरण सोयीसाठी केले आहे.

(अ) शारीरिक कारणे : जननिक दोष (२) शारीरिक विकासातील दोष (३) ⇨हॉर्मोनांची (उत्तेजक स्त्रावांची) कमतरता किंवा त्यांचे असंतुलन (४) रोग व अपघात (५) कष्टसमागम :(क) पुरुषांतील कारणे, (ख) स्त्रियांतील कारणे. 

(आ) मानसिक कारणे व अकार्यक्षमता : (क) पुरुषांतील कारणे : (१) काम-निरुत्साह व नपुसंकत्व (शिश्नोत्थान असमर्थता), (२) अकाल वीर्यस्खलन, (३) विलंबित  वीर्यस्खलन व वीर्यस्खलनाचा अभाव, (४) लैंगिक अपमार्गण (ख) स्त्रियांतील कारणे : (१) योनिसंकोच, (२) काम-निरुत्साह, (३) कामसंतृप्तीचा अभाव, (४) लैंगिक अपमार्गण. 

शारीरिक कारणे : जननिक दोष : गर्भधारणा होण्याच्या क्षणीच X व Y या लिंग गुणसूत्रांच्या [⟶ आनुवंशिकी] अस्तित्वावरून गर्भाची लिंगनिश्चिती होते (XX–मुलगी व XY−मुलगा). लिंग गुणसूत्रांच्या (विशेषतः Y गुणसूत्राच्या) प्रभावामुळे जनन ग्रंथीचे रूपांतर स्त्री-ग्रंथीत होणार का पुरुष-ग्रंथीत होणार हे निश्चित होते. त्यानुसार पुढे लिंगविशिष्ट हॉर्मोनांची निर्मिती, लैंगिक अवयवांचा विकास व विशिष्ट मानसिक बैठक तयार होत असते. अंड (स्त्री-जनन कोशिका−पेशी) व शुक्राणू (पुं-जनन कोशिका) तयार होताना झालेल्या चुका, गर्भधारणा होताना झालेल्या चुका व गर्भधारेनंतर फलित कोशिकेचे समविभाजन [⟶कोशिका] होताना विभाजित कोशिकांत लिंग गुणसूत्रांचे वाटप योग्य प्रकारे न होणे यांमुळे जनन ग्रंथी अविकसित किंवा अर्धविकसित राहिल्यास किंवा अयोग्य प्रकारे विकसित झाल्यास अशा गर्भाचा शारीरिक आणि परिणामी पुढे मानसिक, भावनिक व सामाजिक लैंगिक विकास योग्य दिशेने होऊ शकत नाही. अशा व्यक्तीच्या लैंगिक जीवनात अनेक प्रकारे गुंतागुंतीचे प्रश्न उद्‌भवतात. याशिवाय अलिंग गुणसूत्रांमुळे ठरणाऱ्या काही गुणधर्मांचा प्रभावही व्यक्तीच्या विकासावर पडतो. 

हॉर्मोनांची कमतरता किंवा त्यांचे असंतुलन : गर्भावस्थेत किंवा नंतर वाढीच्या वयात हॉर्मोनांच्या असंतुलित प्रभावामुळेही लैंगिक विकासावर, विशेषतः दुय्यम लैंगिक गुणधर्मांवर (उदा., स्तनवृद्धी, दाढीमिशा येणे इ.) विपरीत परिणाम होतात. पूर्ण लैंगिक वाढीनंतर मात्र सर्वसाधारपणपणे लिंगविशिष्ट हॉर्मोनांच्या रक्तातील कमी जास्त प्रमाणाचा व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर विशेष परिणाम दिसत नाही (उदा., दोन्ह-स्त्री-ग्रंथी काढल्यावर किंवा ऋतुनिवृत्तीनंतरही म्हणजे मासिक पाळी कायमची थांबल्यावरही स्त्रीचे लैंगिक जीवन संपुष्टात येत नाही) परंतु सर्वसाधारपणपणे हॉर्मोनांच्या कमतरतेमुळे किंवा असंतुलनामुळे होणारा कोणताही मोठा रोग वा विकार (उदा., अवटू ग्रंथिस्त्राव न्यूनत्व किंवा आधिक्य [⟶ अवटू ग्रंथि], पोष ग्रंथिस्त्राव न्यूनत्व, कुशिंग लक्षणसमूह [⟶ पोष ग्रंथि], मधुमेह इ.) मात्र लैंगिक वैगुण्य निर्माण करू शकतात. 

शारीरिक विकासातील दोष : लिंग गुणसूत्रांतील दोष आणि हॉर्मोनांचे असंतुलन यांबरोबरच इतर अनेक (कळणाऱ्या वा न कळणाऱ्या) बाह्य कारणांचा गर्भावस्थेत व वाढीच्या वयात विपरीत प्रभाव पडल्यास लैंगिक अवयवांच्या निर्मितीत व विकासात दोष उत्पन्न होऊन लैंगिक वैगुण्य संभवते. [उदा., पुरुषांत लहान शिश्न, अधश्छिद्रता (मूत्रमार्ग खालच्या बाजूस उघडणे), निरुद्धमणी (शिश्नमण्यावरील आच्छादक त्वचेच्या घडीचे छिद्र आवळलेले वा आकुंचित झाल्याने शिश्नमणी उघडा करणे अशक्य होणे) व परानिरुद्धमणी (शिश्नमण्यावरील त्वचेची घडी त्याच्या मागे आखडली जाऊन शिश्नमण्यावर ती पुन्हा आणता न येणे) आणि स्त्रियांत योनिच्छद (योनीचे छिद्र अंशतः वा पूर्णपणे बंद करणारी श्लेष्मल म्हणजे बुळबुळीत पटलाची घडी) जाड असण्यापासून योनिमार्ग नसण्यापर्यंतचे अनेक प्रकार]. तसेच बाह्य जननेंद्रियांत मोठा दोष असल्यास अंतस्थ जननेंद्रियात दोष असू शकतात व सहसा वंध्यत्व आढळते. 

रोग व अपघात : अनेक रोगांमुळे व अपघातांमुळे तात्पुरते किंवा कायमचे लैंगिक वैगुण्य निर्माण होते. बाह्य जननेंद्रियांच्या रोगांत व अपघातांत हे उघडच आहे परंतु इतर शारीरिक रोगांतही अशी परिस्थिती संभवते. याचा विचार पुढे केला आहे.  

कष्ट-समागम : समागम अशक्य होणे व कष्ट-समागम म्हणजे समागम अवघड, अर्धवट किंवा वेदनादायक होणे या वेगवेगळ्या गोष्टी असल्या, तरी दोन्हीमधील फरक फक्त कमीजास्त प्रमाणाचा असून कारणे सहसा समान असल्याने ‘कष्ट-समागम’ हे एकच नाव बहुधा वापरले जाते. सहसा ही तक्रार स्त्रियांची असली, तर पुरुषांचीही असू शकते आणि त्याकरिता स्त्रियांना दोष देण्यात आला, तरी समागम त्रासदायक होण्यास कमीजास्त प्रमाणात दोघेही जबाबदार असतात. वेदनादायक समागमाचे कारण प्रथमतः एकात आढळले, तरी परिणामी जोडीदाराचे मानसिक स्वास्थ्य ढासळून त्याच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. कष्ट-समागमाची कारणे मुख्यतः कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. कष्ट-समागमाची कारणे मुख्यतः शारीरिक असली, तरी समागम त्रासदायक होण्याने मानसिक स्वास्थ्य बिघडते व त्यामुळे मूळ तक्रार वाढविणाऱ्या मानसिक तक्रारी उद्‌भवतात. योनिसंकोच, कामनिरुत्साह, नपुसंकत्व या मुख्यतः मानसिक स्वरूपाच्या तक्रारी व कष्ट-समागम याचे जवळचे नाते आहे. कित्येक वेळा यांतील कार्यकारणभाव ठरविणे अवघड असते. 

योनिमार्ग व शिश्नाच्या आकारमानातील वरवर दिसणारा फरक हे समागम अर्धवट किंवा न होण्याचे केवळ सैद्धांतिक कारण म्हणता येईल. कारण विशेष रचनात्मक दोष नसलेल्या योनिमार्गाची तननक्षमता (ताणले जाण्याची क्षमता) मोठी असते (प्रसूतीच्या वेळी बाळाच्या डोक्याला आकारमानाइतका तो ताणला जाऊ शकतो). 


बहुतेक वेळा समागम त्रासदायक होत असल्याचे तक्रार मुद्दाम विचारल्याशिवाय उघड केली जात नाही.  

पुरुषांतील कारणे : (१) अज्ञान, वेंधळेपणा, अवघडलेपणा, निष्काळजीपणा, अननुभवी असणे व असमंजसपणा यांमुळे समागम अयशस्वी किंवा त्रासदायक ठरू शकतो. त्याचप्रमाणे अतिसमंजसपणा किंवा सहचारिणीची अवाजवी काळजी व पुरुषीपणाचा अभाव हीही कारणे असू शकतात. अशा अयशस्वी किंवा त्रासदायक समागमाच्या वारंवार अनुभवामुळे स्त्रीमध्येही योनिसंकोच किंवा काम-निरुत्साहाची लक्षणे उद्भवू शकतात व प्रश्न जास्त गुंतागुंतीचा बनतो. (कोणताही जन्मजात दोष नसताना, केवळ शिश्नाचे आकारमान कमी जास्त असणे हा सर्वसाधारणपणे समागमला अडथळा ठरू शकत नाही, तसेच त्यामुळे समागमपासून सुख न मिळणे किंवा वंध्यत्व या गोष्टी संभवत नाहीत). 

 

(२) अतिस्थूलपणा.  

 

(३) नपुंसकत्व : याचे विवेचन पुढे मानसिक कारणात केले आहे. 

 

(४) बाह्य जननेंद्रियातील दोष व रोग : अधश्छिद्रतेमध्ये मूत्रवाहिनी शिश्नाच्या खालच्या बाजूस कमीजास्त प्रमाणात मध्ये उघडत असल्याने व त्यामुळे शिश्नातील पुढील खालच्या बाजूच्या ताठरणाऱ्या ऊतकाची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाची) वाढ नीट  न झाल्याने शिश्नोत्थान अर्धवट होते व झाल्यावर शिश्न खालच्या बाजूला मधे वाकलेले राहते. त्यामुळे समागम अशक्य किंवा अवघड होतो शक्य झाला, तरी वीर्य योनिमार्गात न पडल्याने वंध्यत्वाची शक्यता राहते. निरुद्धमणी या दोषात शिश्न खालच्या शिश्नमण्यावरील त्वचेची घडी समागमाच्या वेळी पूर्ण मागे सरकू शकत नाही व समागम त्रासदायक होतो. शिवाय इजा होण्याची किंवा नंतर परानिरुद्धमणी होण्याची शक्यता असते. 

 

कोणत्याही कारणाने बाह्य जननेंद्रियात वेदना होत असल्यास प्रत्यक्ष वेदनेमुळे व (वेदनेचा मानसिक परिणाम म्हणून) इच्छा कमी झाल्याने शिश्नोत्थान होत नाही. त्यामुळे शिश्नाच्या रोगांत [इजा, शोथ (दाहयुक्त सूज), व्रण व अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी)] व शिश्नातू जाणाऱ्या मूत्रमार्गाच्या रोगांत (इजा. शोथ, व्रण व संकोच, गळवे व अर्बुदे) शिश्नोत्थान होत नाही किंवा समागम वेदनादायक होतो. 

स्त्रियांतील कारणे : (अ) प्राकृत : समागमाचे सुरुवातीचे प्रयत्न बहुधा अवघड व त्रासदायक ठरतात. 

 

(आ) योनीपर्यंत पोहोचण्यातील अडथळे : आत्यंतिक स्थूलपणा आणि श्रोणीच्या [धडाच्या तळाशी नितंब अस्थी, माकडहाड व त्रिकास्थी यांनी बनलेल्या भागाच्या व पायांच्या हाडांच्या व स्नायूंच्या रोगांमुळे उद्भवणाऱ्या अभिवर्तनी (शरीराच्या मध्य अक्षाकडे किंवा त्याच्या पलीकडे मांडीसह पाय नेण्याच्या क्षमतेतील)] दोषामुळे योनीपर्यंत पोहोचणे अवघड होऊ शकते. समागमाच्या पद्धतीत वा असनात बदल करून अशा प्रकारचे अडथळे बहुधा दूर करता येतात. 

(इ) योनिमुखाजवळील अडथळे : (१) तननक्षमता नसलेले किंवा सहज न फाटणरे जाड टणक योनिच्छद (२) ततनक्षम नसलेले व लहान योनिमुख (उशिरा विवाह झाल्यास व उतार वयात अंडाशयाचे कार्य मंदावलेले असल्याने किंवा योनिमुखाजवळील त्वचेच्या काही विकारांत असा अडथळा संभवतो) (३) समागमाच्या वेळी योनिमुखाजवळ आणि योनिमार्गात पुरेसा ओलसरपणा नसणे [वृद्धपणा किंवा इतर कारणांमुळे स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) या हॉर्मोनाचा अभाव आणि कामनिरुत्साह, भीती, घृणा इ. मानसिक कारणांमुळे हे संभवते (४) योनिमुखावरील व योनिमुखाजवळील शस्त्रक्रिया [विशेषतः योनिविटप (गुदद्वार व बाह्य जननेंद्रियाचा पश्च भाग यांतील ऊतक क्षेत्र) संकोची व गर्भाशय भ्रंश दुरुस्ती शस्त्रक्रिया], प्रसूतीच्या वेळच्या वेड्यावाकड्या दुर्लक्षित जखमा व भाजणे यांमुळे हाणारे व्रण व योनिमुखाचे आकुंचन (५) योनिमुखाजवळील मोठी अर्बुदे आणि (६) योनिसंकोच (काही वेळा  दीर्घकालिक श्रोणिशोथ व इतर वेदनादायक श्रोणि-अंतर्गत विकारांमुळे संरक्षक प्रतिक्रिया म्हणून योनिसंकोच होत असला, तरी बहुधा याची कारणे मानसिक स्वरूपाची असतात याचे विवेचन पुढे मानसिक कारणांत केले आहे) या गोष्टींचा समावेश योनिमुखाजवळील अडथळ्यसांत होतो. 

(ई) योनिमार्गातील अडथळे : (१) योनिमार्ग नसणे व योनिमार्गाची वाढ अपूर्ण असणे (२) योनिमार्गाच्या अपुऱ्या किंवा अयोग्य वाढीमुळे योनिमार्गात पडदे आणि पापुद्रे असणे [(१)व(२) मध्ये समावेश केलेल्या विकृतींबरोबरच अपुऱ्या व अयोग्य वाढीचे परिणाम दर्शविणाऱ्या गर्भाशयाच्या व अंडवाहिन्यांच्याही विकृती बहुधा आढळतात] (३) अपुऱ्या वाढीमुळे किंवा गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांमुळे योनिमार्ग आखूड असणे (योनिमार्गाच्या मोठ्या तननक्षमतेमुळे या कारणाबद्दल मतभेद आहेत) (४) योनिमार्गशोथ व वृद्धापकाळाच्या बदलांमुळे योनिमार्गाचे आकुंचन होणे (५) जखमा, शस्त्रक्रिया, भाजणे आणि इतर कारणांमुळे होणारे तननक्षमता नसलेले व्रण व वंध, आणि (६) योनिमार्गात मोठी अर्बुदे असणे यांचा योनिमार्गातील अडथळ्यांत समावेश होतो. या कारणांबरोबरच योनिमार्गाच्या बाह्य / भागाशेजारील अवयवांच्या वेदनादायक विकारांमुळेही [उदा., मूळव्याध, गुदविदर (गुदमार्गातील खालच्या भागातील लांबट आकाराचा व्रण) व मूत्रमार्गाचे दुखरे रोग] समागम वेदनादायक होऊ शकतो. प्रत्यक्ष योनिमार्गाचा आतील / भाग असंवेदनक्षम असल्याने समागमाच्या वेळी खोलवर आत जाणवणारी वेदना योनिमार्गातील शोथ किंवा व्रण यांमुळे होत नसून श्रोणि-अंतर्गत, योनिमार्गसन्निध ऊतकांच्या व अवयवांच वेदनादायक रोगांमुळे होते [उदा., गर्भाशय ग्रीवाशोथ (गर्भाशयाच्या मानेसारख्या भागाचा शोथ), दीर्घकालिक श्रोणि-संयोजी ऊतक शोथ (श्रोणीच्या अधस्त्वचीय संयोजी म्हणजे जोडणाऱ्या ऊतकाचा शोथ), पश्चवक्री गर्भाशय (प्राकृत अक्षाबाहेर मागे वाकलेल्या स्थितीतील गर्भाशय), समागमप्रसंगी दाबला जाणारा अंडाशय भ्रंश व आतड्याचे दुखरे विकार]. त्यामुळे होणारी योनिसंकोची संरक्षक प्रतिक्रिया मूळ त्रास वाढविण्यास कारणीभूत होते. 

निदान : कष्ट-समागमाच्या कारणांचे निदान करताना पुढील मुद्दे मुख्यतः विचारात घ्यावे लागतात : (१) पती व पत्नी या दोघांची पूर्ण शारीरिक तपासणी (तक्रार एकाची असली, तरी प्रश्न दोघांचा असतो व दोष जोडीदारातही आढळू शकतो तसेच या तक्रारीमाग मानसिक प्रभाव अनेक असले, तरी शारीरिक कारण शोधण्याचा कसून प्रयत्न केल्याशिवाय मानसिक कारणाचे निदान होऊ शकत नाही). (२) वेदनेच्या किंवा त्रासाच्या जागेची निश्चिती. (३) वेदनेची सुरुवात व कालावधी (क्षणिक समागमाच्या वेळी जाणवणाऱ्या वेदेनेच कारण शारीरिक असते. दीर्घकाल टिकणारी किंवा उशिरा सुरू होणारी वेदना सहसा मानसिक स्वरूपाची असून काही कारणांमुळे समागम टाळण्यासाठी ती सबब असू शकते. काही वेळा याचे कारण मोठे आतडे, गुदाशय किंवा गर्भाशय यांचा अंगग्रह म्हणजे अनैच्छिक व अपसामान्य संकोच हेही असू शकते. उशिरा जाणवणारी पाठदुखी समागमाच्या वेळच्या शारीरिक स्थितीचा परिणाम असू शकते). (४) तक्रार प्राथमिक आहे का शस्त्रक्रिया, प्रसूती किंवा आजारपणापासून सुरू झाली आहे. (५) इतर तक्रारी आणि (६) तक्रारीमागील मानसिक पार्श्वभूमी (यात लैंगिक शिक्षण व अनुभव लैंगिक कल, आवडनिवड व वर्तन जोडीदार, समागम, गर्भारपण, प्रसुती व मुले यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जोडीदाराचे या बाबतीतील दृष्टिकोन इ. गोष्टींचा विचार करावा लागतो). 

उपचार : कष्ट-समागमावरील उपचार कारणांवर अवलंबून असतात व कारणाप्रमाणे केले जातात. दोन्ही जोडीदारांचे लैंगिक शिक्षण, गैरसमज दूर करणे, समागमाची व त्याचा परिणाम म्हणून होणाऱ्या गर्भारपणाची भीती घालवणे किंवा संततिप्रतिबंधक साधनांचा वापर सुचविणे, पश्चवक्री गर्भाशय किंवा अंडाशय भ्रंशामुळे विशिष्ट ठिकाणी खोल वेदना होत असल्यास वेगळ्या आसनांचा उपयोग करण्यास सांगणे आणि कोरडेपणा वाटत असल्यास पाण्यात विद्राव्य (विरघळणाऱ्या) असलेल्या मलमांचा उपयोग इ. उपचार बहुधा पुरेसे होतात. अंडाशयाचे कार्य मंदावल्याने योनिमुख व योनिमार्ग तननक्षमता नसलेला व कोरडा असल्यास काही काळ स्त्रीमदजन औषधे देऊन उपचार करावा लागतो. दुखरे व्रण काही वेळा शस्त्रक्रियेने काढावे लागतात. काही वेळा भूल देऊन योनिमुख ताणण्याचा उपचार करावा लागतो. बाह्य जननेंद्रियांच्या (योनी व शिश्न यांच्या) रोगांवर व दोषांवर कारणांप्रमाणे (प्रसंगी शस्त्रक्रियेने) उपचार केले जातात. 


मानसिक कारणे : लैंगिक वैगुण्याच्या प्रामुख्याने मानसिक असलेल्या कारणांचा येथे विचार केलेला आहे. विवाह संबंधात तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींपैकी नपुंसकत्व व काम-निरुत्साह या दोन गोष्टी महत्त्वाच्या, त्रासदायक जोडीदाराच्या संयमाचा अंत बघणाऱ्या व बऱ्या होण्यास कठीण अशा आहेत. 

पुरुषांतील कारणे : नपुंसकत्व व काम-निरुत्साह : इच्छा असूनही शिश्नोत्थान न होणे (नपुंसकत्व) व लैंगिक इच्छाच नसणे (काम-निरुत्साह) या मूलतः वेगळ्या गोष्टी आहेत परंतु त्या एकमेकींशी संबंधित, काही वेळा परस्परावलंबी व बहुधा समान कारणपरंपरा असणाऱ्या असल्याने त्यांचा एकत्र विचार केला आहे. शिश्नोत्थान असमर्थतेमुळे समागम अशक्य होणे ही दोन्हीतील समान तक्रार असते. 

काम-निरुत्साहामुळे शिश्नोत्थान न होणे इच्छा असूनही शिश्नोत्थान न होणे सौम्य अनियमित किंवा क्षणिक शिश्नोत्थान (योनिप्रवेश पूर्ण होण्याच्या आत शिश्न शिथिल होणे) आणि प्राकृत शिश्नोत्थान व समागम होऊनही कामसंतृप्ती (कामपरमोत्कर्ष) व वीर्यस्खलन न होणे याप्रकारे तीव्रतेनुसार या तक्रारीची वर्गवारी करता येईल. 

सर्वसाधारण समज आहे त्यापेक्षा वरील तक्रारींचे प्रमाण जास्त आढळते परंतु संकोच, अज्ञान व स्वाभिमान गमावण्याची भीती यांमुळे पुरुषाकडून व बहुधा त्याच्या पत्नीकडूनही स्वतःहून ही तक्रार केली जात नाही. ही तक्रार हळूहळू उद्‌ भवणारी किंवा एखाद्या मानसिक धक्क्याबरोबरच अचानक सुरू झालेली असते आणि ती तात्कालिक, काही वेळा, काही प्रसंगी, काही व्यक्तींबरोबर उद्‌ भवणारी किंवा कायमची असू शकते. ती स्वभावधर्माचा भाग म्हणून किंवा मानसिक कारणांमुळे उद्‌ भवणारी (स्त्रियांतील काम-निरुत्साह या तक्रारीप्रमाणेच) असून (मध्यलिंगी असलेल्या अपवादात्मक व्यक्ती वगळता) अशा बहुतेक व्यक्तींत शुक्राणूंचे उत्पादन प्राकृत पातळीपर्यंत आढळते (म्हणून ती व्यक्ती मूलतः प्रजोत्पादनक्षम असते). टेस्टोस्टेरोन या हॉर्मोनाची रक्तातील पातळीही बहुधा योग्य प्रमाणात आढळते व या हॉर्मोनाच्या रक्तातील पातळीही बहुधा योग्य प्रमाणात आढळते व या हॉर्मोनाच्या उपचाराने तक्रार दूर होत नाही. 

कारणे : (१) प्राकृत कारणे : यौवनावस्थेच्या आधी व उतारवयात कमी-अधिक प्रमाणात ही गोष्ट आढळते. थोड्या काळात वारंवार समागम झाल्यास इच्छा व शिश्नोत्थानाची ताकद तात्पुरती कमी कमी होत जाते. 

() मूळ स्वभावकर्म : आवडनिवड व कमी-अधिक इच्छा इतर गोष्टींप्रमाणेच लैंगिक गोष्टींतही असते. लैंगिक इच्छा अजिबात नसलेल्या किंवा कमी असलेल्या अशा व्यक्तींना हस्तमैथुन व स्वप्नावस्थेचाही अनुभव नसतो व त्यांच्यात सुधारणेची शक्यता अत्यल्प असते. 

(३) संस्कार : लहान वयातील कडक संस्कार, धर्म-नीतिनियमांची बंधने व लैंगिक गोष्टी वाईट असल्याचे ठसवलेले असल्यास किंवा स्वार्थी मायेपोटी, एकुलत्या एक मुलास, इतर स्त्रियांपासून दूर राहाण्याची शिकवण अतिप्रेमळ आईने दिलेली असल्यास ही तक्रार उद्‌ भवू शकते. 

(४) काही प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांत ही तक्रा र जास्त आढळते असे म्हणतात परंतु या तक्रारीमागची व ते विशिष्ट व्यवसाय निवडण्यामागची मानसिकता व स्वभावधर्म एकच असतात हे त्याचे कारण असू शकेल. तसेच व्यवसायात पूर्ण वेळ गुंतून पडणे, त्यातील ताण आणि शारीरिक व मानसिक थकवा यांमुळेही लैंगिक इच्छा कमी होते. उलट काही वेळा मूळ तक्रार असल्यामुळे समागमाचे प्रसंग टाळण्यासाठी व्यवसायात मन गुंतवले जाते किंवा व्यवसायात गुंतून पडल्याची सबब पुढे केली जाते. 

(५) पत्नीबद्दलची भावना : काही व्यक्ती स्वकेंद्रित व एकूणच कोणावर मनः पूर्वक प्रेम करण्यास असमर्थ असतात. अशा वेळी किंवा आईच्या प्रेमात गुरफटून राहिल्याने पत्नीवर प्रेम करू न शकणे, मुळातच पत्नीवर प्रेम नसणे किंवा नंतर ते कमी होणे व विवाहबाह्य प्रेमप्रकरण असणे या कारणांनी त्या पति-पत्नीच्या समागमाच्या वेळी ही तक्रार संभवते. पत्नीचा प्रतिसाद नसणे, तिला समागमामुळे सुख न वाटणे किंवा कामसंतृप्ती न होणे यांमुळेही ही तक्रार सुरू होऊ शकते किंवा वाढते.

(६) अति-उत्तेजित अवस्था, समागम नीट जमेल की नाही याची काळजी, समागमाचा किंवा समागमाच्या परिणामी होणाऱ्या गर्भारपणाचा व प्रसूतीचा पत्नीला त्रास होईल अशी पत्नीची अती काळजी, लैंगिक रोग संक्रामित होण्याची भीती, पूर्वीच्या किंवा आताच्या विवाहबाह्य संबंधाविषयी अपराधीपणाची भावना या प्रकारचीही कारणे संभवतात. तसेच पत्नीला गर्भ राहू नये या सुप्त इच्छेच्या दडपणामुळे समागम योग्य होऊनही कामसंतृप्ती व वीर्यस्खलन न होणे संभवते. रबरी पिशवीमुळे (निरोधमुळे) शिश्नाची संवेदना कमी झाल्याने मुळात सौम्य इच्छा असणाऱ्या व्यक्तीत ही तक्रार संभवते, तसेच पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेनंतर प्रजोत्पादनक्षमता संपली म्हणजे लैंगिक कार्यक्षमताही संपली अशा गैरसमजाच्या दडपणाने ही तक्रार निर्माण होऊ शकते. 

(७) औषधे : रक्तदाब कमी करणारी, झोपेची, अवसादकारी (उपजत इच्छा कमी करणारी) व शांतक (चिंता व ताण यांसारखे मानसिक बिघाड कमी करणारी) औषधे तसेच स्त्रीमदजन औषधे या औषधांमुळे ही तक्रार संभवते पण हा परिणाम औषधांचा की ज्यांसाठी ही औषधे घ्यावी लागतात त्या रोगांचा हे ठरविणे अवघड आहे. काही कीटकनाशके व रासायनिक विषारी पदार्थ यांच्या प्रदीर्घ संपर्कामुळे व अतिमद्यपानामुळेही ही तक्रार संभवते. 

(८) शारीरिक कारणे : नपुंसकत्व असलेल्या व्यक्तींपैकी अंदाजे फक्त ५% व्यक्तींत शारीरिक कारणे आढळतात. कोणतेही आजारपण, अशक्तपाणा, शारीरिक व मानसिक थकवा यांमुळे तात्पुरते नपुंसकत्व येते. समागम वेदनादायक होईल असे शिश्नाचे दोष व रोग मेंदूचे-विशेषतः अग्रशंखकखंडाजवळील [⟶ तंत्रिका तंत्र] रोग अधोथॅलॅमस (मेंदूच्या तिसऱ्या विवरातील थॅलॅमस या पुंजाखालील व या विवराच्या तळात असणारा भाग) व पोष ग्रंथी, ⇨अधिवृक्क ग्रंथीवृषण (पुं-जनन ग्रंथी) यांचे कार्य कमी करणारे विकार (उदा., मधुमेह) आणि लिंग गुणसूत्र दोषांमुळे पूर्ण वृषण-निष्फलता (वृषणाचे कार्य अशक्य होण्याची स्थिती) निर्माण करणारे दोष [उदा., क्लाइनफेल्टर लक्षणसमूह ⟶ आनुवंशिकी] या शारीरिक रोगांमुळे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी नपुंसकत्व येते. दोन्ही वृषणे काढून टाकणे, वृषणाची न्यूनोत्पत्ती (अर्धवट विकास झाल्याने प्राकृत आकारमानापेक्षा कमी किंवा अपक्व स्थितीत राहणे), गूढ वृषणता (एक वा दोन्ही वृषणे प्राकृत रीत्या मुष्कार-पिशवीसारख्या भागात-उतरलेली नसणे) व वृषणशोथ यांसारख्या कारणांनी लैंगिक इच्छेवर सहसा प्रत्यक्ष परिणाम होत नाही (संततिप्रतिबंधक शस्त्रक्रियेप्रमाणे मानसिक स्वरूपाचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो). शिश्नाला रक्त पुरविणाऱ्या रोहिणीचे काठिण्य किंवा नीलांची अक्षमता यामुळेही नपुंसकत्व येते. 


उपचार : नपुसकत्वाच्या कारणाचे निदान निश्चित केल्याशिवाय उपचार सुरू करता येत नाहीत. वैद्यकीय इतिहास व शारीरिक कारणाची शक्यता दूर करण्यासाठी संपूर्ण शारीरिक तपासणी ही प्रथम पायरी होय. रक्तातील शर्करा व कोलेस्टेरॉल यांचे प्रमाण आणि यकृताची कार्ये दर्शविणाऱ्या तपासण्या कराव्या लागतात. शिश्नाचा रक्तदाब व दंडातील रक्तदाब यांचे गुणोत्तर ०.६ हून कमी असल्यास रोहिणीचे काठिण्य हे निदान ठरते. प्राकृतावस्थेतील पुरुषात निद्रिस्त स्थितीत तीन ते पाच वेळा शिश्नोत्थान होते. शिश्नाला विद्युत् अग्रे बांधून निद्रिस्त स्थितीतील शिश्नोत्थानाचा आलेख काढतात. मानसिक कारणामुळे नपुंसकत्व आलेले असेल, तर हा आलेख प्राकृत स्वरूपात आढळतो. शारीरिक कारण सापडल्यास त्यावर उपाय करणे शक्य होते. शारीरिक कारण नसल्यास जोडप्यातील दोघांच्याही वेगवेगळ्या मुलाखती घेऊन त्यांचा लैंगिक-मानसिक विकास व प्रश्नाचे स्वरूप समजावून घ्यावे लागते. उपचार मुख्यतः मानसिक स्वरूपाचे असतात. 

मुळातील लैंगिक अनिच्छेवर फारसा इलाज करता येत नाही. इतर व्यक्तींच्या बाबतीत समस्येचे स्वरूप, कारणपरंपरा, मानसिक व सभोवतालच्या परिस्थितीचे परिणाम इ. समजावून सांगणे लैंगिक शिक्षण, गैरसमज दूर करणे प्रोत्साहन आत्मविश्वास वाढविणे आणि या कामी व्यक्तीच्या पत्नीचे सहाकर्य आणि प्रत्यक्ष समागमाच्या वेळी उत्साही सहभाग नि मदत या गोष्टींच्या साहाय्याने, कौशल्याने व धीराने उपचार करावे लागतात. काही वेळा मानसोपचारांची जरूरी असते. हॉर्मोनांच्या कमतरतेच्या प्रत्यक्ष पुरावा असल्याशिवाय हॉर्मोन औषधांचा उपयोग होत नाही. मात्र प्रत्यक्ष अंतःस्त्रावी ग्रंथींचा रोग असल्यास त्या त्या हॉर्मोन औषधाचा उपयोग केल्यास फायदा होतो (उदा., मधुमेहावर इन्शुलिनाचा उपाय इत्यादी). 

रक्तवाहिन्यांत सौम्य काठिण्य निर्माण झाल्यामुळे किंवा मानसोपचारांनीही गुण न आलेल्या रुग्णांत तज्ञ व्यक्तीकडून (मूत्र अथवा मूत्र-जननेंद्रियासंबंधीच्या तज्ञ व्यक्तीकडून) पॅपॅव्हरीन या अल्कलॉइड द्रव्याचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) देतो येते. त्यामुळे शिश्न रोहिण्या तात्पुरत्या विस्फारून शिश्नातील रक्तपुरवठा वाढतो आणि तात्पुरते शिश्नोत्थान होते. तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण स्वतःच हे अंतःक्षेपण समागमापूर्वी घेण्यास (इन्शुलीन अंतःक्षेपणाप्रमाणे) शिकू शकतो परंतु तज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय हे अंतःक्षेपण घेतल्यास अविरत शिश्नोत्थानामुळे कायमचे नपुंसकत्व येण्याची शक्यता असते. 

शस्त्रक्रियेने शिश्नात कृत्रिम अंग बसविणे हा अखेरचा उपाय असतो. नपुंसकत्वासाठी कोणत्याही कामोत्तेजक ओषधाचा उपयोग नाही. 

अकाल वीर्यस्खलन : या तक्रारीत शिश्नाचा योनिप्रवेश होण्याच्या आत किंवा झाल्यावर लगेच वीर्यस्खलन होते. त्यामुळे पुरुष असमाधानी राहातो. वीर्यस्खलन योनीत झाले, तर अकला वीर्यस्खलन असूनही गर्भधारणा होऊ शकते. 

सर्वसाधारणपणे याची कारणे नपुंसकत्वाच्या कारणांप्रमाणेच व मानसिक स्वरूपाची असतात. शिश्नोत्थान पूर्ण होण्याआधी समागमाचा प्रयत्न, घाई, अति-उत्तेजित अवस्था, अननुभवी असणे, वेंधळेपणा इ. याची कारणे आहेत. 

उपचारांचे स्वरूपही सहसा नपुंसकत्वाच्या उपचारांप्रमाणेच असते. अति-उत्तेजित अवस्था हे कारण असल्यास वारंवार व कमी वेळाच्या अंतराने समागम किंवा शिश्नाची संवेदना कमी करण्यासाठी रबरी पिशवी वापरून समागम करणे यांमुळे आणि कालांतराने अनुभवाने यात सुधारणा होते. याशिवाय शिश्न अधिकाधिक काळ उत्थापित ठेवण्यासाठी थांबणे-सुरू करणे पद्धत व स्त्री-जोडीदाराच्या सहाकार्याने ‘दाब पद्धत’ यांचा उपयोग करता येतो. स्त्रीने पुरुषावर आरूढ होणे किंवा दोघांनी कुशीवर झोपून समागम करणे याप्रकारे आसनात बदल करूनही अकाल वीर्यस्खलन टाळता येते.  

विलंबित वीर्यस्खलन व वीर्यस्खलनाचा अभाव : बराच वेळ समागम केल्यावरही वीर्यस्खलन न होणे किंवा बऱ्याच उशिरा वीर्यस्खलन होणे ही समस्या शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे उद्‌भवू शकते. तंत्रिकाविकृती (तंत्रिका तंत्राची अपसामान्य वा सामान्यतः विऱ्हासी अवस्था), स्नायुविकृती, शुक्राणूंचा अभाव किंवा पश्च वीर्यस्खलन (वीर्यस्खलन मागे म्हणजे मूत्राशयात होणे) ही शारीरिक कारणे होत. प्रणयाराधनाचा अभाव व मानसिक ताण ही मानसिक कारणे होत. काहींना झोपेत वीर्यस्खलन होते परंतु जागृतावस्थेत वीर्यस्खलन अजिबात होत नाही. पौगंडावस्थेपासून कधीही हस्तमैथुन केलेले नव्हते, असा त्यांचा वैद्यकीय इतिहास असतो. वीर्यस्खलनाची प्रतिक्षेपी क्रिया (बाह्य उद्दीपनामुळे निर्माण होणारा अनैच्छिक प्रतिसाद) जागृतावस्थेत तोवर घडून न आल्यामुळे वीर्यस्खलन होत नाही. 

उपचार : दांपत्याने एकमेकांना अधिकाधिक सुखावणे, स्त्रीने पुरुषाचे संपूर्ण शरीर व शिश्नमणी आपल्या स्पर्शाने उत्तेजित करणे ही उपाययोजना असते. 

शारीरिक कारण आढळल्यास त्यानुसार उपचार केला जातो. या समस्येचा इलाज समाधानकारक झाल्याचे आढळून येत नाही. 

लैंगिक अपमार्गण : समलिंगी कामुकता, प्रतिलैंगिकता (विरुद्ध-लिंगी असण्याची तीव्र मानसिक प्रेरणा असणे), वेषांतरण विकृती (विरुद्ध-लिंगीयाचा वेष व बऱ्याचदा त्याप्रमाणे वर्तन करणे) इ. लैंगिक अपमार्ग बहुधा मानसिक स्वरूपाचे असले, तरी बऱ्याच वेळा ते वंशपरंपरा किंवा आनुवंशिक गुणधर्म वा कल या स्वरूपात आढळतात. काही वेळा त्यांचे स्वरूप वैयक्ति आवड-निवड असेही असू शकते. अशा वेळी लैंगिक इच्छा समलिंगी व्यक्ती, विशिष्ट वस्तू व कपडे, विशिष्ट स्थळे इत्यादींशी निगडित असल्याने किंवा आपणच विरुद्ध लिंगी आहोत व विरुद्ध-लिंगी व्यक्ती म्हणून वावरावे असे एखाद्यास (मानसिक दृष्ट्या) वाटत असल्याने प्राकृत समजल्या गेलेल्या (विरुद्ध-लिंगी) समागम प्रसंगी या व्यक्तींची लैंगिक इच्छा प्रकट होत नाही. त्यामुळे समाजमान्य गोष्ट म्हणून त्याचा रीतसर विवाह झाला किंवा विरुद्ध-लिंगी व्यक्तीशी संबंध आला, तर त्या व्यक्ती नपुंसकत्व असलेल्या (किंवा स्त्रियांमध्ये कामनिरुत्साह असलेल्या) समजल्या जाऊ शकतात. [⟶ लैंगिक अपमार्गण]. 


स्त्रियांतील कारणे: योनिसंकोच : कष्ट-समागमाचे हे महत्त्वाचे व प्रमुख कारण आहे. योनि-परिसंकोची व मुख्यतः गुद-उत्थापक स्नायूंच्या प्रतिक्षेपी संकोचामुळे योनिमुख व योनिमार्गाचा बाह्य भाग समागमाच्या वेळी बंद होतो. जास्त तीव्र स्वरूपात मांड्यांच्या अभिवर्तनी स्नायूंच्या आकुंचनामुळे योनिमुखापर्यंत पोहोचणेही अशक्य होते. (शारीरिक कारणांमुळे) वेदनादायक समागमाच्या वेळी ही संरक्षक प्रतिक्रिया म्हणून आढळत असली, तरी सर्वसाधारणपणे त्याची कारणे मानसिक स्वरूपाची असल्याने त्याचा विचार या भागात केला आहे. 

सर्वसाधारण समजूत आहे त्याप्रमाणे ही तक्रार फक्त कुमारिकांपुरती व लग्नानंतर पहिल्या काही वर्षापुरती मर्यादित नसून अनेक वेळा प्रसूती झालेल्या स्त्रियांतही ती दिसून येऊ शकते आकर्षक परंतु लाडावलेल्या, आत्मकेंद्रित, स्वार्थी व काळजीखोर अशा स्त्रियांत ही तक्रार जास्त आढळते आणि त्यांचा पती लाड करणारा, अतिजपणारा, मवाळ किंवा पुरुषीपणाला कमी असणारा असल्यास तक्रार वाढते. लैंगिक शिक्षणाचा अभाव (किंवा चुकीचे शिक्षण), कडक संस्कारांमुळे लैंगिक गोष्टींबद्दल घृणा, अज्ञान, भीती, पूर्वायुष्यातील बलात्कारासारख्या शारीरिक व मानसिक आघातांची आठवण, विवाहानंतर सुरुवातीच्या अकुशल व वेदनादायक समागमाचे क्लेशदायक अनुभव, योनिमुख व मांड्यांच्या भागाची उन्मादी अतिसंवेदनशीलता, गर्भारपण व प्रसूतीची भीती वगैरे या तक्रारीची कारणे आहेत. वरील प्रकारच्या काल्पनिक भीतींपासून व आघातांपासून स्वतःच्या लैंगिक अवयवांचे व स्वतःचे संरक्षण करण्याच्या सुप्त भावनेतून ही तक्रार उद्‌भवते. काही वेळा ही तक्रार काम-निरुत्साहाशी संबंधित असते, तर काही वेळा लैंगिक इच्छा प्रबळ असू शकते. 

लैंगिक अज्ञान दूर करणे, भीतीचे कारण जणून घेऊन ते धीराने दूर करणे तपासणी करताना शारीरिक दोष नाही हे पटवून देणे (शारीरिक कारण आढळल्यास त्यावर योग्य उपचार करणे) ते शक्य नसल्यास भूल देऊन तपासणी व जरूर भासल्यास योनिमुख ताणून घेणे व शारीरिक दोष नसल्याचे पतीस दाखवून तक्रार दूर करण्यास त्याने कसे वागावे (धीर, समजुतदारपणाला व सहकार्य) याच्या त्याला सूचना देणे, योनिमुखाजवळील भाग प्रयत्नपूर्वक सैल सोडण्यासाठी श्रोणिती ल स्नायूंचे व्यायाम शिकविणे इ. उपायांनी तक्रार कमी करण्याचा प्रयत्न करता येतो. जास्त तीव्र तक्रारीसाठी भूल देऊन तपासणी व योनिमुख ताणण्याच्या उपचारानंतर एकापेक्षा एक मोठ्या आकारमानाची विस्फारक साधने वापरण्यास रोग्याला शिकविले जाते. त्यामुळे मुख्यतः शारीरिक दोष नाही हे रोग्यास स्वतःस पटून आत्मविश्वास वाटतो आणि समागमाच्या वेळी शिश्नप्रवेशासाठी तिची मानसिक तयारी होते. 

काम-निरुत्साह : पुरुषांत लैंगिक इच्छा ( व त्यामुळे शिश्नोत्थान होणे) समागमासाठी आवश्यक आहे तशी ती स्त्रियांमध्ये नाही परंतु समागम सुखावह (दोघांनाही) होण्यासाठी आवश्यक गोष्टी लैंगिक इच्छेमुळे घडत असल्याने स्त्रियांतही ती आवश्यक आहे. या इच्छेच्या अभावी समागम त्रासदायक होतो व त्रासदायक समागमामुळे इच्छा होत नाही, असे दुष्टचक्र निर्माण होते. तसेच पुरुषाची लैंगिक इच्छा स्त्रीच्या प्रतिक्रियांवर बऱ्याच वेळा अवलंबून असल्याने एरवी नपुंसक नसलेल्या व्यक्तीत काम-निरुतसाही स्त्रीच्या संगतीत नपुंसकत्वाची लक्षणे उद्‌ भवू शकतात. 

कारणे : (१) प्राकृत : तारुण्यात पदार्पण करण्याआधी व वार्धक्य प्रक्रियेचा भाग म्हणून उतार वयात काम-निरुत्साहाची लक्षणे दिसतात. गर्भारपणाच्या काळात समागमाचा हेतू साध्य झालेला असल्याने, स्त्रीचे लक्ष गर्भावर केंद्रित झालेले असल्यामुळे व कदाचित मोठ्या प्रमाणात स्त्रवणाऱ्या प्रगर्भरक्षी (प्रोजेस्टेरॉन) हॉर्मोनाच्या परिणामामुळे स्त्रीची लैंगिक इच्छा कमी होते. 

वरील कारणांसाठी व स्त्रीचे प्रेम मोठ्या प्रमाणात बाळाकडे वळलेले असल्याने व तिची शक्ती मोठ्या प्रमाणात बाळाच्या संगोपनासाठी खर्च होत असल्याने प्रसूतीनंतरच्याही काही काळात लैंगिक इच्छा होत नाही. 

(२) मूळ स्वभावधर्म : पुरुषांप्रमाणेच स्त्रियांतही (इतर आवडी-निवडीप्रमाणे) कमी-अधिक लैंगिक इच्छा आढळणे अपरिहार्य आहे. अशा मुळात कमी इच्छा असणाऱ्या स्त्रियांच्या एकूण स्वभावधर्मामुळे एकतर त्या लग्न करीत नाहीत किंवा केल्यास तशाच काम-निरुत्साही कमी लैंगिक इच्छेच्या पुरुषाशी ते होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे परिस्थिती जास्त बिघडते. पुढील कारणांचाही जास्त प्रभाव अशाच स्त्रि यांवर पडतो. 

(३) लहानपणचे संस्कार : कडक बंधने, स्त्रीत्वासंबंधीच्या घृणास्पद कल्पनांचे संस्कार, पुरुष जातीविषयी सावधगिरीचा इशारा, स्त्री-पुरुष संबंधाविषयी विकृत कल्पना, लहान वयातील वाईट लैंगिक अनुभव व हस्तमैथुन किंवा समलिंगी अनुभवांमुळे आलेली अपराधीपणाची भावना इत्यादींमुळे ही तक्रार संभवते. 

(४) स्वकेंद्रित वृत्ती, पसंतीशिवाय विवाह, दुसऱ्या पुरुषावर प्रेम किंवा पतीचे विवाहबाह्य संबध यामुळे पतीविषयी तटस्थपणाची किंवा तिरस्काराची भावना असल्यास लैंगिक इच्छा कमी होते. 

(५) क्लेशदायक लैंगिक पूर्वानुभवांमुळे किंवा अज्ञान, गैरसमज व विचित्र कल्पनांमुळे समागम व त्यातून उद्‌भवणाऱ्या गर्भारपण, प्रसू ती किंवा लैंगिक रोगांची काल्पनिक भीती हे एक महत्त्वाचे कारण आहे. (‘योनिसंकोच’ हा वरील परिच्छेद पहावा). 

(६) संततिनियमाच्या काळात समागम विनाकारक (गर्भधारणेच्या मूळ हेतूशिवाय) घडतो असे वाटल्याने किंवा अनेक वर्षांच्या वंध्यत्वामुळे समागम निष्फळ असल्याची भावना होऊन काही स्त्रियांची लैंगिक इच्छा कमी होते. तसेच दीर्घ कालावधीपर्यंत पति-पत्नी एकत्र नसल्यास लैंगिक इच्छा कमी करून व इतरत्र लक्ष गुंवतून जगण्याची स्त्रीने सवय लावून घेतलेली असते. अशा वेळी एकत्र आल्यावरही इच्छा कमी राहू शकते. 

(७) कोणताही लांबलेला शारीरिक योग किंवा मोठा अंतःस्त्रावी ग्रंथीचा रोग, शारीरिक व मानसिक थकवा आणि इतर कार्यात लक्ष गुंतलेले असल्यासही लैंगिक इच्छा कमी होते.  

उपचार : उपचारांची सर्वसाधारण दिशा नपुंसकत्व व पुरुषांतील काम-निरुत्साह यांप्रमाणेच असते. व्यक्तीच्या काम-निरुत्साहाची कारणमीमांसा व विश्लेषण करून जोडप्याला समजावणे, मार्गदर्शन, गैरसमज दूर करणे, लैंगिक शिक्षण व कौशल्याने आणि धीराने स्त्रीचा लैंगिक व इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करणे. इ. गोष्टींचा उपयोग होतो. विशिष्ट हॉर्मोनाच्या कमतरतेमुळे झालेल्या अंतःस्त्रावी ग्रंथींच्या रोगाचा भाग म्हणून ही तक्रार उद्‌भवली असेल, तर त्या हॉर्मोनाचा उपयोग अंतःस्त्रावी ग्रंथीच्या रोगावर व त्यांमुळे उद्‌भवलेल्या काम-निरुत्साहावर होतो अन्यथा अनुभवजन्य स्त्रीमदजन औषधे देण्याने फायदा होत नाही. स्वभावधर्माप्रमाणे असलेल्या काम-निरुत्साहावर इलाज करता येत नाही पण परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सल्ला जोडप्यास द्यावा लागतो. इतर कृत्रिम उपाय व तथाकथित कामोत्तेजक औषधे निरुपयोगी आहेत. 


कामसंतृप्तीचा अभाव : (१) याच्या कारणांत काम-निरुत्साहाच्या सर्व कारणांचा समावेश होतो, तसेच खोलवर रुजलेल्या बंधनांमुळे लैंगिक इच्छा असून व समागमात भाग घेऊनही शेवटच्या क्षणी स्त्री स्वतःला कामसंतृप्तीचा अनुभव येण्याइतकी मुक्त करू शकत नाही (किंवा शरीरावरील व मनावरील ताबा संतृप्तीच्या वेळी सुटावा हे ती सुप्त मानसिक पातळीवर मान्य करू शकत नाही). 

(२) पतीचा समागम क्रियेवर ताबा नसल्याने पत्नीला काम-संतृप्तीचा अनुभव येईपर्यंत त्याला समागमक्रिया लांबवता न येणे हे सहसा कोणतही इतर दोष नसलेल्या पति-पत्नीतील मुख्य कारण असते. (अकाल वीर्यस्खलन व कमी-अधिक नपुंसकत्व ही याच कारणाची टोकावी उदाहरणे होत). 

(३) अनेक स्त्रियांना लग्नानंतर कमी अधिक वर्षे संतृप्तीचा अनुभव येत नाही (व गर्भधारणेस हा अनुभव आवश्यक नाही). तसेच अनेक स्त्रियांना समागम सुखावह वाटणे पुरेसे होते (कामसंतृप्तीच्या अनुभवाची दर वेळी आवश्यकता नसते). 

(४) सैल, ताणला गेलेला योनिमार्ग (प्रसूती व शस्त्रक्रियेमुळे) व शिथिल स्नायूंमुळे कामोद्दीपन पुरेसे न झाल्यामुळे ही तक्रार उद्‌भवू शकते [स्त्रीत मुख्य उद्दीपन भगशिश्नाद्वारे (पुरुषाच्या शिश्नाशी समजात असलेलया उत्थानक अवयवाद्वारे) होत असल्याने या कारणाबद्दल मतभेद आहेत]. 

उपचार : सर्वसाधारण काम-निरुत्साहासाठी केले जाणारे उपचार, समागमावर नियंत्रण ठेवणे व पत्नीला कामसंतृप्तीचा अनुभव येण्यास उपयुक्त पद्धतीने चेतना उद्दपित करणे यासंबंधी पतीला सूचना देणे व श्रोणितल स्नायूंचे व्यायाम इ. गोष्टींचा उपयोग होतो. फार सैल योनिमार्गासाठी योनिविटप संकोची शस्त्रक्रिया उपयुक्त ठरू शकते परंतु तिचा उपयोग मुख्यतः पुरुषाला अधिक उद्दीपन मिळण्यास होतो (स्त्रीला मुख्य संवेदना भगशिश्नाद्वारे होत असल्याने या शस्त्रक्रियेच्या स्त्रीसाठी होणाऱ्या उपयुक्ततेबद्दल मतभेद आहेत). 

लैंगिक अपमार्गण : लैंगिक वैगुण्ये व अपमार्गण यांतील परस्परसंबंधाविषयीचे विवेचन लैंगिक वैगुण्यांचा पुरुषांतील मानसिक कारणांत वर आलेलेच आहे. येथे फक्त ‘अतिकामेच्छा’ या अपमार्गाने थोडे विवेचन केलेले आहे. 

 

अतिकामेच्छा : काही वेळा मूळ स्वभावधर्माचा भाग म्हणून अतिलैंगिक इच्छा काही स्त्रियांना असली, तरी सहसा कामसंतृप्तीचा अनुभव न येण्याने, सतत असमाधानामुळे वारंवार समागमाची अपेक्षा असणे हे कारण जास्त प्रमाणात आढळते आणि वस्तुतः अशा बऱ्याच स्त्रियांची खरी तक्रार काम-निरुत्साह ही असते. अतिकामेच्छा हे काही वेळा मज्जाविकृतीचे व चित्तविकृतीचे लक्षणही असू शकते. ऋतुनिवृत्तीला तात्पुरती मानसिक प्रतिक्रिया म्हणूनही काही वेळा ऋतुनिवृत्तीनंतर लैंगिक इच्छा वाढते. 

याचे उपचार अवघड असून वैयक्तिक कारण परंपरेप्रमाणे रुग्णविशिष्ट उपचार करावे लागतात. 

पहा : लैंगिक अपमार्गण, लैंगिक वर्तन लैंगिक शिक्षण वंध्यव्य. 

संदर्भ : 1. Bellivea, F. Richter, L. Understanding Human Sexual Inadequacy, London, 1977

           2. Breacher, R. Brecher, E. Ed. An Analysis of Human Sexual Response, London, १९67.

           3. Kinsey, A. C. and others, Sexual Behaviour in the Human Male, Philadelphia, 1948,

           4. Kinsey, A.C. and others Sexual Behavrious in the Human Female, Philadelphia, 1053.

           5. Masters, W. H. Johnson, V. E. Human Sexual Response, London, 1966.

           6. Masters, W. H. Johnson, V. E. Human Sexual Inadequacy, Boston, 1870.

           7. Wolman, B.B. Ed., Handbook of Human Sexualry, Englewood Cliffs, N. J., 1980.

           ८. प्रभु विठ्ठल, निरामयकामजीवन, मुंबई,१९८२.

प्रभुणे, रा. य.